अमेरिकेतही साबुदाणा खिचडीची क्रेझ

वाचा नक्की काय घडलं.

साबुदाणा खिचडी हा आपला सर्वांच्याच आवडीचा आणि परिचयाचा पदार्थ. आपल्याकडं प्रामुख्यानं उपवासासाठी साबुदाणा खिचडी खातात. साबुदाणा खिचडी ही आपल्या शरीरासाठीही चांगली आहे. तिचे अनेक फायदेही आपल्याला माहित आहेत. पण आता आपल्या सर्वांच्याच आवडत्या या साबुदाणा खिचडीची क्रेझ सातासमुद्रापारही गेली आहे असं सांगितलं तर. होय हे अगदी खरं आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका लेखात समिन नोसरत यांनी आपला अमेरिकेतील खिचडीबद्दलचा अनुभव कथन केला आहे.

खिचडी आणि यांचा काय संबंध आहे असा आता तुम्ही विचार कराल? आणि हे स्वभाविक आहे. नोसरत यांनी आपले मित्र हृषिकेश हिरवे यांच्यासह ‘होम कुकींग’ या पॉडकास्टची सुरूवात केली. संगीतकार असणारे हिरवे यांना पॉडकास्टचीही विशेष आवड आहे. अनेकदा हिरवे हे  श्रोत्यांचे प्रश्न नोसरत यांच्याकडे पाठवत असंत. अशाच एका महिलेनं विचारलेल्या प्रश्नामुळे आम्ही अचंबित झालो असं नोसरत सांगतात. एका हाताला दुखापत झाल्यामुळे केवळ हातानं कोणता पदार्थ मी शिजवू शकेन असा प्रश्न तिनं केला होता. त्यावेळी त्या महिलेला एका हातानं बनवता येईल अशा भाताच्या खिच़डीचा पर्याय दिला आणि तो भारतातही खूप आवडीने खाल्ला जातो असं उत्तर नोसरत यांनी दिल्याचा लेखात उल्लेख आहे.

परंतु त्याचवेळी हिरवे यांनी त्यांच्या आवडत्या खिचडीच्या पर्यायाबद्दल सांगितलं. ती एकहाती बनवणं शक्य नाही परंतु त्याला साबुदाणा खिचडी म्हणतात आणि आपल्या आवडत्या पदार्थांपैकी तो एक आहे असंही ते म्हणाल्याचं नोरसत यांनी लेखात नमूद केलं आहे. साबुदाणे, शेंगदाणे, उकडलेले बटाटे आणि तिखटासह थोडी कोथिंबिर अशा पदार्थांच्या साहाय्यानं साबुदाणा खिचडी बनवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. “मी लहान असताना माझी आई शेंगदाण्याशिवाय साबुदाण्याची खिचडी तयार करत होती. त्यावेळी मला शेंगदाण्यांची अॅलर्जी होती. पण मला ते खाण्यात मजा येत नव्हती. परंतु आता अॅलर्जी नाही. त्यामुळे मी जेव्हा घरी जातो तेव्हा साबुदाण्याच्या खिचडीचा भरपूर आस्वाद घेतो आणि माझ्या आवडत्या पाच पदार्थांपैकी साबुदाण्याची खिचडी एक आहे.” असंही हिरवेंनी त्यांना सांगितल्याचं नोसरत म्हणतात.

“साबुदाणा खिचडी कशी बनवतात हे सांगितल्यानंतर त्वरित मी अमेरिकेतील भारतीय किराणाच्या दुकानात जाऊन मध्यम आकाराचे साबुदाणे आणले आणि ते भिजत ठेवलं. परंतु हा पदार्थ कसा तयार करता येईल यासाठी इंटरनेटचीही मदत घेतली. हिरवे यांनी कधी स्वत:ही साबुदाण्याची खिचडी शिजवली नसल्यानं त्यांनी सांगितलं नव्हतं. तसं त्यांना हे सांगणं कठिण होतं. यासाठी काही व्हिडीओंचीही मदत घेतली,” असं नोसरत सांगतात. मात्र ऑथेंटिकेट खिचडी आम्हाला करता येणं शक्य नाही हे कळून चूकलं. तसेच हिरवे यांच्या आई-वडिलांना केवळ खिचडी तयार करण्यासाठी बोलावे का याबद्दलही आमची चर्चा झाली. साबुदाणा खिचडी तयार करण्यासाठी पारंपारिक पद्धतीऐवजी आम्ही मायक्रोव्हेवचा वापर करत होतो, असं नोसरत यांनी सांगितलं. हिरवे यांनी आपली आई कशाप्रकारे ही साबुदाण्याची खिचडी शिजवत असे याचा अनुभवही कथन केला. एक दिवस असाही येईल जेव्हा मी हिरवे यांच्या आईवडिलांना जाऊन भेटेन आणि साबुदाण्याची खिचडी शिजवताना पाहिन. तर भारतात असलेल्या महाराष्ट्रातील अन्य पदार्थांचाही आस्वाद घेण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे, असंही त्यांनी लेखात म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian dish sabudana khichdi famous craze in america article in international news paper jud

ताज्या बातम्या