Cold Curd Benefits And Side Effects : दही खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. विशेषतः दह्यामध्ये असलेले ‘प्रोबायोटिक्स’ (गुड बॅक्टेरिया) पचनसंस्था उत्तम ठेवण्यास मदत करतात. मात्र, खूप थंड दही खाल्यास फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. आयुर्वेदानुसार, थंड दही पचायला जड असते आणि त्यामुळे शरीरात कफ किंवा बलगम वाढू शकतो. याचविषयी एका हिंदी वृत्तसंस्थेशी बोलताना कॅन्सर हीलर सेंटरचे डायरेक्टर डॉ. तरंग कृष्णा यांनी फ्रिजमधील थंड दही लगेच का खाऊ नये आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
थंड दही का खाऊ नये?
फ्रिजमधून काढल्या काढल्या लगेच दही खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो; कारण जास्त थंड दही आपल्या पचनसंस्थेची गती मंदावते आणि शरीरात कफ दोष वाढवते. तसेच, फ्रिजचे काम फक्त दही टिकवून ठेवणे आहे, त्याची गुणवत्ता वाढवणे नाही. दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक बॅक्टेरिया तापमानानुसार सक्रिय असतात.
सामान्य तापमानातील दही का खावे?
डॉ. तरंग कृष्णा यांच्या मते, मायक्रोबायोलॉजी अभ्यास सांगतो की, दह्यातील ‘गुड बॅक्टेरिया’ हे सामान्य तापमानाला सर्वात जास्त सक्रिय असतात. म्हणूनच, दही खाण्यापूर्वी काही वेळ ते फ्रिजमधून बाहेर काढून रूम टेम्परेचरवर आल्यावरच खाल्ले पाहिजे.
दही खाण्याची योग्य पद्धत:
अर्धा तास आधी फ्रिजमधून काढा: दही खाण्याच्या किमान अर्धा ते एक तास आधी फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा. ते सामान्य तापमानावर आल्यावरच त्याचे सेवन करा.
दिवसा किंवा दुपारी खावे: दह्याचे सेवन नेहमी दुपारी जेवणाबरोबर करावे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट शांत राहते. तुम्ही दह्यात भाजलेले जिरे आणि काळी मिरी पूड टाकूनही खाऊ शकता.
रात्री दही खाणे टाळा: रात्रीच्या वेळी दही खाणे पूर्णपणे टाळावे. रात्री दही खाल्यास सर्दी, खोकला, कफ किंवा पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
ताजे दही वापरा: नेहमी ताजे आणि गोड दहीच वापरावे. जास्त आंबट किंवा शिळे दही आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
