Coffee For Liver Health : जगभरातील अनेकांची सकाळ कॉफीचा एक कप प्यायल्याशिवाय पूर्ण होत नाहीँ; पण ही सवय यकृतावर नेमका काय परिणाम करते हे तुम्ही कधी जाणून घेतलं आहे का? याच विषयावर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी सकाळी एक कप कॉफी पिण्याचा यकृतावर काय परिणाम होतो याविषयीची माहिती दिली आहे.
सकाळी एक कप कॉफी पिणे यकृतासाठी कसे फायदेशीर?
१) यकृताच्या आरोग्यास फायदेशीर:
डॉ. सेठी यांच्या मते, “यकृताच्या आरोग्यासाठी कॉफी हे सर्वोत्तम पेयांपैकी एक आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, नियमित कॉफी पिणाऱ्यांमध्ये लिव्हर सिरोसिसचा धोका ४४ टक्क्यांनी कमी होऊ)शकतो.”
लिव्हर सिरोसिस ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये यकृतावर गंभीर व्रण पडतात. हे बहुतेकदा दीर्घकाळ मद्यपान, क्रॉनिक हेपॅटायटिस बी किंवा सी, किंवा फॅटी लिव्हर डिसीजमुळे होते. या नुकसानीमुळे यकृत योग्यरीत्या कार्य करणे थांबवते आणि हे नुकसान पूर्णपणे पूर्ववत करता येत नाही.
२) यकृत एंझाइम्स सुधारते:
दररोज सकाळी कॉफी प्यायल्याने यकृत एंझाइमची पातळीदेखील सुधारू शकते. नियमित कॉफी प्यायल्याने यकृताच्या कार्याचे प्रमुख निर्देशक असलेले ALT आणि AST चे स्तर कमी होतात, असे दिसून आले आहे, असे डॉ. सेठी म्हणाले.
३) फॅटी लिव्हरपासून बचाव:
दररोज सकाळी कॉफी प्यायल्याने फॅटी लिव्हरच्या आजाराशी लढण्यासही मदत होऊ शकते. डॉ. सेठी यांच्या मते, “NAFLD (नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज) आता अंदाजे दर तीन प्रौढांपैकी एकाला होतो आणि कॉफी हे अशा काही मोजक्या पेयांपैकी एक आहे, ज्याबद्दल ठोस आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय पुरावे उपलब्ध आहेत.”
४) डिकॅफ कॉफीचेही फायदे:
प्रचलित समजुतीच्या विरुद्ध कॉफी पिण्याचे फायदे केवळ त्यातील कॅफिनपुरते मर्यादित नाहीत. डॉ. सेठी यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, रेग्युलर आणि डिकॅफ कॉफी दोन्ही आरोग्यदायी आहेत. ते म्हणाले, “असे दिसते की, हा संरक्षणात्मक प्रभाव केवळ कॅफिनमुळे नाही, तर तो प्रामुख्याने पॉलीफेनॉलमुळे आहे; अभ्यासातून असे दिसून आले आहे की, डिकॅफ कॉफी पिणाऱ्यांच्या यकृतातील एंझाइम्समध्येही अशीच सुधारणा होते.”
