Work From Office VS Work From Home: गेल्या काही वर्षांत कोरोना महामारीमुळे ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘रिमोट वर्किंग’ हे प्रकार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. महामारीमुळे लोकांना घराबाहेर पडता येत नव्हते, ज्यामुळे लोकांनी घरून काम करण्याचा सोईस्कर मार्ग निवडला. तेव्हापासून आतापर्यंत अजूनही काही जणांना ऑफिसकडून घरून काम करण्याची परवानगी देण्यात येत आहे. आता घरून काम करण्याची क्रेझ लक्षणीयरीत्या वाढली असतानाच, कालांतराने त्याचा मानसिक परिणामही दिसून आला आहे. परिणामी, घरून काम आणि ऑफिसमधून काम या दोन्ही ठिकाणांवरून करण्यात येणाऱ्या कामांची तुलनात्मक चर्चा केली जाते.
मानसिक परिणामांच्या दृष्टीने कोणता पर्याय अधिक चांगला आहे? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, घरून काम करणे आणि कार्यालयातून काम करणे यांचे मानसिक परिणाम वैयक्तिक पसंती, व्यक्तिमत्त्वाचा प्रकार आणि कामाच्या वातावरणानुसार लक्षणीयरीत्या बदलू शकतात.
घरून काम करण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत?
घरून काम करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये लवचिकता आणि स्वायत्तता यांचा समावेश आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या वेळापत्रकावर नियंत्रण ठेवता येते, ज्यामुळे कामाचे आणि वैयक्तिक आयुष्याचे संतुलन अधिक चांगले साधले जाते. तसेच, यामुळे तणाव कमी होतो आणि त्यांना स्वतःची व त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी अधिक वेळ मिळतो.
प्रवासातील ताण : रोजचा प्रवास टाळल्याने थकवा कमी होतो आणि वैयक्तिक कामांसाठी अधिक वेळ मिळतो. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते.
वैयक्तिकृत कामाचे ठिकाण: आरामदायक आणि वैयक्तिकृत वातावरण निर्माण केल्याने तणाव कमी होऊ शकतो.
परंतु, हेदेखील लक्षात घेण्यासारखे आहे की, सतत घरून काम केल्याने अनेक समस्यादेखील उदभवू शकतात. त्यात एकटेपणा ही एक मोठी चिंता आहे. सतत घरून काम केल्याने सामाजिक संपर्क लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो आणि एकटेपणा वाढू शकतो. इतकेच नाही, तर विलगतेच्या भावनेमुळे नैराश्यही वाढू शकते.
काम आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवण्यात अडचण : सतत घरून काम केल्यामुळे काम आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवणे कठीण होऊ शकते, ज्यामुळे कामाचा ताण लक्षणीयरीत्या वाढू शकतो.
ऑफिसमध्ये काम करण्याचे फायदे आणि तोटे
ऑफिसमधून काम करण्याच्या फायद्यांमध्ये वाढलेल्या सामाजिक संवादाचा समावेश आहे, ज्यामुळे सहकाऱ्यांसोबतचे संबंध दृढ होतात आणि एकाकीपणाही कमी होतो.
दिनचर्या ठरवणे: ऑफिसमधून काम करण्यासाठी दिनचर्या ठरवणे आवश्यक आहे. त्यामुळे मनाला अधिक विचार करण्यास वाव मिळतो आणि सर्जनशीलतेला चालना मिळते.
वाढलेला परस्पर समन्वय: कार्यालयातून काम केल्यामुळे लोकांशी अधिक संवाद साधला जातो, ज्यामुळे परस्पर समन्वयातही सुधारणा होते.
ऑफिसमधून काम करण्याची स्वतःची अशी काही आव्हाने आहेत. प्रवासामुळे येणारा थकवा ही एक सामान्य समस्या आहे. घर आणि ऑफिस यांच्यामधील लांबच्या अंतरामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तणाव वाढतो आणि वैयक्तिक वेळेत घट होते.
कार्यालयीन घडामोडी: कार्यालय सर्व प्रकारच्या लोकांनी भरलेले असते. तिथे तुमचे हितचिंतक तर असतातच; पण त्याचबरोबर तुमच्याबद्दल नकारात्मक विचार करणारे लोकही मोठ्या संख्येने असतात. मोठ्या संख्येने असलेले नकारात्मक लोक एक अत्यंत नकारात्मक वातावरण निर्माण करू शकतात, ज्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
घरून काम करणे चांगले की ऑफिसमधून काम करणे?
तज्ज्ञांच्या मते, या प्रश्नाचे कोणतेही निश्चित उत्तर नाही. दोन्ही बाजू आपापल्या परीने योग्य आहेत. परंतु, यापैकी कोणत्याही एकामध्ये सातत्याने गुंतल्याने तणाव वाढू शकतो. त्यांनी स्पष्ट केले की, अंतर्मुखी आणि स्वातंत्र्याला महत्त्व देणाऱ्यांसाठी घरून काम करणे अधिक चांगले असू शकते. तर दुसरीकडे, बहिर्मुखी किंवा ज्यांना सामाजिक संपर्क आवडतो, ते कार्यालयात अधिक आनंदी राहू शकतात.
