washroom hygiene tips when travelling via trains : तुम्ही रेल्वेने प्रवास करत आहात? तुमची सीट निश्चित झाली आहे, खाण्यापिण्याचे सामान सोबत घेतले आहे आणि मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेले चित्रपट किंवा शो देखील तयार आहेत. पण लांबच्या रेल्वे प्रवासात एक अशी गोष्ट असते ज्याचे नियोजन आधीच करणे नेहमीच शक्य नसते, आणि ती म्हणजे ट्रेनमधील वॉशरूम.
रेल्वेने प्रवास करणे अनेकांसाठी परवडणारा आणि सोयिस्कर पर्याय आहे. रेल्वे प्रवास अजूनही सर्व सामान्यांच्या खिशाला पडवणार आहे त्यामुळे आजही लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पण रेल्वे प्रवासात सर्वात गोष्ट म्हणजे टॉयलेट. अर्थात लांबच्या प्रवासामध्ये टॉयलेटची सोय असणे हे सोयीस्कर असले तरी टॉयलेट स्वच्छ असेल याची काही गँरटी नसते. त्यामुळे अनेकदा लोक रेल्वे प्रवासादरम्यान टॉयलेटला जाणे टाळतात किंवा रेल्वे प्रवासा दरम्यान टॉयलेट वापरल्यानंतर त्यांना त्रास होतो.
ट्रेनमधील स्वच्छतागृहांचा वापर अनेक प्रवासी एकत्र करतात. त्यामुळे तुम्ही तेथील कोणत्या वस्तूंना स्पर्श करता, तुमचे सामान कुठे ठेवता आणि आल्यानंतर हात कसे स्वच्छ करता, याबद्दल सतर्क असणे साहजिकच आहे. पण यासाठी तुम्हाला फार मोठे नियम पाळण्याची किंवा साबण-फिनाईलने भरलेली बॅग सोबत घेऊन फिरण्याची अजिबात गरज नाही.
काही अतिशय सोप्या सवयी आणि सोबत ठेवलेली एक छोटी ‘हायजीन किट’ (स्वच्छतेचे साहित्य) यामुळे वॉशरूमचा हा अनिवार्य वापर खूप सोपा आणि सुरक्षित होऊ शकतो. नळ व दाराचे कडी-कोयंडे हाताळण्यापासून ते सोबत कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि मासिक पाळीच्या काळात महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल तज्ज्ञांनी दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत.
१. हात नीट धुवा — आणि कोणत्या गोष्टींना स्पर्श करतोय याचे भान ठेवा (Wash your hands properly — and be mindful of what you touch)
ट्रेनमध्ये स्वच्छतेचा सर्वात मूलभूत आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे शौचाला जाऊन आल्यानंतर आणि जेवण्यापूर्वी तुमचे हात योग्य पद्धतीने साफ करणे.
ग्लेनईगल्स हॉस्पिटलच्या फिजिशियन डॉ. आरती उल्लाल सांगतात की, “वाहत्या पाण्यात साबण लावून व्यवस्थित हात धुणे हा जंतू नष्ट करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कमीत कमी २० सेकंद हात धुतले पाहिजेत, ज्यामध्ये तळहात, हाताची मागील बाजू, बोटांमधील जागा आणि नखांचा भाग व्यवस्थित साफ होईल.
हात धुतल्यानंतर वॉशरूमचे दार उघडताना शक्य असल्यास टिश्यू पेपरचा वापर करा. पण जर तुमचा थेट दाराला स्पर्श झाला तरी लगेच घाबरून जाण्याचे कारण नाही. एखाद्या अस्वच्छ पृष्ठभागाला स्पर्श झाला म्हणजे लगेच संसर्ग होतोच असे नाही, तर मुख्य धोका हा तेच अस्वच्छ हात आपल्या तोंडाला, नाकाला किंवा डोळ्यांना लावल्यामुळे होतो. म्हणूनच वॉशरूममध्ये असताना चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळा आणि काहीही खाण्यापूर्वी हात नक्की धुवा.
२. स्वतःचे छोटे हायजीन किट सोबत ठेवा (Carry your own little hygiene kit)
एन वेळी वॉशरूममध्ये वस्तू नसताना होणाऱ्या फजितीपासून वाचण्याचा सोपा उपाय म्हणजे स्वतःचे स्वच्छतेचे सामान सोबत बाळगणे.
डॉ. उल्लाल यांच्या मते, “प्रवासात अल्कोहोल-बेस्ड हँड सॅनिटायझर, लिक्विड सोप किंवा सोप स्ट्रिप्स (साबणाचे कागद), टिश्यूज, टॉयलेट पेपर, वेट वाइप्स, जंतूनाशक पुसणी (डिसइन्फेक्टंट वाइप्स) आणि वापरलेले टिश्यूज टाकण्यासाठी एक छोटी कचरा पिशवीसह ठेवावी. जर तुमच्यासह लहान मुले किंवा वृद्ध असतील तर थोडे अतिरिक्त साहित्य सोबत ठेवणे फायदेशीर ठरते.”
ट्रेनच्या वॉशरूममध्ये साबण किंवा पाणी संपले असल्यास, किमान ६० टक्के अल्कोहोल असणारे हँड सॅनिटायझर खूप उपयुक्त ठरते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, सॅनिटायझर हे हात दृश्य स्वरूपात घाण नसताना वापरण्यासाठी चांगले असते; जर हातावर धूळ किंवा माती लागली असेल तर ते साबण आणि पाण्याची जागा घेऊ शकत नाही.
