Blood pressure: उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. आता तर ती तरुण वयातही आढळून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टर औषधे लिहून देतात. औषधांमुळे आराम मिळाल्यानंतर काही लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता, ती घेणे बंद करतात. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो का? यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढू शकतो का? चला, एका डॉक्टरकडून याबद्दल अधिक जाणून घेऊया…
सर गंगा राम हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रजत मोहन यांनी ‘आजतक.इन’शी याबद्दल संवाद साधला. ते म्हणतात की, रक्तदाब दीर्घकाळ वाढलेला राहिल्यास त्याचा हृदयावर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे सुरू केली जातात. मात्र, जीवनशैली आणि आहारात बदल करूनही रक्तदाब सतत वाढलेला राहिल्यास आणि त्यात सुधारणा न झाल्यास ही औषधे सुरू केली जातात.
प्रत्येकालाच रक्तदाबाच्या गोळ्यांची लगेच गरज नसते?
डॉ. रजत मोहन यांच्या मते, रक्तदाबाचे औषध सुरू करायचे की नाही, हे डॉक्टर ठरवतात. केवळ एकदा रक्तदाब वाढला म्हणून कोणीही स्वतःहून औषधोपचार सुरू करू नये. डॉक्टर बहुधा ठरावीक कालावधीत रक्तदाबाची तपासणी करण्याची शिफारस करतात. जर वेगवेगळ्या दिवशी अनेक वेळा रक्तदाब वाढलेला आढळला, तर ते औषधोपचार सुरू करण्याची शिफारस करू शकतात.
नेहमीच रक्तदाबाची औषधे घ्यावी लागतात का?
जर एखादी व्यक्ती लठ्ठ असेल आणि वजन कमी केल्यानंतर तिचा रक्तदाब सामान्य होत असेल, तिचा आहार व जीवनशैली आरोग्यदायी असेल आणि तिचा रक्तदाब सातत्याने नियंत्रणात राहत असेल, तर काही प्रकरणांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदाबाची औषधे कमी केली जाऊ शकतात किंवा बंद केली जाऊ शकतात; परंतु हा निर्णय रुग्णाने स्वतः कधीही घेऊ नये.
औषध घेणे बंद केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका आहे का?
डॉ. रजत सांगतात की, जर तुमच्या डॉक्टरांनी रक्तदाबाचे औषध सुरू केले असेल, तर तुम्ही ते स्वतःहून बंद करू नये. अनेक लोक रक्तदाब सामान्य झाल्यावर लगेच गोळी घेणे थांबवतात. त्यामुळे त्यांचा रक्तदाब पुन्हा वाढू शकतो. औषधोपचार अर्ध्यावर थांबवल्याने आणि रक्तदाब सतत वाढलेला राहिल्याने हृदयरोग आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढू शकतो.
