Sleeping With Bra Good Or Bad : रात्री झोपताना ब्रा घालावी की नाही, हा प्रश्न वारंवार महिलांच्या मनात येतो. इंटरनेटवर याबद्दल तुम्हाला वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते वाचायला मिळतील. त्यामुळे या विषयावर बहुतांश महिलांच्या मनात गोंधळ असतो. अनेक ठिकाणी तुम्ही ऐकले असेल की रात्री ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होत नाही, तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की रात्री ब्रा न घातल्यास त्याचा परिणाम ब्रेस्टच्या आकारावर (शेप) होऊ शकतो.

आज डॉक्टरांच्या सल्ल्याने या सर्व शंका दूर करूया. रात्री ब्रा घालून झोपणे गरजेचे आहे की हा केवळ एक गैरसमज आहे, आणि याचा ब्रेस्ट हेल्थवर काही परिणाम होतो का, याबद्दल हेल्थ अँड वेलनेस तज्ज्ञ डॉ. सोनू खोखर (MBBS) यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली आहे.

रात्री ब्रा घालून झोपावे की नाही?

डॉ. सोनू खोखर यांच्या मते, रात्री ब्रा घालून झोपायचे की नाही, हे पूर्णपणे तुमच्या कम्फर्टवर (सोयीवर किंवा आरामावर) अवलंबून आहे.

  • आराम आणि सपोर्ट: काही महिलांना ब्रा न घालता झोपल्यास छातीत ताण जाणवतो, तर सपोर्टिव्ह ब्रा घालून झोपल्याने आराम वाटतो. अशा महिला रात्री ब्रा घालून झोपणे पसंत करतात.
  • त्वचेची काळजी: काही महिलांना रात्री ब्रा न घालता झोपल्यास जास्त हलके आणि आरामदायी वाटते. यामुळे ब्राच्या पट्ट्यांमुळे त्वचेवर येणारे पुरळ (रॅशेस) किंवा जळजळ होत नाही.

त्यामुळे ब्रा घालून झोपायचे की काढून, हा निर्णय तुम्ही तुमच्या सोयीनुसार घ्यावा. याचा ब्रेस्ट हेल्थशी कोणताही थेट संबंध नाही.

रात्री ब्रा न घालता झोपण्याचे फायदे

  • रात्री ब्रा न घातल्यास ब्रेस्टच्या आसपासच्या भागात रक्तभिसरण (ब्लड सर्क्युलेशन) चांगले राहते आणि त्वचेलाही श्वास घ्यायला मिळतो.
  • दिवसभर ब्रा घातल्यामुळे ब्रेस्ट एरियामध्ये घाम जमा होतो, ज्यामुळे फंगल इन्फेक्शनचा (बुरशीजन्य संसर्गाचा) धोका वाढू शकतो. त्यामुळे रात्री ब्रा काढून झोपणे जास्त फायदेशीर ठरते.

ब्रा घालून झोपल्याने ब्रेस्टच्या आकारावर परिणाम होतो का?

तज्ज्ञांच्या मते, झोपताना ब्रा घातल्याने किंवा न घातल्याने ब्रेस्टच्या आकारावर (शेप किंवा साईज) कोणताही परिणाम होत नाही. ब्रा न घालता झोपल्याने ब्रेस्टची त्वचा सैल पडते असा जो समज आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे.

झोपताना कशी ब्रा वापरावी?

जर तुम्हाला रात्री ब्रा घालून झोपायला आवडत असेल, तर हलक्या आणि मऊ कापडाची ब्रा वापरा. खूप घट्ट किंवा वायर असलेली (Underwire) ब्रा घालून झोपू नका. रात्रीच्या वेळी कॉटनची लाईट ब्रा वापरणे सर्वात उत्तम मानले जाते.