Iron Deficiency Symptoms Treatment : भारतीय महिलांमध्ये लोहाची कमतरता म्हणजेच ॲनिमिया (पांडू रोग) ही एक अत्यंत सामान्य आणि गंभीर समस्या बनली आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, देशातील सुमारे ५७% महिला आणि मुली लोहाच्या कमतरतेचा सामना करीत आहेत. ही परिस्थिती थकवा आणि अशक्तपणापासून ते अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या वाढवणारी ठरू शकते. महिलांशिवाय पुरुषांमध्येही मोठ्या प्रमाणात ॲनिमियाची समस्या पाहायला मिळत आहे.
लोह (Iron) हे शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारे खनिज आहे. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे एक प्रोटीन आहे, ज्याच्या मदतीने शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवला जातो. जेव्हा शरीरात लोहाची कमतरता होते, तेव्हा हिमोग्लोबिनची निर्मिती कमी होऊ लागते.
आहारातील गडबड हे लोहाच्या कमतरतेचे सर्वांत सामान्य कारण मानले जाते. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, तुमची रोजची एक सवयदेखील हा धोका वाढवू शकते?
ॲनिमियाचा वाढता धोका
डॉक्टरांच्या मते, आहारात लोहाचा समावेश असलेल्या पदार्थांची कमतरता, महिलांमध्ये अति-मासिक पाळी, गर्भधारणा, काही आजार किंवा शरीरात लोह योग्य प्रकारे शोषले न जाणे यांमुळे ॲनिमियाचा धोका वाढतो. त्याव्यतिरिक्त जास्त प्रमाणात चहा आणि कॉफी पिण्यामुळे शरीरात लोहाची कमतरता होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
चहामध्ये असलेले ‘टॅनिन’ (Tannin) आणि कॉफीमध्ये आढळणारे ‘पॉलीफेनॉल्स’ (Polyphenols) जेवणातून मिळणाऱ्या ‘नॉन-हीम लोहाचे’ (Non-heme Iron) शोषण कमी करू शकतात. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही चहा किंवा कॉफी पिणे पूर्णपणे बंद केले पाहिजे, तर त्याचे मर्यादित आणि योग्य पद्धतीने सेवन करणे गरजेचे आहे.
चहा आणि कॉफीचा आरोग्यावर काय परिणाम होतो?
- अति प्रमाणात चहा आणि कॉफी पिणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ॲनिमियाचा धोका देखील वाढू शकतो.
- चहा आणि कॉफी जेवणातून मिळणाऱ्या नॉन-हीम लोहाचे शरीरातील शोषण कमी करतात.
- चहामधील टॅनिन आणि कॉफीमधील पॉलीफेनॉल्स लोहाशी बाईंड (एकत्र) होतात, ज्यामुळे लोह शरीरात व्यवस्थित शोषले जात नाही.
- जर तुम्ही प्रत्येक जेवणाआधी किंवा जेवणानंतर लगेचच चहा वा कॉफी पीत असाल, तर कालांतराने शरीरातील लोहाची पातळी खालावू शकते.
- हा परिणाम विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये जास्त दिसून येतो. कारण- त्यांच्या आहारात प्रामुख्याने नॉन-हीम लोहच असते. नॉन-हीम लोह हा वनस्पती आणि फोर्टिफाईड खाद्यपदार्थांमध्ये आढळणारा लोहाचा मुख्य प्रकार आहे.
मग चहा-कॉफी पिणे सोडून द्यावे का?
- आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहा-कॉफी सोडण्याची अजिबात गरज नाही; फक्त ती योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पिणे आवश्यक आहे.
- जेवणाआधी वा जेवल्यानंतर लगेचच चहा आणि कॉफी पिणे टाळावे. त्यामुळे जेवणातील लोहाचे शरीराद्वारे शोषण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
- जर तुमच्या शरीरात आधीपासूनच लोहाची कमतरता असेल किंवा तुम्ही लोहाच्या गोळ्या (Iron Supplements) घेत असाल, तर लोहाची गोळी खाण्याआधी किंवा नंतर कधीही चहा वा कॉफी घेऊ नका.
- त्याऐवजी लोहयुक्त आहारासह व्हिटॅमिन सी (Vitamin C) असलेल्या पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे शरीरात लोहाचे शोषण चांगल्या प्रकारे होते.
लोहाची कमतरता झाल्यास काय करावे?
शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या, डाळी, राजमा, चणे, सोयाबीन, तीळ, भोपळ्याच्या बिया, गूळ आणि सुका मेवा हे लोहाचे उत्तम स्रोत आहेत.
मांसाहारी लोकांसाठी रेड मीट, चिकन आणि मासे हे उत्तम पर्याय आहेत. त्यातून मिळणारे ‘हीम लोह’ शरीर सहजगत्या शोषून घेते. लोहयुक्त आहारासह व्हिटॅमिन सी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
जर रक्त तपासणीमध्ये हिमोग्लोबिनची पातळी सातत्याने कमी येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. स्वतःच्या मनाने किंवा दीर्घकाळापर्यंत लोहाच्या गोळ्या घेऊ नका. कारण- प्रत्येक ॲनिमिया हा केवळ लोहाच्या कमतरतेमुळेच असतो, असे नाही.
