भारतातल्या बहुतेकशा साड्यांची नावे ही गावाच्या किंवा शहराच्या नावावरुन दिलेली असतात. कांचीपुरम हे तमिळनाडूमधील प्रसिद्ध विणकामाचे ठिकाण आहे. इथे बनवली जाणारी सिल्कची साडी कांचीपुरम सिल्क म्हणून ओळखली जाते. सोन्याचे धागे वापरुन विणल्यामुळे या साडीला तमिळनाडूची बनारसी साडी असंही म्हटलं जातं. यामध्ये सोन्याच्या धाग्यांबरोबर चांदीचे धागेही वापरले जातात. या साडीविषयी पुरातन काळातल्या अनेक समजुती आहेत. असं म्हटलं जातं की, सुती कापड शंकराला प्रियं आहे, तर रेशीम विष्णुला. कांचीपुरम साडी तुतीच्या रेशमापासून विणली जाते.
ही साडी विणायला तीन कारागीर लागतात. एक कारागीर उजव्या बाजूने विणत असेल, तर दुसरा कारागीर डाव्या बाजूने विणू शकतो. तुतीचे रेशीम दक्षिण भारतातून तर जरीचे धागे गुजरातमधून मागवले जातात. काठाचा रंग आणि नक्षीकाम हे साडीपासून वेगळे असते. जर पदर वेगळ्या रंगात विणायचा असेल तर, तो साडीपासून वेगळा विणला जातो आणि नंतर नाजूकपणे साडीला जोडला जातो. नाजूकपणे जोडला असला तरी विण इतकी घट्टं असते, की साडी फाटली तरी पदर तिच्यापासून वेगळा होत नाही.




नक्षीकामाची वैशिष्ट्ये –
साडीवरील नक्षीकाम हे सोन्याच्या धागे वापरून केले जाते. या नक्षीकामात माणसांच्या आणि प्राण्यांच्या आकृत्या, मंदिरांचे कळस, भूमितीतील आकृत्या, इ. वापरले जाते.या साडीवर रामायण व महाभारतातील चित्रे अतिशय कुशलतेने विणलेली असतात.याबरोबरच चंद्र, सूर्य, मोर, सिंह, कोयरीचे आकार वापरून नक्षीकाम केले जाते.
नक्षीकामाचे प्रकार –
तंडवलम – यामध्ये पूर्ण साडीवर उभ्या रेषा विणल्या जातात.
कोट्टडी – यामध्ये उभ्या व आडव्या रेषांना जोडून विविध आकाराचे चौरस व आयत बनवले जातात.
पुट्टा – या प्रकारामध्ये काठावर फूलांची नक्शि विणून नंतर काठ साडीला जोडले जातात.
कांचीपुरम साडीचे नक्षीकाम जितके खास असते, तितकेच तिचे रंगही खास असतात. लाल, नारंगी, मोरपंखी, हिरवा, काळा, इ, असे गडद रंग व नाजूक नक्शिकाम यामुळे ही साडी अधिकच खुलून दिसते.
काळजी कशी घ्याल –
कांचीपुरम सिल्कपासून बनवलेल्या या साडीची निगा राखणे सोपे आहे. दीर्घकाळापर्यंत टिकत असल्यामुळे घरच्या घरी पाण्याने धुतलेली चालते. अवघड नक्षीकाम आणि विणायला लागणारा वेळ यामुळे या साडीची किंमत जास्त असते. पारंपारिक पद्धतीने विणलेल्या या साडीची किंमत अडिच हजारांपासून एक लाखापर्यंत असते. पारंपरिक विणकामाबरोबरच आधुनिक पद्धतीने विणलेल्या साड्यादेखील उपलब्ध आहेत. ही साडी विणण्यासाठी संगणकाचा उपयोग केला जातो. मजुरी कमी असल्यामुळे या साडीची किंमत परवडणारी असते. या भरजरी साडीवर पारंपारिक दागिने घातलेले चांगले दिसतात. नाजूक दागिने शक्यतो घालू नयेत.
जुन्या साडीचे काय कराल –
लग्नसमरंभात किंवा सणासुदीला घालण्यासाठी जुन्या साडीपासून पायघोळ ड्रेस शिवता येईल. साडीच्या पदराची ओढणी करून सलवार कमीजवर घालता येऊ शकते. सध्या फॅशनच्या दुनियेत आघडीवर असलेली पलाझो पॅंट, रॅप अराउंड स्कर्ट हे देखील उत्तम पर्याय आहेत. वेगळ्या पद्धतीचा कुर्ताही छान दिसू शकतो.
वल्लरी गद्रे, फॅशन डिझायनर