Japanese Trick to Clean Toilet: स्वच्छता करताना आपण फरशी, स्वयंपाकघर, खिडक्या आणि फर्निचरची नियमित स्वच्छता करतो. मात्र, घरातील सर्वांत महत्त्वाची जागा म्हणजे स्वच्छतागृहाची स्वच्छता अनेकदा शेवटी केली जाते. टॉयलेट कितीही स्वच्छ केले तरी काही दिवसांनी सीटवर पिवळसर किंवा तपकिरी थर दिसू लागतो. रिमच्या खाली (टॉयलेटच्या वरच्या कडेच्या आतील बाजूखालील भाग) काळी घाण साचलेली दिसते. ही घाण हटवण्यासाठी अनेकजण तीव्र रासायनिक स्वच्छताद्रव्ये किंवा ब्लीचचा वापर करतात. मात्र, काही दिवसांनी ही समस्या पुन्हा दिसू लागते.
पण तुम्हाला माहिती आहे का, टॉयलेटवर दिसणाऱ्या प्रत्येक डागामागचं कारण एकच नसतं? त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या घाणीसाठी एकच स्वच्छताद्रव्य वापरणे योग्य ठरत नाही. जपानमध्ये मात्र स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यासाठी रोजच्या छोट्या-छोट्या सवयींवर भर दिला जातो. त्यात गरजेनुसार पांढऱ्या व्हिनेगरचा वापरही केला जातो, त्यामुळे घाण साचून त्याचा जाड थर तयार होण्याआधीच ती साफ करण्यास मदत होते.
टॉयलेटवर पिवळा थर नेमका तयार का होतो?
टॉयलेटच्या पाण्याच्या पातळीच्या आसपास पिवळसर किंवा तपकिरी थर दिसला की तो केवळ घाण किंवा जीवाणूंमुळे तयार झाला आहे असे अनेकांना वाटते. मात्र, घरात कठीण पाणी म्हणजेच हार्ड वॉटर येत असेल तर त्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे टॉयलेटच्या पृष्ठभागावर जमा होऊ शकतात.
पाणी वारंवार साचत राहिल्याने या खनिजांचा थर हळूहळू जाड आणि कठीण होतो, यालाच लाइमस्केल किंवा खनिजांचा थर म्हटले जाते, त्यामुळे केवळ ब्लीच टाकणे किंवा ब्रशने जोरात घासणे यामुळे हा थर पूर्णपणे निघेलच असे नाही.
रिमच्या खाली साचलेली काळी घाण वेगळी असते
टॉयलेटच्या रिमच्या खाली दिसणाऱ्या काळ्या थराचे कारण काहीसे वेगळे असते. या भागात पाणी आणि प्रकाश तुलनेने कमी पोहोचतो, त्यामुळे ओलावा, खनिजांचे अवशेष, जीवाणू, बुरशी आणि स्वच्छताद्रव्यांचे उरलेले कण तिथे साचत राहू शकतात. कालांतराने ही घाण जाड होऊन काळसर दिसू लागते, म्हणूनच पाण्याच्या पातळीवरचा पिवळा थर आणि रिमच्या खालील काळी घाण यांच्यासाठी एकच पद्धत वापरण्याऐवजी त्यामागचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे.
टॉयलेट चमकवण्याची जपानी पद्धत काय?
लाइमस्केलसारखा खनिजांचा थर हटवण्यासाठी आम्लधर्मी पदार्थ उपयोगी ठरू शकतात. पांढऱ्या व्हिनेगरमध्ये ॲसिटिक आम्ल असते. हे कॅल्शियम कार्बोनेटच्या खनिज थरावर परिणाम करून तो सैल होण्यास मदत करू शकते.
टॉयलेटच्या स्वच्छतेसाठी पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. मात्र, ही पद्धत प्रामुख्याने हलका किंवा सुरुवातीचा खनिज थर काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
पिवळा थर काढण्यासाठी असा करा वापर
टॉयलेटमध्ये काही आठवडे किंवा काही महिन्यांपासून हलका थर जमा झाला असेल तर साधारण एक कप पांढरा व्हिनेगर टॉयलेटच्या भांड्यात घाला. त्यानंतर एक स्वच्छ कापड किंवा कागदी टॉवेल व्हिनेगरमध्ये भिजवून रिमच्या खाली जिथे थर जमा झाला आहे त्या ठिकाणी लावा.
हे साधारण ३० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर टॉयलेट ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने तो भाग स्वच्छ करा आणि शेवटी पाणी सोडून द्या.
इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थरावर सतत जोर लावून घासण्यापेक्षा व्हिनेगरला काही वेळ काम करू देणे अधिक महत्त्वाचे आहे.
जुना थर असेल तर एका दिवसातच चमत्कार होणार नाही
टॉयलेटवर अनेक महिने किंवा वर्षांपासून जाड थर साचलेला असेल, तर केवळ ३० मिनिटांच्या एका प्रक्रियेत तो पूर्णपणे निघेलच असे नाही. अशा वेळी ही प्रक्रिया पुढील दोन-तीन दिवस पुन्हा करता येऊ शकते.
प्रत्येक वेळी जिद्दी थर थोडा सैल होण्यास मदत होईल आणि हळूहळू तो पृष्ठभाग अधिक स्वच्छ दिसू शकतो.
सर्वांत महत्त्वाची काळजी; व्हिनेगर आणि ब्लीच एकत्र करू नका!
टॉयलेट साफ करताना ही चूक अजिबात करू नका. व्हिनेगर आणि ब्लीच कधीही एकत्र मिसळू नये. व्हिनेगर आम्लधर्मी असते, तर ब्लीचमध्ये क्लोरीनयुक्त रसायने असतात. दोन्ही एकत्र आल्यास विषारी क्लोरीन वायू तयार होऊ शकतो, त्यामुळे डोळ्यांना आणि श्वसनमार्गाला गंभीर त्रास होण्याचा धोका असतो, त्यामुळे वेगवेगळी स्वच्छताद्रव्ये वापरणार असाल तर आधीचे द्रव्य पूर्णपणे पाण्याने वाहून गेले आहे याची खात्री करा आणि स्वच्छतागृहात हवा खेळती ठेवा. शक्यतो वेगवेगळी रसायने एकत्र न वापरणे हाच सुरक्षित पर्याय आहे.
जपानी पद्धतीमागचं खरं गमक काय?
जपानी स्वच्छतेच्या पद्धतीत केवळ अधूनमधून मोठी स्वच्छता करण्यापेक्षा दररोज थोडी स्वच्छता करण्यावर भर दिला जातो. टॉयलेट ब्रशने दररोज किंवा एक दिवसाआड साधारण ३० सेकंद हलक्या हाताने स्वच्छता केल्याने नव्याने तयार झालेला थर घट्ट होण्याआधी हटवण्यास मदत होऊ शकते.
घरात कठीण पाण्याची समस्या असल्यास नियमित स्वच्छता अधिक महत्त्वाची ठरते. महागडे स्वच्छताद्रव्य वापरण्यापेक्षा डाग नेमका कशामुळे तयार झाला आहे आणि त्यासाठी योग्य पद्धत कोणती, हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
(टीप: व्हिनेगर वापरण्यापूर्वी टॉयलेट सीट किंवा पृष्ठभागाच्या उत्पादकाने दिलेल्या सूचना तपासा. काही पदार्थांवर आम्लधर्मी स्वच्छताद्रव्य वापरणे योग्य नसू शकते.)
