Joint Pain Relief Drink at Night: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम केवळ मनावरच नव्हे, तर शरीराच्या मुळावर होताना दिसतो. विशेषतः चुकीचा आहार, सतत बसून राहण्याची सवय व शारीरिक हालचालींचा अभाव याचा थेट फटका हाडांना बसतो. सकाळी उठताना गुडघे दुखणे, चालताना कडकपणा जाणवणे, सांध्यांमध्ये सूज येणे किंवा थोड्याशा हालचालीतही वेदना वाढणे, अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, हाडांच्या वेदनांमागे अनेक कारणे असू शकतात. शरीरात कॅल्शियम आणि जीवनसत्त्व ‘डी’ची कमतरता, जीवनसत्त्व ‘बी-१२’चे अपुरे प्रमाण, वाढते वय, सांध्यांचे आजार, हाडांची ठिसूळता, तसेच दीर्घकाळ एकाच स्थितीत बसून राहणे हे घटक हाडांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. काही वेळा संसर्ग किंवा दाहजन्य स्थितीमुळेही हाडांमध्ये सूज आणि वेदना निर्माण होतात, ज्यामुळे दैनंदिन जीवन कठीण होऊ शकते.
सध्या समाजमाध्यमांवर अनेक उपाय चर्चेत आहेत. काही जण घरगुती पदार्थांनी सांध्यांचे कुशन मजबूत होते; तर काही जण विशिष्ट मसाल्यामुळे वेदना कमी होतात, असे सांगताना दिसतात. विशेषतः गुडघेदुखीवर घरगुती उपाय म्हणून रात्री दुधासोबत घेतल्या जाणाऱ्या एका घटकाची जोरदार चर्चा आहे. मात्र, या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे जाणून घेणे तितकेच आवश्यक आहे.
याच विषयावर ठाण्यातील एका नामांकित रुग्णालयातील अस्थिरोग आणि सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. सारंग देशपांडे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांच्या मते, सांध्यांच्या वेदनांमागे प्रामुख्याने दाह ही मुख्य कारणीभूत प्रक्रिया असते. दाह वाढला की, वेदना, सूज व कडकपणा अधिक जाणवतो. त्यामुळे दाह कमी करणे हे उपचारांचे मुख्य उद्दिष्ट असते.
डॉ. देशपांडे सांगतात की, काही नैसर्गिक घटकांमध्ये दाह कमी करण्याचे आणि शरीरातील अपायकारक घटकांपासून संरक्षण करण्याचे गुणधर्म आढळतात. मात्र, हे घटक चमत्कार घडवतात, असा गैरसमज करून घेऊ नये. ते नवीन सांधे तयार करत नाहीत किंवा झिजलेले कुशन (Cartilage) पुन्हा उभे करत नाहीत. मात्र, वेदना आणि सूज नियंत्रणात ठेवण्यास ते मदत करू शकतात.
यासोबतच फक्त आहारावर अवलंबून न राहता, नियमित हालचाल, स्नायू बळकट करणारे व्यायाम व पुरेसे पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ स्पष्ट करतात. चालणे, हलका व्यायाम व योग्य विश्रांती यांमुळे सांध्यांवरील ताण कमी होतो आणि हाडे अधिक सक्षम राहतात.
आणि शेवटी ज्या घटकाची इतकी चर्चा होत आहे, तो म्हणजे हळद. डॉ. देशपांडे यांच्या मते, हळदीतील ‘कर्क्युमिन’ या घटकामध्ये दाहरोधक आणि प्रतिऑक्सिडंट गुणधर्म असतात. योग्य प्रमाणात आणि नियमित सेवन केल्यास हळद सांध्यांतील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकते. विशेषतः रात्री कोमट दुधात थोडी हळद मिसळून घेतल्यास शरीराला आतून आधार मिळू शकतो. मात्र, कोणताही उपाय सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञ आवर्जून सांगतात.
