Sofa Dry Cleaning at Home Jugaad: पावसाळ्याच्या महिन्यात घरभर पसरणारा कुबट वास ही जवळपास प्रत्येक घरातील समस्या आहे. पण आता त्रास घरगुती आहे म्हणजे उत्तर सुद्धा घरगुतीच असायला हवं ना. एरवी कपडे, लादी, टाईल्स, किचनची भांडी, उशा- चादरी या प्रत्येक गोष्टी आपण कश्या घासून पुसून लख्ख करू शकतो. पण जेव्हा प्रश्न कापसाने बनलेल्या गोष्टींचा येतो तेव्हा मात्र हे कसं साफ करायचं हा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. मुख्य म्हणजे कापसाला पाण्याने स्वच्छ करू शकत नाही अन्यथा वस्तू पटकन खराब होऊ शकतात. शिवाय जर या कापसाच्या गाद्या, उशांचा बेस लाकडी असेल तर पाण्याने त्याला बुरशी लागू शकते. मग नेमका उपाय काय? चिंता करण्याची काहीच गरज नाही, मित्र मैत्रिणींनो आज आपण घरच्या घरी ड्राय क्लिनिंग कसं करायचं हे शिकणार आहोत.
कापूस किंवा स्पंज वापरलेले सोफे, बेडवरील गादी स्वच्छ करताना ड्राय क्लिनिंग करणे आवश्यक असते. यासाठी बाहेरून कोणाला बोलवून हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा आपण घरीच उपाय करू शकता. कसा ते पाहूया…
१) सर्वात आधी सोफ्याच्या कानाकोपऱ्यात साचलेली धूळ काढण्यासाठी सुका फडका घेऊन डस्टिंग करून घ्या. तुमच्या व्हॅक्यूम क्लिनर असेल तर आणखी उत्तम.
२) मग एका भांड्यात थोडं पाणी आणि अगदी सौम्य शॅम्पू घ्या. यासाठी आपण शॅम्पू बॉटलवरील केमिकल इंडेक्स तपासून पहा, सहसा लहान मुलांसाठी वापरण्यात येणारे शॅम्पू हा उत्तम पर्याय ठरतो.
३) पाण्यात शॅम्पू टाकून भरपूर फेस करून घ्या.
४) तुमच्या सोफ्याच्या कापडानुसार आपण स्पंज किंवा स्क्रब घेऊन त्याला फेस लावून घ्या. लक्षात ठेवा पाण्यात आपल्याला स्पंज बुडवायचा नाही, फक्त वर जो फेस आहे तो स्पंजला लागायला हवा. तरीही चुकून पाणी गेल्यास स्पंज नीट पिळून घ्या.
५) आता फेसाच्या स्पंजने सोफा नीट स्वच्छ करून घ्या.
६) अनेक सोफ्यांमध्ये लाकडी किंवा स्टीलचे डिझाईन असते जे झाडून स्वच्छ करता येत नाही. अशावेळी एक साधा मऊ कपडा घ्या त्यात पेन्सिल/पेन धरून त्या टोकाने हे डिझाईन स्वच्छ करा.
७) फेस पुन्हा स्वच्छ फडक्याने नीट पुसून घ्या आणि मग फॅन खाली सोफा सुकण्यासाठी वेळ द्या.
तसेच बेडवरील गादी आणि उशी कशी स्वच्छ करायची हे आपण याआधी सुद्धा पाहिले आहे. तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी असल्यास लगेच इथे क्लिक करा.
@Being Homemaker या युट्युब पेजवर वर शेअर करण्यात आलेल्या सोफा क्लीनिंच्या काही सोप्या मराठी टिप्स सुद्धा पाहूया…
सोफा क्लिनिंगचे अन्य पर्यायही आपण विचारात घेऊ शकता. बेकिंग सोडा किंवा डेटॉल स्पंजला लावून सोफ्यावर लावल्यास आपण घरच्याघरी निर्जंतुकीकरण करू शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. आपण कापडाचे फॅब्रिक पाहून त्यानुसार निर्णय घ्या)
