Can Diabetics Eat Jaggery: डायबिटीज म्हणजेच मधुमेह झाल्यानंतर सर्वात मोठं आव्हान असतं ते म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणं. त्यामुळे डॉक्टर सर्वप्रथम एक सल्ला देतात, आहारातील गोड पदार्थांवर नियंत्रण ठेवा. अनेक लोक साखर पूर्णपणे टाळतात, पण त्याऐवजी ‘नैसर्गिक’ समजला जाणारा गूळ वापरायला सुरुवात करतात. गूळ आरोग्यासाठी चांगला असतो, असा समज अनेकांच्या मनात असतो. पण, हा समज काही वेळा धोकादायक ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञ देतात.

दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील एंडोक्राइनोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सप्तर्षी भट्टाचार्य यांनी सांगितलेली एक घटना याचाच प्रत्यय देते. ४२ वर्षांच्या एका महिलेला अलीकडेच टाइप-२ डायबिटीज असल्याचे निदान झाले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने जीवनशैलीत अनेक बदल केले. नियमित चालणे, आहारावर नियंत्रण आणि वेळेवर औषधे घेणे हे सर्व नियम ती पाळत होती.

पण एक गोष्ट तिने स्वतःहून बदलली. तिने आहारातून पांढरी साखर पूर्णपणे काढून टाकली आणि तिच्या जागी गुळाचा वापर सुरू केला. तिच्या मते गूळ हा अधिक आरोग्यदायी पर्याय होता. सकाळच्या चहात साखरेऐवजी गूळ, स्वयंपाकात गूळ आणि जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा झाली की गुळाचा छोटासा तुकडा अशी तिची सवय झाली होती.

सर्व नियम पाळूनही तिच्या रक्तातील साखरेची पातळी मात्र कमी होत नव्हती. उलट काही महिन्यांनंतर तपासणी केली असता तिचे HbA1c ७.२ टक्क्यांवरून ८.५ टक्क्यांपर्यंत वाढलेले दिसले. डॉक्टरांनी सविस्तर आहार तपासला तेव्हा समोर आलेले कारण थोडे आश्चर्यचकित करणारे होते, ती दिवसातून अनेक वेळा गूळ खात होती.

डॉक्टरांनी तिला गुळाचे सेवन पूर्णपणे थांबवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर काही महिन्यांत तिच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ लागली आणि पुढील तपासणीत HbA1c पुन्हा सुमारे ७ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे दिसून आले. या घटनेतून एक महत्त्वाचा धडा मिळतो, गूळ नैसर्गिक असला तरी तो मधुमेहाच्या रुग्णांसाठी पूर्णपणे सुरक्षित असेलच असे नाही.

तज्ज्ञांच्या मते, गूळ हा उसाच्या रसाला उकळून तयार केला जातो. तो साखरेप्रमाणे रासायनिक प्रक्रियेतून जात नसला तरी त्यातील मुख्य घटक जवळपास तेच असतात. गुळामध्ये साधारण ८५ ते ९० टक्के साखर (सुक्रोज) असते, त्यामुळे शरीरात गेल्यावर त्याचा परिणाम साखरेप्रमाणेच होऊ शकतो.

याशिवाय गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्सही जास्त असतो, म्हणजेच तो रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये साखर जास्त वाढल्यास हृदय, मूत्रपिंड, मज्जासंस्था आणि डोळ्यांवर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढतो.

हिवाळ्यात अनेक पदार्थांमध्ये गुळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो; तिळगूळ लाडू, चिक्की, शेंगदाण्याचे बार, गुळाचा हलवा किंवा गुळाचा चहा. हे पदार्थ चविष्ट असले तरी त्यात साखरेचे आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी असे पदार्थ जपून खाणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, गुळाचे रोज जास्त प्रमाणात सेवन केल्यास HbA1c वाढणे, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढणे, पोटाभोवती चरबी साचणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. दीर्घकाळ असे झाले तर फॅटी लिव्हर, हृदयविकार आणि शरीरात सूज वाढण्याचा धोकादेखील वाढू शकतो.

म्हणूनच, गूळ ‘नैसर्गिक’ असला तरी तो पूर्णपणे सुरक्षित आहे असा समज करून घेणे योग्य नाही. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी कोणताही गोड पदार्थ खाण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणेच अधिक सुरक्षित ठरते.