Irregular Periods Foods: काही महिलांना नियमित पाळी येत नाही. ताण-तणाव, झोपेची बदललेली वेळ, जीवनशैलीतील बदल आणि हार्मोन्समधील चढ-उतार यामुळे पाळीचे चक्र बिघडू शकते. न्यूट्रिशनिस्ट नमनी अग्रवाल यांच्या मते, तुमचीही पाळी नियमित येत नसेल, तर आहारात या पदार्थांचा समावेश करा. पाळी नियमित येण्यासाठी योग्य आहार आणि चांगली जीवनशैली महत्त्वाची असते. तुम्ही जे खाता त्याचा पाळीवर थेट परिणाम होत नसला, तरी योग्य पोषक घटक घेतल्याने हार्मोन्सचे संतुलन राखण्यास आणि पाळीच्या आरोग्याला आधार मिळू शकतो.
पाळी नियमित येण्यासाठी कच्ची पपई फायदेशीर मानली जाते. आजी-आजोबांच्या काळापासून तिचा वापर केला जात आहे. कच्च्या पपईमध्ये लेटेक्स आणि पपेन हे घटक भरपूर प्रमाणात असतात. हे गर्भाशयाच्या स्नायूंचे आकुंचन वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे उशिरा येणारी पाळी नियमित होण्यास किंवा सुरू होण्यास मदत मिळू शकते, असे मानले जाते.
दररोज अंडी खाल्ल्याने शरीराला ओमेगा-३ फॅटी ॲसिड, प्रथिने आणि आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात. यामुळे पाळीदरम्यान होणाऱ्या सामान्य त्रासांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. अंड्यामध्ये व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन D आणि लोह असते. त्यामुळे मूड स्विंग कमी होण्यास आणि जास्त रक्तस्रावामुळे होणारी लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत होते.
अळशीच्या बिया पाळीच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्या एक नैसर्गिक सुपरफूड आहेत. त्यामध्ये लिग्नान आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात. हे घटक नैसर्गिकरीत्या हार्मोन्सचे संतुलन राखण्यास आणि पाळीतील त्रास कमी करण्यास मदत करतात.
पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी दालचिनीचा वापर करू शकता. यामुळे जास्त रक्तस्राव कमी होण्यास मदत मिळते. पाळी सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या काही दिवसांत दालचिनी घेतल्यास ओटीपोटातील वेदनांची तीव्रता आणि कालावधी कमी होऊ शकतो.
आले हे पाळीदरम्यान आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी नैसर्गिक उपायांपैकी एक मानले जाते. त्यामध्ये असलेले दाह कमी करणारे गुणधर्म पाळीतील वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधांप्रमाणेच मदत करू शकतात.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
