उन्हाळ्यातील दुपार कलिंगडाशिवाय अपूर्ण वाटते. गोड चव, भरपूर पाणी आणि शरीराला मिळणारा थंडावा यामुळे हे फळ उन्हाळ्यात सर्वाधिक पसंत केले जाते. सुमारे ९०% पाण्याचे प्रमाण असलेले कलिंगड शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करते. याशिवाय त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लायकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा, दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर ठरतात.
मात्र, कलिंगडाची वाढती मागणी लक्षात घेता काही ठिकाणी कृत्रिम रंग किंवा रसायनांची भेसळ केल्याच्या घटना समोर येतात. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) नुसार, काही विक्रेते कलिंगड अधिक लाल आणि ताजे दिसावे म्हणून एरिथ्रोसिन (Erythrosine) (Red No.3 – E127) या कृत्रिम रंगाचा वापर करतात, जो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
तुमचे कलिंगड सुरक्षित आहे का? अशी करा सोपी चाचणी
कापूस चाचणी (Cotton Test):
१. कलिंगड दोन भागांमध्ये कापा.
२. कापसाचा एक छोटा बोळा घ्या.
३. तो कलिंगडाच्या लाल गरावर हलक्या हाताने चोळा.
परिणाम कसा ओळखाल?
जर कापसाचा रंग बदलला नाही, तर कलिंगड नैसर्गिक असण्याची शक्यता जास्त.
जर कापूस लाल झाला, तर कृत्रिम रंग वापरल्याची शक्यता असू शकते.
पाण्याची चाचणी: रंग मिसळले आहे का ते ओळखा
१. कलिंगडाचा थोडा लाल गर काढा.
२. तो एका ग्लास पाण्यात टाका.
परिणाम:
पाणी लगेच लाल झाले, तर रंग मिसळलेला असण्याची शक्यता.
नैसर्गिक कलिंगड साधारणपणे पाण्यात रंग सोडत नाही.
बियांचे निरीक्षण करा
नैसर्गिक कलिंगडाच्या बिया साधारणपणे काळ्या किंवा तपकिरी असतात. जर बिया लाल किंवा गुलाबी दिसत असतील, तर ते कृत्रिम रंगामुळे असू शकते. हा भेसळ ओळखण्याचा सोपा आणि स्पष्ट मार्ग मानला जातो.
एरिथ्रोसिन म्हणजे काय? आणि त्याचे दुष्परिणाम
एरिथ्रोसिन (Red No.3 – E127) हा एक कृत्रिम लाल खाद्यरंग आहे, जो काही पदार्थांना आकर्षक रंग देण्यासाठी वापरला जातो.
संभाव्य दुष्परिणाम:
- थायरॉईड ग्रंथीवर परिणाम होण्याची शक्यता
- हार्मोन्सच्या कार्यात अडथळा
- काही मुलांमध्ये अतिचंचलता आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी
- त्वचेवर पुरळ, खाज किंवा अॅलर्जी प्रतिक्रिया
महत्त्वाची सूचना
भेसळ टाळण्यासाठी नेहमी विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच कलिंगड खरेदी करा आणि वरील सोप्या चाचण्या करून खात्री करा. अशा साध्या सवयींमुळे उन्हाळ्यातील तुमचा आहार अधिक सुरक्षित ठेवता येऊ शकतो.
