COVID-19 ची लक्षणं ओळखण्यासाठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आणलेल्या जिओ टूलबाबत एका रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. या रिपोर्टनुसार, जिओच्या या टूलवर लाखो लोकांचा डेटा कोणत्याही सिक्युरिटीशिवाय अ‍ॅक्सेस करता येत होता. पण, रिपोर्टमधून खुलासा झाल्यानंतर Jio ने डेटाबेसला ऑफलाइन केले आहे. मात्र, ऑफलाइन करण्याआधी या डेटाबेसवर 17 एप्रिलपासूनचे सर्व रेकॉर्ड्स सहज अ‍ॅक्सेस करता येत होते. ज्या युजर्सनी करोना संसर्गाचा धोका आणि लक्षणं ओळखण्यासाठी या टूलद्वारे सेल्फ टेस्ट केली होती त्या सर्वांचा डेटा इथे उपलब्ध होता.

Jio ने मार्च महिन्याच्या अखेरीस करोनाच्या लक्षणांची आणि धोक्याची माहिती देणारे ‘COVID-19 सेल्फ-टेस्टिंग टूल लॉन्च’ केले. TechCrunch च्या रिपोर्टनुसार, Jio च्या COVID-19 ट्रॅकिंग टूलच्या डेटाबेसमध्ये सेल्फ टेस्ट करणाऱ्या युजर्सची खासगी माहिती, ब्राउझर व्हर्ज़न, ऑपरेटिंग सिस्टिम, प्रोफाइल रेकॉर्ड, याशिवाय टूलद्वारे विचारण्यात आलेल्या सेल्फ टेस्ट प्रश्नांची उत्तरेही होती. याशिवाय ज्या युजर्सनी डिव्हाइसमध्ये लोकेशन पर्याय ऑन ठेवला होता त्यांच्या लोकेशनचीही माहिती होती.

सिक्युरिटी रिसर्चर अनुराग सेन यांना सर्वप्रथम, 1 मे रोजी जिओच्या टूलवरील डेटा इंटरनेटवर कोणत्याही पासवर्डशिवाय उपलब्ध असल्याचं लक्षात आलं. जिओला याबाबत माहिती देताच त्यांनी तातडीने हा डेटा ऑफलाइन केला. अद्याप हा डेटाबेस सिक्युरिटी रिसर्चरशिवाय अन्य कोणाला मिळाला की नाही याबबात अद्याप स्पष्ट माहिती नाहीये. पण, TechCrunch शी बोलताना जिओचे प्रवक्ता तुषार पानिआ यांनी, “माहिती मिळताच आम्ही समस्या तातडीने सोडवली”, असे सांगितले. “वेबसाइटच्या परफॉर्मन्सवर लक्ष ठेवण्यासाठी ते लॉगिंग सर्वर होतं. केवळ जे लोकं सेल्फ-टेस्टद्वारे करोनाच्या लक्षणांची तपासणी करत होते त्या मर्यादित लोकांच्या वापरासाठीच ते सर्व्हर होतं”, असंही तुषार यांनी सांगितलं.