डॉ. भावना पारीख

गेल्या काही वर्षांमध्ये अंडाशयाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रजोनिवृत्तीचे वय उलटून गेलेल्या महिलांना हा आजार होण्याची दाट शक्यता असते.  भारतातील महिलांना होणाऱ्या एकूण कर्करोगांमध्ये अंडाशयाचा कर्करोग तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात या आजाराचे प्रमाण जवळपास ६.७ टक्के असून कर्करोगांमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी जवळपास ३.८ टक्के मृत्यू या आजारामुळे होतात. दरवर्षी आपल्या देशामध्ये अंडाशयाच्या कर्करोगाच्या जवळपास ४५,००० नव्या केसेस आढळून येतात. त्यामुळे या आजाराबाबत अधिक जनजागृती करणे आवश्यक आहे

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Gold Silver Price on 1 March
Gold-Silver Price on 1 March 2024: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत
Gold Silver Price
Gold-Silver Price on 28 February 2024: सोन्याच्या दरात आज कोणताही बदल नाही, पाहा काय आहे १० ग्रॅम सोन्याचा भाव

अंडाशयाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे दिसून येणे कठीण असल्याने या आजाराला ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आधी हा आजार झालेला असणे, आनुवंशिकता, वय, वजन, एन्डोमेट्रियोसिस (जेव्हा एन्डोमेट्रियल पेशी गर्भाशयाच्या व्यतिरिक्त अंड नलिका, अंडाशय किंवा काही दूरच्या अवयवांमध्ये वाढतात), मासिक पाळी लवकर येऊ लागणे (१२ वर्षांपेक्षा कमी वय असताना), रजोनिवृत्ती उशिरा होणे, गर्भधारणा खूप उशिरा होणे किंवा गर्भधारणा न होणे असे अनेक धोके आहेत जे अंडाशयाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात.

५० वर्षे वय उलटून गेलेल्या महिलेला हा आजार होण्याची जास्त शक्यता असते.  कुटुंबामध्ये आधी एखाद्या व्यक्तीला म्हणजे आई, बहीण किंवा अगदी जवळच्या नातेवाईक स्त्रीला स्तनाचा कर्करोग किंवा अंडाशयाचा कर्करोग झालेला असल्यास त्याच कुटुंबातील इतर स्त्रियांना (खूप जवळच्या नातेवाईक) अंडाशयाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. अंडाशयाच्या कर्करोगाच्या जवळपास १० ते २० टक्के रुग्णांमध्ये बीआरसीए१ किंवा बीआरसीए२ जनुकांच्या उत्परिवर्तनामुळे (जीन म्युटेशन) होतात. अंडाशयाचा कर्करोगाचे निदान करण्यात आलेल्या प्रत्येक महिलेसाठी जनुकीय (जेनेटिक) तपासणी करवून घेणे आवश्यक आहे. स्थूलपणा, खासकरून वयस्क होण्याच्या सुरुवातीच्या काळात शरीर स्थूल असणे ही बाब धोकादायक आहे. अंडाशयाच्या कर्करोगाच्या एंडोमेटरॉइड प्रकारासाठी एन्डोमेट्रिओसिस ही जोखीम आहे. एन्डोमेट्रियल पेशी गर्भाशयाच्या बाहेर इतर अवयवांमध्ये वाढू लागल्याने ही गंभीर स्थिती उद्भवते, ज्यामुळे ओटीपोटामध्ये, खासकरून मासिक पाळीच्या काळात, खूप वेदना होतात.

उपचार

अंडाशयाच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी यांचा समावेश असतो. आजार कोणत्या टप्प्यावर पोहोचलेला आहे त्यानुसार शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी यांचा क्रम प्रत्येक रुग्णासाठी वेगवेगळा असतो.  ज्या रुग्णांच्या बाबतीत आजार खूप पुढील टप्प्यांवर पोहोचला आहे, त्यांच्यावरील उपचारांसाठी आमच्याकडे अँटी-जिओजेनिक एजंट्ससह टार्गेटेड थेरपीचा समावेश करण्याचा पर्यायही आहे.  पुढच्या टप्प्यावर आजार पोहोचलेल्या रुग्णांसाठी देखरेख थेरपी देण्याचीदेखील एक संकल्पना आहे, आजारमुक्त काळ वाढवला जावा हा याचा उद्देश असतो.  बीआरसीए म्युटेशन्स झाले असलेल्या रुग्णांना पीएआरपी इनहिबिटर्ससारखी नवीन औषधेही दिली जाऊ शकतात. आजाराचे निदान ज्या वेळी केले गेले तेव्हा आजार कोणत्या टप्प्यावर आहे त्यावर उपचारांमुळे मिळणारे परिणाम अवलंबून असतात. रुग्ण सरासरी ५ वर्षे जगण्याची शक्यता ४९ टक्के असते. खूपच आधीच्या टप्प्यामध्ये आजार लक्षात आला असेल तर रुग्ण पुढील पाच वर्षे जगण्याची शक्यता ९३% असते आजाराचे निदान जेव्हा करण्यात आले तेव्हा ६५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांची स्थिती ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांपेक्षा अधिक चांगली असते.

हे लक्षात ठेवा

दरवर्षी स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत तपासणी आणि पेल्विक अल्ट्रासाउंड अवश्य करून घेणे. त्याशिवाय आपला दिनक्रम सक्रिय ठेवावा, नियमितपणे व्यायाम करावा, आहार संतुलित असावा आणि स्थूलपणा टाळावा. मातांनी स्तनपान अवश्य करवावे. आपल्या शरीरात कोणतीही नवी लक्षणे दिसून येत असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

लक्षणे

अंडाशयाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असताना त्याची लक्षणे लक्षात येणे कठीण असते. पोट फुगणे, ओटीपोटात दुखणे किंवा पोट भरलेले असल्यासारखे वाटणे, पाठदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, वारंवार लघवी होणे, मासिक पाळी अनियमित असणे, योनीतून स्राव येणे अशी काही लक्षणे आहेत पण हीच लक्षणे इतर काही आजारांमध्येही उद्भवू शकतात. जेव्हा जेव्हा हे त्रास औषधांमुळे बरे होत नाहीत तेव्हा अजिबात वेळ न दवडता, तात्काळ एखाद्या ऑन्कॉलॉजिस्ट किंवा डॉक्टरचा सल्ला घ्यावा. या कर्करोगाच्या पुढील टप्प्यामध्ये त्या स्त्रीला वजन कमी होणे, श्वास घेण्यात अडथळा होणे अशीदेखील लक्षणे दिसून येऊ शकतात.

(लेखिका वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ आहेत. )