Lemon In Black Coffee Benefits : आजकाल कॉफी वेगवेगळ्या पद्धतीने पिण्याची फॅशन झाली असून, त्यात ‘ब्लॅक कॉफी’ सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. शरीराला ऊर्जा देण्यापासून ते चरबी कमी करण्यापर्यंत अनेक आरोग्यदायी फायदे ब्लॅक कॉफीमुळे मिळतात. पण, ब्लॅक कॉफीमध्ये लिंबू मिसळून पिण्याचा एक ट्रेंडही व्हायरल होतोय, जो खरंच आपल्या शरीरासाठी फायदेशीर का? त्याने शरीरात नेमके कोणते बदल होतात? जाणून घेऊ…
एका वृत्तसंस्थेशी बोलताना यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डाएटेटिक्स विभागप्रमुख सुहानी सेठ अग्रवाल यांनी या विषयावर सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. सुहानी सेठ अग्रवाल यांनी सांगितले की, ब्लॅक कॉफीमध्ये लिंबू मिसळून पिण्याचा ट्रेंड सध्या खूप वाढला आहे. अनेक जण वजन कमी करण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स (विषारी घटक बाहेर काढणे) करण्यासाठी हा सोपा उपाय मानतात; परंतु केवळ हे एकच पेय तुमच्या शरीरात मोठा बदल घडवून आणू शकते, असा गैरसमज करून घेऊ नये.
ब्लॅक कॉफीमध्ये असलेले कॅफिन शरीराची ऊर्जा खर्च करण्याची क्षमता आणि चयापचय दर (मेटाबॉलिक रेट) काही काळासाठी वाढवू शकते. तसेच काही लोकांमध्ये भूक कमी करण्यासही मदत करते; मात्र याचा प्रभाव मर्यादित असतो. त्यामुळे दीर्घकाळासाठी वजन कमी करायचे असल्यास केवळ कॉफीवर अवलंबून राहणे योग्य नाही.
ब्लॅक कॉफी आणि लिंबाचे कॉम्बिनेशन
तज्ज्ञांच्या मते, ब्लॅक कॉफीमधील कॅफिन तुम्हाला अधिक उत्साही आणि सतर्क ठेवण्यास मदत करते; तर लिंबू हे व्हिटॅमिन-सीचा उत्तम स्रोत आहे. परंतु, कॉफीमध्ये लिंबू मिसळल्यामुळे व्हिटॅमिन-सीमुळे कोणतीही विशेष चरबी कमी होण्याची (फॅट-बर्निंग) प्रक्रिया घडत नाही. या दोन्ही गोष्टी एकत्र प्यायल्याने वजन घटते, याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा अद्याप उपलब्ध नाही.
होऊ शकतात ‘हे’ त्रास
या पेयाकडे ‘डिटॉक्स ड्रिंक’ म्हणून पाहण्याची गरज नाही, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. आपल्या शरीरातील यकृत (लिव्हर) आणि मूत्रपिंड (किडनी) नैसर्गिकरीत्याच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करीत असतात. ब्लॅक कॉफी आणि लिंबाचे हे कॉम्बिनेशन प्रत्येकासाठीच फायदेशीर ठरेल, असे नाही. ज्या लोकांना पित्त (अॅसिडिटी), गॅस, पोटात जळजळ किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांनी याचे सेवन काळजीपूर्वक केले पाहिजे; अन्यथा त्रास वाढू शकतो.
कॉफीचे इतर तोटे
कॉफीमधील कॅफिनचे प्रमाण लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रमाणापेक्षा जास्त कॅफिन घेतल्यास झोपेच्या समस्या, अस्वस्थता, हृदयाचे ठोके वाढणे किंवा पोटाशी संबंधित विकार जडू शकतात. जर तुम्हाला या पेयाची चव आवडत असेल, तर तुम्ही ते मर्यादित प्रमाणात पिऊ शकता. मात्र, केवळ वजन कमी करण्यासाठी किंवा शरीर डिटॉक्स करण्यासाठी यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका.