३. प्रत्येक पृष्ठभागाची भीती बाळगू नका, फक्त नंतर चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा (Don’t panic about every surface — just avoid touching your face afterwards)
वॉशरूममधील नळ, दाराच्या कड्या आणि इतर वस्तू अनेक लोकांनी हाताळलेल्या असल्याने त्यावर भीती वाटणे उघड आहे. या वस्तूंवर जंतू असू शकतात यात शंका नाही, पण त्यांना स्पर्श झाला म्हणजे तुम्ही आजारी पडणारच असे नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या अस्वच्छ वस्तूंच्या संपर्कात आलेले हात नाक, डोळे किंवा तोंडापर्यंत पोहोचू न देणे. तुम्हाला अधिक सुरक्षित वाटण्यासाठी तुम्ही नळ किंवा दाराची कडी उघडताना टिश्यू पेपरचा वापर करू शकता. याशिवाय, वॉशरूममधील कोणत्याही पृष्ठभागावर किंवा कपाटावर तुमचा फोन, पाण्याची बाटली किंवा खाण्याचे पदार्थ ठेवणे पूर्णपणे टाळा.
४. पायात चप्पल किंवा शूज कायम ठेवा आणि लहान गोष्टींचे भान ठेवा (Keep your footwear on and remember the little things)
दीर्घ प्रवासात थकवा आल्यामुळे प्रवासी अनेकदा या साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. वॉशरूममध्ये कधीही अनवाणी पायाने जाऊ नका. ट्रेनच्या टॉयलेटची फर्शी नेहमी ओली आणि अस्वच्छ असते, त्यामुळे पायात चप्पल किंवा शूज असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे.
तसेच टॉयलेटला झाकण (लिड) उपलब्ध असल्यास फ्लश करण्यापूर्वी ते बंद करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. खाण्यापूर्वी हात न धुणे, वॉशरूमच्या वस्तू वापरल्यानंतर चेहऱ्याला स्पर्श करणे आणि सीटवर आल्यावर अन्न उघडे ठेवणे या काही सामान्य चुका टाळल्या पाहिजेत.
५. मासिक पाळीदरम्यान प्रवास करत असाल तर आधीच नियोजन करा (If you’re travelling during your period, plan ahead)
मासिक पाळी सुरू असल्यामुळे ट्रेनचा प्रवास कठीण झालाच पाहिजे असे नाही. योग्य नियोजन आणि पुरेशा वस्तू सोबत ठेवल्यास हा प्रवास अत्यंत सुकर आणि स्वच्छतेचा होऊ शकतो.
मदरहूड हॉस्पिटल्सच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पवना एच. एन. सांगतात की, महिलांनी प्रवासाच्या कालावधीनुसार पुरेसे सॅनिटरी पॅड्स, टॅम्पॉन्स किंवा इतर उत्पादने आणि काही अतिरिक्त साठा सोबत ठेवावा. सॅनिटरी पॅड्स दर ४ ते ६ तासांनी बदलले पाहिजेत. कोणतेही उत्पादन बदलण्यापूर्वी आणि बदलल्यानंतर हात स्वच्छ धुणे अनिवार्य आहे.
वापरलेले पॅड्स कागदातात व्यवस्थित गुंडाळून कचऱ्याच्या पेटीतच टाकावेत. ट्रेनच्या टॉयलेटमध्ये पॅड्स कधीही फ्लश करू नयेत, यामुळे ड्रेनेज सिस्टीम जाम होऊ शकते. मासिक पाळीच्या प्रवासासाठी पॅड्स, टिश्यू, सॅनिटायझर, वेट वाइप्स, डिस्पोजेबल पिशव्या, अतिरिक्त अंतर्वस्त्रे आणि पाण्याची एक छोटी बाटली असा स्वतंत्र संच तयार ठेवावा. जननेंद्रियाच्या भागावर तीव्र वासाचे साबण वापरणे टाळावे, कारण यामुळे त्वचा सुजणे किंवा संसर्ग होण्याचा धोका असतो.
६. अन्नाला हात लावण्यापूर्वी हात पूर्णपणे स्वच्छ करा (Clean your hands before reaching for your food)
वॉशरूममधून बाहेर आल्यावर लगेच आपल्या सीटवर जाऊन डबा उघडून खाण्याची घाई अनेकदा होते. पण अन्न हाताळण्यापूर्वी हात स्वच्छ असणे अत्यंत गरजेचे आहे.
पुन्हा एकदा साबण आणि वाहत्या पाण्याने २० सेकंद हात धुणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. पाणी उपलब्ध नसल्यास अल्कोहोल-बेस्ड सॅनिटायझर लावा आणि ते हातावर पूर्णपणे सुकू द्या. वॉशरूमचे कडी-कोयंडे किंवा नळ हाताळल्यानंतर लगेच अन्नाला स्पर्श करू नका. अस्वच्छ पृष्ठभागावरून हातावर आलेले जंतू पोटात किंवा चेहऱ्यावर जाणार नाहीत याची काळजी घेतली की तुमचा प्रवास निरोगी आणि सुरक्षित राहील.
