Mutton-Chicken Masala vegetarian or non-vegetarian: पदार्थांची चव वाढविण्यासाठी विविध पदार्थांचे मिश्रण असलेले मसाले बाजारात उपलब्ध असल्याचे आढळून येते. असाच एक लोकप्रिय मसाला म्हणजे मटण (मीट) मसाला, जो मटणाचा रस्सा घट्ट करण्यासाठी अथवा तो अधिक स्वादिष्ट करण्यासाठी वापरला जातो. त्याचा सुगंध इतका तीव्र असतो की, अनेक लोक त्यांच्या रोजच्या आमटी आणि डाळीमध्ये थोडा मटण मसाला घालतात. तथापि, हा मसाला मांसाहारी आहे की नाही. हा एक नेहमी आढळणारा संभ्रम आहे. बऱ्याचा लोकांना वाटते की, हा मटण मसाला असल्यामुळे, मसाल्याचा सुगंध आणि चव दोन्ही वाढविण्यासाठी त्यात काहीतरी मांसाहारी पदार्थ घातले गेले असणार. याच कारणामुळे लोक अनेकदा त्यांच्या रोजच्या आमटीमध्ये त्याचा वापर करणे टाळतात; पण तो मसाला खरंच मांसाहारी आहे की शाकाहारी? हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया
मटण मसाला म्हणजे काय?
मटण मसाला हे विशिष्ट मसाल्यांचे मिश्रण आहे, ज्यात लवंग, दालचिनी, धणे, लाल मिरची, काळी मिरी, आमचूर पावडर इत्यादी विविध प्रकारचे सुके आणि सुगंधी मसाले असतात. वेगवेगळ्या कंपन्या आपापल्या आवडीनुसार त्यातील घटकांचे प्रमाण ठरवतात. हा मसाला बहुधा मटणाच्या रश्शामध्ये वापरला जातो, ज्यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध अशा दोन्हींमध्ये वाढ होऊन, तो पदार्थ चवदार होतो. अनेक लोक त्याचा शाकाहारी पदार्थांमध्येही वापर करतात. कारण- त्यामुळे साध्या जेवणाचीही चव वाढते.
मटण मसाला मांसाहारी आहे का?
अनेक शाकाहारी लोक त्यांच्या आमटीत मटण मसाला घालणे टाळतात. कारण- त्यांना वाटते की तो मांसाहारी आहे. तथापि, हे खरे नाही. मटण मसाल्यामध्ये कोणतेही मांस किंवा मांसाहारी घटक नसतात. ते केवळ सुक्या मसाल्यांचे मिश्रण असते, जे विशेषतः मटण, चिकन आणि इतर मांसाहारी पदार्थ बनविण्यासाठी वापरले जाते.
तुम्ही पॅकेटवरील लेबल पाहून शोधू शकता
केवळ नावावरून एखादा मसाला शाकाहारी आहे की मांसाहारी, हे ठरविणे योग्य नाही. त्याऐवजी मसाल्याच्या पाकिटावरील लेबल तपासणे उत्तम. जर पाकिटावर तो मसाला शाकाहारी असल्याचे हिरव्या रंगाने दर्शविलेले असेल, तर तो मसाला पूर्णपणे शाकाहारी असतो. बाजारात मिळणाऱ्या अशा स्वरूपाच्या मसाल्यांच्या पाकिटांवरही अनेकदा अशाच हिरव्या रंगाने स्पष्ट केलेले असते. जे स्पष्टपणे दर्शवते की, तो मसाला पूर्णपणे शाकाहारी आहे. याचा अर्थ, त्यात कोणत्याही प्रकारचा मांसाहारी घटक नसतो.
मटण मसाला शाकाहारी भाज्या बनवण्यासाठी वापरता येतो का?
तुम्ही डाळ किंवा भाज्या बनवण्यासाठीसुद्धा मटण मसाला वापरू शकता. जर तुम्हाला जेवण थोडे मसालेदार आवडत असेल, तर तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणाला एक वेगळी चव देण्यासाठी मटण मसाला वापरू शकता.
