Monsoon Eye Care Tips: पावसाळा सुरू झाला की उकाड्यापासून दिलासा मिळतो. मात्र, या ऋतूमध्ये वाढलेली आर्द्रता, दूषित पाणी, बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीमुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यात डोळ्यांचे आजारही मोठ्या प्रमाणात वाढतात. डोळे लाल होणे, खाज येणे, पाणी येणे किंवा धूसर दिसणे अशा समस्या अनेकांना जाणवू लागतात.
दिल्लीतील एका रुग्णालयाच्या अहवालानुसार, पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस जलद वाढतात. त्यामुळे गेल्या वर्षी डोळ्यांच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली होती. तसंच NCBI मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, तापमानातील अचानक बदल, घाणेरड्या हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे आणि दूषित पाण्याचे शिंतोडे डोळ्यांत जाणे ही संसर्गाची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात कंजंक्टिव्हायटिस, स्टाय, केराटायटिस आणि कॉर्नियल अल्सरसारख्या समस्या वाढू शकतात.
पावसाळ्यात डोळ्यांचे कोणते आजार जास्त होतात?
१. कंजंक्टिव्हायटिस (Pink Eye)
कंजंक्टिव्हायटिसला सामान्य भाषेत ‘आय फ्लू’ किंवा ‘डोळे येणे’ असेही म्हणतात. हा संसर्ग व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होतो. यामध्ये डोळे लाल होणे, पाणी येणे, खाज सुटणे, चिकट स्त्राव येणे आणि सकाळी पापण्या चिकटणे अशी लक्षणे दिसतात. हा आजार संसर्गजन्य असल्याने टॉवेल, रुमाल किंवा मेकअपचे साहित्य इतरांसोबत शेअर करू नये.
२. स्टाय (Stye)
पापणीच्या कडेवर लहान लाल गाठ किंवा फोड येण्याला स्टाय म्हणतात. हा प्रामुख्याने बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. पावसाळ्यात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास स्टायचा धोका वाढतो. यामुळे पापणीला सूज, वेदना आणि स्पर्श केल्यावर त्रास होऊ शकतो.
३. केराटायटिस (Keratitis)
कॉर्नियामध्ये येणारी सूज यालाच केराटायटिस म्हणतात. दूषित पाण्याचा संपर्क किंवा कॉन्टॅक्ट लेन्सची योग्य स्वच्छता न राखल्यास हा आजार होऊ शकतो. यामध्ये डोळ्यांत तीव्र वेदना, धूसर दिसणे, प्रकाशाचा त्रास आणि सतत पाणी येणे अशी लक्षणे दिसतात.
४. फंगल आय इन्फेक्शन
पावसाळ्यातील आर्द्र वातावरणामुळे बुरशीची वाढ होते. त्यामुळे फंगल आय इन्फेक्शनचा धोका वाढतो. डोळ्याला दुखापत झाल्यानंतर किंवा अस्वच्छ कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यामुळेही हा संसर्ग होऊ शकतो. यामध्ये डोळे लाल होणे, जळजळ, धूसर दिसणे आणि वेदना जाणवू शकतात.
५. ड्राय आय सिंड्रोम (Dry Eyes)
पावसाळ्यात बाहेर आर्द्रता असली तरी घरात किंवा कार्यालयात एसीचा जास्त वापर केल्यामुळे डोळ्यांतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांत कोरडेपणा, जळजळ आणि धूसर दिसण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
६. कॉर्नियल अल्सर
कॉर्नियावर जखम किंवा अल्सर तयार होण्याची ही गंभीर समस्या आहे. डोळ्यांच्या संसर्गावर वेळेत उपचार न केल्यास कॉर्नियल अल्सर होऊ शकतो. यामध्ये तीव्र वेदना, डोळे लाल होणे, सतत पाणी येणे आणि दृष्टी कमी होण्याचा धोका असतो.
७. ब्लेफेरायटिस (Blepharitis)
पापण्यांच्या कडेला होणाऱ्या सूजेला ब्लेफेरायटिस म्हणतात. बॅक्टेरियाची वाढ, त्वचेच्या काही समस्या किंवा स्वच्छतेचा अभाव यामुळे हा त्रास होऊ शकतो. पापण्यांवर खवले, कोंड्यासारखे थर आणि खाज ही याची प्रमुख लक्षणे आहेत.
पावसाळ्यात डोळ्यांचे संरक्षण कसे कराल?
- हात नेहमी स्वच्छ धुवा आणि घाणेरड्या हातांनी डोळ्यांना स्पर्श करू नका.
- वारंवार डोळे चोळणे टाळा.
- कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असल्यास त्यांची योग्य स्वच्छता ठेवा. शक्य असल्यास पावसाळ्यात चष्म्याचा वापर करा.
- टॉवेल, रुमाल, आय मेकअप किंवा आय ड्रॉप इतरांसोबत शेअर करू नका.
- घरातील ओलावा आणि बुरशी वाढू देऊ नका.
- दूषित पाण्याचा डोळ्यांशी संपर्क होणार नाही याची काळजी घ्या.
- डोळे लाल होणे, वेदना, धूसर दिसणे किंवा पू येणे अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. स्वतःहून औषधे किंवा आय ड्रॉप वापरणे टाळा.
- दुर्लक्ष करू नका!
पावसाळ्यात डोळ्यांशी संबंधित संसर्ग झपाट्याने वाढू शकतो. सुरुवातीची लक्षणे किरकोळ वाटली तरी वेळेवर उपचार न केल्यास कॉर्नियल अल्सरसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊन दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वच्छतेची काळजी घ्या आणि कोणताही त्रास जाणवल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
