नवीन वर्षात भारतीय रेल्वेचं तिकीट बूक करण्याची प्रक्रीया बरीच सोपी आणि जलद होणार आहे. कारण, नव्या वर्षात आयआरसीटीसीची नवी वेबसाइट लाँच झाली आहे. IRCTC च्या नवीन वेबसाइटसाठी कोणतंही वेगळं डोमेन नाहीये, तुम्ही http://www.irctc.co.in या जुन्या डोमेनवरतीच लॉग-इन करु शकणार आहात. पण, आयआरसीटीसीने काही नवीन फिचर्ससह ही वेबसाइट अपग्रेड केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी गुरुवारी आयआरसीटीसीच्या ई-तिकीट वेबसाइटच्या अपग्रेड केलेल्या आवृत्तीचे उद्घाटन केले.


अपग्रेडेड वेबसाइटमुळे तिकीट आरक्षण आणि तिकीट रिफंड प्रक्रीया सहज आणि कमी वेळेत पार पडेल असा दावा करण्यात आला आहे. आता केवळ एका मिनिटात एकाच वेळी दहा हजार रेल्वे तिकीटांचं बूकिंग शक्य होणार आहे. सध्या एका मिनिटात 7500 तिकीटं बुक होतात. नव्या वर्षापासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर खाद्य पदार्थांची सुविधाही मिळेल.

(ट्रेनमधून ‘साइड लोअर बर्थ’ने प्रवास करणाऱ्यांची ‘ती’ कटकट संपणार! रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ)

तसेच, तात्काळ तिकीट आरक्षण करताना आयआरसीटीसीची वेबसाइट आता हँग होणार नाही. वेबसाइट अधिक जलद होणार असून विशेष म्हणजे आता एकाच वेळी 5 लाख प्रवासी लॉग-इन करु शकणार आहेत. यापूर्वी ही संख्या केवळ 40 हजारांच्या घरात होती. सध्या जवळपास 83 टक्के रेल्वे तिकीटांची बूकिंग आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन होत आहे, पण हा आकडा 100 टक्के व्हावा या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.