Menopause And Corporate Career: आजच्या काळात भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांचा सहभाग झपाट्याने वाढत तर आहेच, पण त्या अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरतही आहेत. महिलांच्या याच प्रगतीच्या प्रवासात एक असा नैसर्गिक टप्पा येतो ज्याबाबत आजही उघडपणे बोलले जात नाही. तो टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉज.

आताच्या वर्क कल्चरनुसार साधारण ४० ते ५० किंवा अगदी ५५ हा वयोगट महिलांच्या करिअरमधील महत्त्वाचा काळ असतो. बऱ्याच वर्षांचा अनुभव आणि वरिष्ठ पदांची जबाबदारी याच काळात त्यांच्या खांद्यावर असते. मात्र दुर्दैवाने याच काळात शरीरात होणारे हार्मोनल बदल, मानसिक ताणतणाव यांचा त्यांच्या कार्यक्षमतेवर नकळत परिणाम होऊ लागतो. सध्या महिलांच्या एकूणच आरोग्य आणि वर्क लाइफ याबाबत सामाजिक पातळीवर असा प्रश्न उद्भवतो की, भारतात कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांमधील या बदलांसाठी खरंच जागा आहे किंवा हे क्षेत्र त्यासाठी तयार आहे का? आजही मेनोपॉज हा विषय फक्त वैयक्तिक मानला जातो आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही समस्या केवळ वर्क लाइफमध्येच नाही तर कुटुंबातही दिसून येते.

मासिक पाळीदरम्यान एक दिवसाची रजा दिल्याने शारीरिक आराम मिळत असेल, मात्र मेनोपॉजसारख्या दीर्घकालीन अवस्थेत वर्कलाइफ मॅनेज होणंही महत्त्वाचं आहे. यासाठी महिलांनी स्वत: पुढाकार घेऊन या अवस्थेबाबत ऑफिस किंवा कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होऊ शकतात.

बऱ्याचदा वर्किंग वुमन या ऑफिस आणि घर अशा दुहेरी जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या असतात. त्यांना करिअर तर महत्त्वाचं आहेच, पण कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता येत नाही याचं गिल्टही येतं. मग सुरू होतो मानसिक ताण, जोडीदाराशी वाद किंवा इतर कौटुंबिक समस्या. मात्र या सगळ्यामध्ये ‘ती’ स्वत:कडे मात्र इतकं दुर्लक्ष करते की वेळेआधी तिच्या शरीरात काही असे बदल घडतात जे तिच्यासाठी खरंच अनपेक्षित आणि नुकसान करणारे ठरतात.

एका जागतिक सर्वेक्षणानुसार, साधारणपणे १० टक्के महिला मेनोपॉजच्या तीव्र लक्षणांमुळे नोकरी सोडण्याचा विचार करतात किंवा लवकर निवृत्ती घेतात. भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात वरिष्ठ पदांवर असलेल्या महिलांपैकी साधारण ७० टक्के महिला या ४५ ते ५५ वयोगटातील आहेत. हाच मेनोपॉजचा मुख्य काळ आहे.

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, मेनोपॉजच्या लक्षणांमुळे कामावर न जाणे किंवा कार्यक्षमता कमी होणे यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला दरवर्षी साधारण १५० अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागते.

अनेकांना रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉजबाबत बराच संभ्रम आहे. मेनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये महिलांचे मासिक पाळी चक्र कायमचे थांबते. परिणामी शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी कमी होते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

मेनोपॉजची प्रमुख लक्षणे-

  • हॉट फ्लॅशेस- अचानक खूप उष्णता वाते आणि घाम येतो.
  • एकाग्रतेचा अभाव- कामात नीट लक्ष लागत नाही किंवा गोष्टी नकळतपणे विसरल्या जातात.
  • थकवा आणि निद्रानाश- रात्री झोप न झाल्यामुळे ऑफिसमध्ये दिवसभर थकवा जाणवतो.
  • चिडचिड आणि नैराश्य- हार्मोनल बदलांमुळे मूड स्विंग्ज होतात. त्यामुळे अगदी लहान कारणांवरून चिडचिड होते.

“मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये पुरूषांच्या तुलनेत हार्ट अटॅकचे प्रमाण वाढते. कारण इस्ट्रोजेन नावाचा हार्मोन हार्टचंही संरक्षण करत असतो. मेनोपॉजबाबत जागरूकता असणं गरजेचं आहे. मेनोपॉजमध्ये हाडांवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम याचा अवलंब करत या काळातील बदल व्यवस्थापित करता येऊ शकतात. साधारण मेनोपॉज ५० ते ५५ वयापर्यंत होतो. मात्र, आताच्या काळात लवकर येण्याचं कारण जीवनशैली असू शकतं. ज्या स्त्रियांना मेनोपॉजच्या काळात तीव्र लक्षणे दिसत असतील तर मेनोपॉज हार्मोनल ट्रिटमेंटची मदत घेता येऊ शकतो. मात्र याचा परिणाम प्रत्येक महिलेनुसार वेगवेगळे असू शकतात. ऑफिस किंवा कुटुंबाकडून मेनोपॉजदरम्यान मदतीची अपेक्षा न करता स्वत: स्वत:साठी उत्तम आयुष्य जगणं महत्त्वाचं आहे.”

“मेनोपॉजनंतर महिलांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे साधारण वर्षभराच्या अंतराने काही चाचण्या करणं गरजेचं असतं. तसंच ब्रेस्ट किंवा सर्व्हायकल कॅन्सरचा काही कौटुंबिक इतिहास असल्यास या चाचण्या आवर्जून कराव्यात.”

“महिला जन्मत:च प्रचंड सहनशक्ती घेऊन आलेल्या असतात. त्यामुळे आपली ताकद ओळखून स्वत:साठी एक आरोग्यदायी आयुष्य घडवणं त्यांना करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं अशा काळात अत्यंत महत्त्वाचा ठरतो.”

-डॉ. राजश्री दयानंद कटके, प्राध्यापक व प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ

“कॉर्पोरेट क्षेत्रात २० वर्षांहून अधिक काळ काम करताना मला जाणवले की, मेनोपॉजच्या टप्प्यातून जाताना शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य सांभाळणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. कॉर्पोरेट जगात नेतृत्वाच्या पदांवर काम करणे खूप मागणी करणारे असते. मात्र, मेनोपॉजच्या काळात महिलांना अनेक वैद्यकीय आणि शारीरिक आव्हानांना सामोरे जावे लागते.”

“आजकाल अनेक संस्थांनी महिलांसाठी दर महिन्याला एक दिवस मासिक पाळीची (menstrual) रजा देण्याची व्यवस्था केली आहे, जेणेकरून त्यांना विश्रांती मिळेल. पण हे पुरेसे आहे का? तर नाही. मेनोपॉज फक्त एका दिवसाच्या सुट्टीने मॅनेज करता येत नाही. त्यामुळे आपल्याला अशा जीवनशैलीचा अवलंब करावा लागेल जी आपल्या दैनंदिन दिनचर्येतून मेनोपॉजमुळे येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यास मदत करेल.”

-रेश्मा कुमठेकर, सिनिअर प्रोग्राम मॅनेजर (आयटी)