Does Sweating Reduce Fever : ताप आल्यावर औषध घेतल्यानंतर तीव्र घाम येतो, ज्यामुळे शरीर थंड होते आणि तापमान सामान्य होते. यामुळे अनेक लोकांचा असा समज होतो की, घाम आल्यानेच ताप कमी होतो. यासाठी अनेकदा लोक औषध न घेता केवळ घाम आणण्यासाठी अंगावर जाड गोधडी किंवा ब्लँकेट घेऊन झोपतात. त्यांना वाटते की, उष्णतेमुळे घाम येईल आणि ताप उतरेल, तसेच घामाद्वारे शरीरातील संसर्ग (इन्फेक्शन) वाहून जाईल. परंतु, खरोखरच असे होते का? डॉक्टरांकडून जाणून घेऊ…

दिल्लीतील पीएसआरआई (PSRI) हॉस्पिटलच्या पल्मोनरी, क्रिटिकल केअर आणि स्लीप मेडिसिनच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. नीतू जैन यांनी एका हिंदी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, जबरदस्तीने किंवा मुद्दाम घाम आणणे ही शरीरातील संसर्गाशी लढण्याची योग्य पद्धत नाही. ताप आल्यावर शरीराचे तापमान आधीच वाढलेले असते. अशा वेळी जास्त कपडे घालणे किंवा जाड गोधडी घेऊन झोपल्याने संसर्ग किंवा ताप लवकर बरा होत नाही.

तापात जबरदस्तीने घाम आणणे का धोकादायक?

डॉ. जैन यांच्या मते, जास्त घाम आल्यास तुमची प्रकृती अधिक बिघडू शकते. तापामुळे आधीच शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते, त्यातच जबरदस्तीने घाम आणल्यास डिहायड्रेशनचा (शरीरातील पाणी कमी होणे) धोका वाढतो. यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते. जास्त उष्णतेमुळे शरीराचे तापमान अधिक वाढू शकते. ताप उतरताना नैसर्गिकरीत्या घाम येणे सामान्य आहे, परंतु स्वतःहून घाम आणण्याचा प्रयत्न करणे हा संसर्गावरील उपाय नाही.

ताप उतरताना घाम का येतो?

ताप कमी झाल्यावर घाम येणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. डॉ. जैन सांगतात की, जेव्हा शरीर आपले तापमान पुन्हा सामान्य स्तरावर आणण्याचा प्रयत्न करते, तेव्हा अतिरिक्त उष्णता बाहेर टाकण्यासाठी ही नैसर्गिक पद्धत वापरली जाते. याचा अर्थ असा अजिबात नाही की संसर्ग घामावाटे बाहेर पडत आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर घाम येणे हे ताप कमी होत असल्याचे लक्षण असू शकते, परंतु मुद्दाम घाम आणल्याने ही प्रक्रिया जलद होत नाही.

ताप आल्यावर काय करावे?

शरीराचे तापमान आणखी वाढवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पुरेसा आराम करावा. भरपूर प्रमाणात पाणी, ज्यूस, सूप प्यावेत, हलके आणि हवेशीर कपडे घालावेत. घरातील तापमानही आरामदायी असावे. तापामुळे जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासिटामॉल घेऊ शकता. जबरदस्तीने घाम आणण्याऐवजी तापाच्या मूळ कारणावर लक्ष देणे आवश्यक आहे.

ताप हे लक्षण आहे, आजार नाही!

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताप हे एका आजाराचे लक्षण आहे, स्वतः आजार नाही; त्यामुळे ताप आल्यास त्यामागील मूळ कारण शोधणे गरजेचे आहे. खूप तीव्र ताप जो अनेक दिवस राहतो किंवा सतत वाढतो, त्यावर घरीच उपचार करू नयेत. तापासह श्वास घेण्यास त्रास होणे, गोंधळ उडणे, अतिशक्तपणा, सतत उलट्या होणे किंवा तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे दिसल्यास पांघरूण ओढून झोपण्याऐवजी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.