Japanese Parenting Tips : भारतात आजही मूल पाच वर्षांचे होईपर्यंत आईला चिकटून राहते, प्रत्येक गोष्टीसाठी आईवर अवलंबून असते. पण, जपान आणि चीनमध्ये मुलं २ ते ३ वर्षांची झाली की स्वत:ची कामं स्वत: करायला शिकतात, यामुळे मूल हुशार आणि स्वावलंबी होते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की असे का? भारतात पालक मुलांचे संगोपन करण्यात काही कसर सोडत नाहीत, पण काही गोष्टींमुळे त्यांची मुलं त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहतात. पण, जपानी पालकत्वात अशा काही गोष्टी आहेत ज्या मुलांना लहान वयातच स्वावलंबी आणि हुशार बनवतात. जर तुम्हालाही तुमच्या मुलांना हुशार, स्वावलंबी बनवायचे असेल तर खालील जपानी पालकत्वाच्या ५ महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा.
जपानी पालकत्वाच्या ५ खास टिप्स
१) जबाबदारी शिकवा
तुमच्या मुलांना स्वत: सर्व शिकू द्या आणि छोटी काम स्वत: करू द्या. अशाप्रकारे मुलं स्वत:ची कामं स्वत: करायला शिकतील. जेवल्यानंतर ताट उचलून ठेवणे, पाणी आणणे, हात धुणे, कपडे घालणे, स्वत:च्या वस्तू जागच्या जागी ठेवणे या काही छोट्या गोष्टी त्यांना स्वत: करू द्या, यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
२) स्वातंत्र्य द्या
मुलांना स्वत:हून लहान लहान समस्या सोडवू द्या. तुम्ही हस्तक्षेप केल्याने ते प्रत्येकवेळी तुमच्यावर अवलंबून राहतील. जेव्हा त्यांना ती समस्या येईल तेव्हा ते स्वत:च्या मेंदूचा वापर करणार नाहीत आणि तुमच्याकडे धाव घेतील. प्रत्येक अडचणीत त्यांची मदत करायला जाऊ नका.
३) दिनक्रम ठरवा
तुमच्या मुलासाठी योग्य दिनक्रम तयार करा. झोपणे, खाणे, पिणे, खेळणे आणि बाहेर जाणे या सर्वांच्या वेळा निश्चित करा. या गोष्टी रोज केल्यास त्यांना सवय होते आणि ते तसे वागतात, यामुळे राग कमी होतो.
४) भावना शिकवा
तुमच्या मुलांना भावनांबद्दल शिकवण्याचा प्रयत्न करा. जर मूल रडत असेल तर तुम्ही का अस्वस्थ आहात आणि काय होऊ शकते हे त्यांना समजावून सांगा. अशाप्रकारे मुलं आनंद आणि दु:ख यातील फरक समजू शकतील.
५) ओरडू नका, शिकवा
तुमच्या मुलाने कोणतीही चूक केली तर ओरडण्याऐवजी प्रेमाने आणि स्पष्टीकरण देऊन शिकवा. जर त्याने पाणी सांडले तर त्यालाच ते पुसण्यास सांगा, यामुळे ते सक्षम आणि स्वत:ची कामं स्वत: करायला शिकतील. अनेक छोट्या- छोट्या गोष्टींवरून मुलांना ओरडल्यास त्यांच्या मनात चुका करण्याची भीती राहते, त्यामुळे मुलं पालकांच्या रागाची भीती बाळगतात.
