Japanese Walking Technique for Weight Loss: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तणाव, वाढतं वजन आणि शरीराची घटती तंदुरुस्ती ही अनेकांची मोठी समस्या बनली आहे. मात्र, जगात एक असा देश आहे, जिथल्या लोकांच्या आरोग्याचा आदर्श अनेक देशांमध्ये दिला जातो. तो देश म्हणजे जपान. जपानी लोकांची दीर्घायुष्याची परंपरा आणि ९०-१०० वर्षांपर्यंत निरोगी राहण्याची क्षमता यामागे त्यांची साधी, पण प्रभावी जीवनशैली मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
जपानी लोक रोजच्या आयुष्यात शरीर सक्रिय ठेवण्यावर भर देतात. विशेष म्हणजे ते फिट राहण्यासाठी चालण्याची एक खास पद्धत वापरतात. ही पद्धत फक्त चालणं नसून शरीर, मन व श्वास यांचा समतोल राखणारी एक प्रकारची माईंडफुल एक्सरसाइज मानली जाते. त्यामुळे जगभरात या वॉकिंग स्टाईलला ‘लाँग लाईफ सीक्रेट’ म्हणूनही ओळख मिळाली आहे.
१. जपानी लोक चालण्याच्या काही वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. त्यापैकी एक म्हणजे फॉरेस्ट वॉकिंग. ही पद्धत म्हणजे हिरव्यागार जंगलात किंवा पार्कमध्ये शांत वातावरणात चालण म्हणतात. निसर्गाच्या सान्निध्यात चालल्यामुळे मन शांत राहतं आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
२. दुसरी पद्धत म्हणजे पोश्चर वॉकिंग. या पद्धतीत चालताना शरीराचं पोश्चर योग्य ठेवण्यावर भर दिला जातो. पाठीचा कणा सरळ, खांदे सैल व डोकं संतुलित ठेवून चालल्यामुळे शरीराची ठेवण सुधारते. त्यामुळे पाठीचा त्रास कमी होतो आणि शरीर अधिक मजबूत बनते.
३. त्याशिवाय जपानी लोक निको-निको वॉकिंगदेखील करतात. या वॉकिंग स्टाईलमध्ये हलक्या स्मितासह शांत आणि आरामदायक गतीनं चाललं जातं. त्यामुळे मन प्रसन्न राहतं आणि तणाव कमी होतो.
जपानी वॉकिंगचे शरीराला मिळणारे फायदे
१. शरीराची ठेवण सुधारते
जपानी वॉकिंगमध्ये पाठीचा कणा सरळ ठेवणं आणि खांदे रिलॅक्स ठेवणं महत्त्वाचं असतं. नियमितपणे ही पद्धत अवलंबल्यास शरीराची ठेवण सुधारते आणि मान-पाठीवरील ताण कमी होतो.
२. रक्ताभिसरण सुधारते
हळू आणि योग्य पद्धतीनं चालल्यानं हृदय आणि शरीरातील अवयवांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे पोहोचतो. त्यामुळे शरीराला आवश्यक ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे मिळतात.
३. कोअर मसल्स मजबूत होतात
चालताना पोट आणि कंबरेच्या स्नायूंवर नैसर्गिक ताण येतो. त्यामुळे कोअर मसल्स मजबूत होतात आणि शरीराचा समतोल सुधारतो.
४. मानसिक तणाव कमी होतो
श्वासावर लक्ष केंद्रित करून शांतपणे चालल्यानं मन स्थिर राहतं. ही पद्धत ध्यानासारखं काम करते आणि मानसिक, तसेच शारीरिक तणाव कमी करण्यास मदत करते.
५. वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत
जपानी वॉकिंग ही हलकी, पण प्रभावी व्यायाम पद्धत मानली जाते. नियमित चालल्यानं कॅलरीज बर्न होतात, मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन नियंत्रणात ठेवणं सोपं होतं.
सोप्या सवयींमध्ये दडलंय निरोगी आयुष्याचं रहस्य
तज्ज्ञांच्या मते, रोज काही वेळ शांतपणे चालण्याची सवय लावली, तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहू शकतात. महागडं जिम किंवा अवघड व्यायाम करण्याऐवजी योग्य पद्धतीनं चालणं हीसुद्धा आरोग्य टिकवण्यासाठी प्रभावी सवय ठरू शकते.
म्हणूनच जपानी लोकांच्या या साध्या सवयीमागेच त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्याचं मोठं रहस्य दडलं आहे, असं अनेक आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
