Health benefits of Consuming Jamun Seeds Powder on an Empty Stomach: पावसाळा सुरू झाला की, बाजारात काळसर-जांभळ्या रंगाची जांभळे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. गोड-आंबट चवीमुळे अनेक जण आवडीने जांभळे खातात. मात्र, फळ खाऊन संपताच त्याच्या बिया कचर्यात फेकून दिल्या जातात. पण, तुम्हाला माहीत आहे का, जांभळाइतक्याच त्याच्या बियाही आरोग्यासाठी गुणकारी मानल्या जातात.
आयुर्वेदात जांभळाच्या बियांचा उपयोग अनेक वर्षांपासून केला जात आहे. आता आधुनिक संशोधनातही या बियांमध्ये अनेक जैवसक्रिय घटक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने त्यांचे सेवन केल्यास शरीराला विविध प्रकारचे फायदे मिळू शकतात.
तज्ज्ञ काय सांगतात? (What Experts Say)
पोषणतज्ज्ञ व वजन नियंत्रण तज्ज्ञ लीमा महाजन यांच्या मते, जांभळाच्या बियांमध्ये जॅम्बोलीन (Jamboline), फ्लेवोनॉइड्स (Flavonoids), अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) आणि भरपूर तंतुमय घटक (Fiber) असतात.
त्यांच्या मते, हे घटक नैसर्गिकरीत्या रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास, पचन सुधारण्यास, आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास, त्वचा निरोगी ठेवण्यास आणि वजन नियंत्रणात मदत करू शकतात.
जांभळाच्या बियांचे सेवन कसे करावे? (How To Consume Jamun Seeds)
तज्ज्ञांच्या मते, जांभळाच्या बिया प्रथम स्वच्छ धुवाव्यात. त्यानंतर त्या उन्हात पूर्णपणे वाळवाव्यात. वाळलेल्या बियांची बारीक पूड तयार करून, ती हवाबंद डब्यात साठवून ठेवावी.
रिकाम्या पोटी सकाळी कोमट पाण्यासोबत एक चमचा ही पूड घेण्याची पारंपरिक पद्धत सांगितली जाते.
मात्र, मधुमेह, गर्भधारणा, स्तनपान किंवा इतर दीर्घकालीन आजार असल्यास कोणताही घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
जांभळाच्या बियांचे ५ संभाव्य फायदे (5 Possible Benefits of Jamun Seeds)
१. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत (May Help Manage Blood Sugar)
जांभळाच्या बियांमध्ये असलेले जॅम्बोलीन आणि इतर वनस्पतीजन्य घटक शरीरातील साखरेच्या चयापचयावर सकारात्मक परिणाम करू शकतात.
त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा पर्याय म्हणून याचा वापर करू नये.
२. पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत (Supports Digestion)
या बियांमध्ये तंतुमय घटक मोठ्या प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळू शकते.
अपचन, पोट फुगणे आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठीही या बियांचा उपयोग होऊ शकतो.
३. वजन नियंत्रणात मदत (Supports Weight Management)
तज्ज्ञांच्या मते, या बियांतील फायबर जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते.
त्यामुळे वारंवार भूक लागण्याचे प्रमाण कमी होऊ शकते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.
४. त्वचेसाठी फायदेशीर (Good For Skin Health)
अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेवोनॉइड्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि पेशींचे संरक्षण करण्यास मदत मिळू शकते.
५. संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त (Supports Overall Wellness)
जांभळाच्या बियांमधील पोषक घटक शरीराच्या विविध कार्यांना आधार देतात. नियमित संतुलित आहारासोबत त्यांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
संशोधन काय सांगते? (What Research Says)
Polish Journal of Food and Nutrition Sciences मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, जांभळाच्या बियांमध्ये हायड्रोलायझेबल टॅनिन्स, फिनॉलिक अॅसिड्स, फ्लेवोनॉइड्स, टर्पेनॉइड्स, सॅपोनिन्स आणि इतर जैवसक्रिय घटक आढळतात.
संशोधकांच्या मते, या घटकांमध्ये मधुमेहविरोधी, दाहशामक, अँटिऑक्सिडंट, सूक्ष्मजंतूरोधी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास साह्यभूत ठरण्याची क्षमता असते. तसेच हृदय, यकृत व मेंदूच्या आरोग्यास आधार देणारे गुणधर्म असण्याची शक्यता विविध अभ्यासांमध्ये नोंदवली गेली आहे.
तसेच या बियांमध्ये कार्बोहायड्रेट्स, आहारातील तंतू, खनिजे आणि क जीवनसत्त्वदेखील चांगल्या प्रमाणात असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
जांभळाचे इतरही फायदे (Other Benefits of Jamun Fruit)
- National Library of Medicine मधून मिळालेल्या माहितीनुसार, जांभळामध्ये असलेले जॅम्बोलीन आणि एलॅजिक अॅसिड (Ellagic Acid) हे घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्याची गती कमी करण्यास मदत करू शकतात.
- त्याशिवाय जांभळात भरपूर पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.
- जांभळातील फिनॉलिक संयुगे, फ्लेवोनॉइड्स व अँथोसायनिन्स यांमुळे शरीरातील पेशींचे संरक्षण करण्यास, दाह कमी करण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत मिळू शकते.
- तसेच त्यातील क जीवनसत्त्व आणि लोह हे घटक हिमोग्लोबिन वाढविण्यास आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यास सहायक ठरू शकतात.
डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जांभळाच्या बियांची पूड ही काही लोकांसाठी पूरक ठरू शकते; मात्र ती कोणत्याही आजारावरील औषधाचा पर्याय नाही. विशेषतः मधुमेहाची औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला न घेता, याचे नियमित सेवन करू नये. कारण- रक्तातील साखर अधिक कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
महत्त्वाची सूचना
जांभळाच्या बियांचे संभाव्य फायदे विविध पारंपरिक उपयोग, तज्ज्ञांचे मत आणि उपलब्ध संशोधनावर आधारित आहेत. त्यामुळे सर्वांनाच समान परिणाम मिळतील, याची हमी देता येत नाही. कोणतीही नवीन घरगुती पद्धत किंवा पूरक आहार सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा पात्र आहारतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
