Can we drink ghee with warm water or coffee in the morning : अर्चना पूरण सिंह बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून, तिला दोन मुलं आहेत. त्यातील एक म्हणजे यूट्यूबर आर्यमान. त्याने अलीकडेच त्याच्या व्लॉगमध्ये सांगितलं की, सकाळी लवकर शरीराचा मेटाबॉलिझम (पचनक्रिया) सुरू करण्यासाठी तूप खाण्याचा प्रयत्न करीत आहेत. तूप खातोय हे ऐकून त्यांची पत्नी अभिनेत्री योगिता बिहानी थक्क झाली. कारण- त्यांनी तिला सांगितलं होतं की, कॉफी आणि गरम पाण्याबरोबर तूप घेणार आहे. आर्यमानच्या मते, सकाळी थोडं तूप गरम पाणी किंवा कॉफीबरोबर घेतल्याने पचन सुधारण्यास आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने आहारतज्ज्ञाशी संपर्क साधला…

सल्लागार आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले की, सकाळी केल्या जाणाऱ्या काही विशिष्ट कृतींमुळे चयापचय दर (metabolic rate) त्वरित वाढू शकतो. कॉफी आणि गरम पाण्याबरोबर तूप हे मिश्रण ऐकायला जरी आकर्षक वाटत असले तरी त्यामागील विज्ञानाचे अधिक संतुलित आकलन होणे गरजेचे आहेत…

रात्रभर पोट रिकामी राहते. त्यामुळे दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने केल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण (हायड्रेशन) आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आतड्यांची हालचाल उत्तेजित होण्यास मदत मिळते आणि तुम्हाला हलकेपणा जाणवू शकतो. मात्र, त्यामुळे चयापचय दर (metabolic rate) थेट वाढत नाही.

दुसरीकडे कॉफीतील कॅफिनमुळे तात्पुरत्या स्वरूपात सतर्कता वाढू शकते आणि चयापचय क्रिया (metabolic activity) किंचित गतिमान होऊ शकते. व्यायामापूर्वी सेवन केल्यामुळे व्यायामातील कामगिरीतही सुधारणा होऊ शकते. पण, हा परिणाम सौम्य आणि अल्पकाळ टिकणारा असतो. त्यामुळे चयापचय क्रियेला दीर्घकाळासाठी चालना देणारा हा घटक नाही…

तुपाचा समावेश अनेकदा चयापचय सुधारण्याच्या किंवा चरबी कमी करण्यास मदत करण्याच्या दाव्यांशी जोडला जातो. वास्तविक पाहता, तूप हे आरोग्यदायी चरबीचा स्रोत आहे आणि माफक प्रमाणात वापरल्यास ते पोट भरल्याची भावना आणि ऊर्जा देण्यास मदत करू शकते. पण, तुमच्या सकाळच्या पेयात तूप मिसळल्यानं चयापचय ‘सक्रिय’ होत नाही. उलट त्यामुळे उष्मांकाचे सेवन वाढते, ज्याचा विचार करणं आवश्यक आहे, विशेषतः जे वजन कमी करण्याच्या विचारात आहेत त्यांच्यासाठी…

वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर, चयापचय (मेटाबॉलिझम) ही अशी गोष्ट नाही, जी एखादं पेय किंवा एकच सवय लगेच ‘सक्रिय’ करू शकते. मेटाबॉलिझमवर स्नायूंचं प्रमाण, नियमित व्यायाम, झोपेची गुणवत्ता, हार्मोन्सचं संतुलन व संपूर्ण आहार पद्धती यांचा मोठा प्रभाव असतो. तूप, गरम पाणी किंवा कॉफीसारख्या सवयींमुळे काही लोकांना दिवसाची चांगली सुरुवात करण्यास मदत होऊ शकते आणि त्यामुळे निरोगी जीवनशैलीत सातत्यही राहू शकतं. मात्र, वजन कमी करण्यासाठी किंवा मेटाबॉलिझम झटपट वाढविण्यासाठी हा एखादा शॉर्टकट आहे, असं मानणं चुकीचं आणि दिशाभूल करणारं ठरू शकतं.