पावसाचे आगमन जवळ येत असले तरी आजही प्रखर उन्हाचा सामना हा करावाच लागतोय. उन्हाळ्यात सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याची आणि हातांची चमक कमी होऊ लागते. तसंच टॅनिंगची समस्या निर्माण होते. अनेकजण यासाठी वेगवेगळे उपाय करतात पण त्याचा फायदा होत नाही. चेहऱ्यावरील डाग दूर करताना चेहरा टवटवीत करायचा असेल तर यासाठी पुदिन्याच्या पानांचा वापर तुम्ही करू शकता. पुदिना चेहरा थंड करतो. चला तर मग जाणून घेऊया पुदिन्याने चेहऱ्यावरील डाग कसे दूर करता येतील.

पुदिन्याच्या पानांचा वापर कसा करावा?

पुदिन्यात अँटी-मायक्रोबियल, एंटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यात प्रभावी ठरतात. पुदिना वापरून पुरळ, चेहऱ्यावरील सूज आणि निस्तेजपणाही कमी करता येतो. तर जाणून घ्या पुदिनाच्या पानांचा वापर कसा करायचा.

पुदिना आणि काकडीचा फेस पॅक

हा फेस पॅक बनविण्यासाठी पुदिन्याची काही ताजी पाने घ्या आणि अर्धी काकडी घ्या. काकडी किसून त्याचा रस पिळून घ्या. आता काकडीचा रस आणि पुदिन्याची पाने बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा, मान आणि हातावर तसंच जिथे डाग असतील तिथे लावा आणि २० मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा.

पुदिना, कडुलिंब आणि तुळशीचा फेस पॅक

पुदीना आणि तुळशीचा फेस पॅक त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्याचे काम करतो. यासाठी पुदिना, तुळस आणि कडुलिंबाची काही पाने घ्या. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करा आणि ही पेस्ट तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.