Side Effects Of Kajal On Eyes: आजकाल काजळ लावणे हा फॅशनचा एक भाग बनला आहे.पूर्वी लहान बाळांच्या डोळ्यांतही काजळ लावले जात होते; पण आता डॉक्टर लहान मुलांना काजळ न लावण्याचा सल्ला देतात. परंतु, आताशा अनेक मोठ्या मुली काजळ लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. काजळामुळे डोळ्यांचे सौंदर्य वाढते; पण जर ते दीर्घकाळ डोळ्यांमध्ये राहिले किंवा ते नीट साफ केले गेले नाही, तर डोळ्यांच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

याविषयी प्रसिद्ध डर्मेटॉलॉजिस्ट डॉ. आंचल पंथ यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ?काजळाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेल्यामुळे एका मुलीच्या डोळ्यावर थेट शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करण्याची वेळ कशी आली, याबद्दल माहिती दिली आहे.

काजळ लावल्याने होणारे आजार आणि धोके

आपल्या पापण्यांच्या कडांवर मीबोमियन नावाच्या ग्रंथी असतात. या ग्रंथी एक विशेष तेल तयार करतात, जे डोळ्यांतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि अश्रू लवकर सुकू न देण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. डोळ्यांच्या आतील बाजूला म्हणजे ‘वॉटरलाईन’वर (Waterline) काजळ लावल्याने या ग्रंथींची छिद्रे बंद होऊ शकतात.

काळानुसार काजळाचे कण, मेण (Wax), तेल आणि बाहेरची धूळ-माती या छिद्रांभोवती साचून राहते, ज्यामुळे तेलाचा नैसर्गिक प्रवाह थांबतो, यामुळे खालील गंभीर समस्या उद्भवू शकतात:

काजळ लावल्याने कोणत्या गंभीर समस्या उद्भवू शकतात?

१) स्टाय (Stye/Anjanhari – रांजणवाडी): हा Staphylococcus aureus या बॅक्टेरियामुळे होणारा संसर्ग आहे. हा त्रास पापणीच्या केसामध्ये किंवा मीबोमियन ग्रंथीमध्ये होतो.

२) कॅलाझियन (Chalazion – पापणीवरील गाठ): मीबोमियन ग्रंथीचे छिद्र बंद झाल्यामुळे पापणीवर सूज येऊन एक गाठ तयार होते, जी अत्यंत त्रासदायक ठरू शकते.

काजळ वापरताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

काजळ लावून झोपल्यामुळे हा धोका अधिक वाढतो. रात्रीच्या वेळी मेकअप, बॅक्टेरिया आणि घाण दीर्घकाळ पापण्यांच्या संपर्कात राहिल्याने ग्रंथी ब्लॉक होतात व संसर्ग वेगाने पसरतो.

डोळ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काजळ कसे लावावे?

डॉ. आंचल पंथ यांनी डोळ्यांच्या सुरक्षेसाठी सल्ल्याद्वारे सांगितलेल्या महत्त्वपूर्ण बाबी खालीलप्रमाणे :

मेकअप नक्की साफ करा: रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळे व्यवस्थित स्वच्छ करून डोळ्यांचा सर्व मेकअप काढून टाका

दीर्घकाळ वापर टाळा: सतत अनेक तास काजळ लावून ठेवणे टाळा.

वॉटरलाईनवर काजळ लावणे टाळा: डोळ्यांच्या आतील कडेवर (Waterline) काजळ लावू नका. विशेषतः जर तुम्हाला वारंवार रांजणवाडी, गाठ (Chalazion) किंवा ड्राय आयच्या समस्येचा त्रास होत असेल, तर वॉटरलाईनवर काजळ अजिबात लावू नका.

मेकअप प्रॉडक्ट्स बदला: डोळ्यांचे मेकअप प्रॉडक्ट्स दर ३ ते ६ महिन्यांत बदला आणि ते कधीही दुसऱ्यांबरोबर शेअर करू नका.

काजळ लावल्याने थेट शस्त्रक्रिया होण्याचे प्रमाण दुर्मिळ असले, तरी डोळ्यांची योग्य स्वच्छता न ठेवल्यास आणि रोज आतील कडेवर काजळ लावल्यास संवेदनशील डोळे असणाऱ्या लोकांमध्ये हा धोका कित्येक पटीने वाढतो.