Irregular period problem cancer sign : महिलांना अनेकदा मासिक पाळीशी संबंधित काही ना काही समस्या येतात, कधी मासिक पाळीत रक्तस्राव कमी; तर कधी जास्त असतो आणि कधी कधी ती ठरलेल्या तारखेला येत नाही. परंतु, जर ही समस्या दीर्घकाळ टिकून राहिली, तर ते धोक्याचे लक्षण असू शकते. महिलांमध्ये आढळणारे तीन प्रमुख कर्करोग आहेत, ज्यांची लक्षणेदेखील मासिक पाळीशी संबंधित असतात. अशा परिस्थितीत ही लक्षणे वेळेवर ओळखणे आणि आवश्यक ती तपासणी करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनकडून जाणून घ्या की, हे ३ कर्करोग कोणते आहेत, ज्यांची लक्षणे (कर्करोगाची लक्षणे) मासिक पाळीतील अनियमितता किंवा मासिक पाळीशी संबंधित समस्यांवरून ओळखता येतात.

कोणत्या कर्करोगांमुळे मासिक पाळीच्या समस्या उद्भवतात?

गर्भाशयाचा कर्करोग

गर्भाशयाच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे एंडोमेट्रियल कर्करोग. हा गर्भाशयाचा कर्करोग गर्भाशयाच्या आतील अस्तराला ग्रासतो. या कर्करोगाच्या पेशी गर्भाशयाच्या आत तयार होतात आणि वेगाने वाढून पसरत जातात. ?

गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे –

  • योनीतून असामान्य स्राव किंवा रक्तस्राव होत आहे.
  • तुम्हाला शरीराच्या खालच्या भागात जडपणा आणि वेदना जाणवू शकतात.
  • मासिक पाळी थांबल्यानंतर होणारा रक्तस्राव
  • रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होणे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग

गर्भाशयग्रीवेचा कर्करोग हा महिलांच्या गर्भाशयाच्या ग्रीवेमध्ये विकसित होणारा कर्करोग आहे. जेव्हा गर्भाशयग्रीवेतील पेशी अनियंत्रितपणे वाढतात, तेव्हा हा कर्करोग होतो. गर्भाशयग्रीवा हा एक जाड, नळीसारखा अवयव आहे, जो गर्भाशयाला योनीशी जोडतो आणि तो स्त्री प्रजनन संस्थेचा एक भाग आहे. गर्भाशयग्रीवेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसू शकत नाहीत; परंतु आजार जसजसा वाढत जातो, तसतशी लक्षणे दिसू शकतात.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे

  • गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगात योनीतून रक्तस्राव होऊ शकतो, जे सामान्य लक्षण नाही.
  • योनीतून असामान्य स्राव होऊ शकतो
  • लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव होऊ शकतो.

अंडाशयाचा कर्करोग

अंडाशयाचा कर्करोग हा महिलांच्या अंडाशयाचा कर्करोग आहे. हा कर्करोग अंडाशय, फॅलोपियन ट्यूब किंवा पेरिटोनियममध्ये होऊ शकतो आणि गाठींचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. महिलांना दोन अंडाशय असतात, जे गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना स्थित असतात. त्यांचे कार्य प्रजननासाठी स्त्री संप्रेरके आणि अंडी तयार करणे हे आहे. अंडाशयाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे आणि त्याच्या लक्षणांचे लवकर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे

  • असामान्य योनीस्राव आणि रक्तस्राव
  • शरीराच्या खालच्या भागात वेदना आणि जडपणा
  • पोटदुखी, पाठदुखी
  • काहीतरी खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटणे
  • काहीतरी खाण्यात अडचण
  • शौचास जाण्याच्या सवयींमध्ये बदल, वारंवार लघवी येणे किंवा अचानक लघवी येणे.

महिलांना मासिक पाळीच्या काही असामान्य समस्या जाणवल्यास, त्यांनी विनाविलंब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि स्वतःची तपासणी करून घ्यावी. त्यामुळे कोणत्याही संशयित वैद्यकीय स्थितीची पुष्टी होण्यास मदत होईल. आपल्या शरीराची धोक्याची चिन्हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.