आधार कार्डच्या वापरासंदर्भात काही नवीन नियम बनविण्यात आले आहेत. त्यानुसार आता आधार कार्डावर जर का तुम्ही दिलेली माहिती खोटी आढळली, तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. आयकर विभागाने सुविधेसाठी पॅन नंबर ऐवजी 12 आकडी आधार नंबर देण्याची मुभा करदात्यांना दिली आहे. पण, चुकीचा आधार नंबर दिल्यास 10 हजार रुपयांच्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.

कर परतावा भरताना, बँक खातं, डिमॅट अकाउंट आणि 50 हजार रुपयांपेक्षा अधिकचे म्युच्युअल फंड किंवा बॉण्ड खरेदीवेळी पॅन नंबर बंधनकारक आहे, असं आयकर विभागाने म्हटलंय. वित्त विधेयक 2019 मधील 1961 च्या नियमातील दुरुस्तीनुसार पॅन नंबर ऐवजी आधार नंबर वापरण्यास नागरिकांना मंजुरी देण्यात आली आहे. पण चुकीचा आधार नंबर दिल्यास 10 हजार रुपयांच्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. पॅन ऐवजी तुम्ही आधार नंबर देत असाल त्यावेळी हा नियम लागू होतो. आधार नंबर हा युनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (UIDAI) देण्यात येतो. या प्रकरणात युआयडीएआय दंड करत नाही तर आयकर विभाग करतो. याशिवाय तुम्ही दोन फॉर्म्सवर चुकीचा आधार नंबर दिला, तर तुम्हाला प्रत्येकी 10-10 हजार रुपये असा 20 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. यामुळे फॉर्म भरताना आधार नंबर अचूक असेल याची दक्षता घ्या.

या परिस्थितीत दंड आकारला जाईल –

– पॅनऐवजी चुकीचा आधार क्रमांक देणे

– कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी पॅन व आधार दोन्ही क्रमांक न देणे

– आपण आधार क्रमांकासह बायोमेट्रिक ओळख न दिल्यास, ओळख अयशस्वी झाल्यास आपल्याला दंड भरावा लागेल.