अभिनेत्री व खासदार कंगना रणौत यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा आहार, प्रोटीन आणि कर्करोगाचा धोका यांविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे. कंगना रणौत यांनी भारतातील पारंपरिक आहाराचं कौतुक करताना प्रोटीन शेक्स आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. इतकंच नाही, तर त्यांनी, “जास्त प्रमाणात प्रथिनांचं सेवन केल्यानं (प्रोटीन्स खाल्ल्यानं) माणसाची बुद्धी कमी होते,” असेही म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, खरोखरच जास्त प्रथिनांचं सेवन केल्यानं मेंदूवर परिणाम होतो का? प्रोटीन शेक्स खरंच आरोग्यासाठी घातक आहेत का? याबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

कंगना रणौत यांच्या पोस्टमुळे रंगली चर्चा

कंगना रणौत यांनी ५० वर्षांखालील लोकांमधील कर्करोगाच्या प्रमाणाचा एक तक्ता सोशल मीडियावर शेअर केला. त्या तक्त्यात भारतात तुलनेने कर्करोगाचे प्रमाण कमी असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यावर त्यांनी भारतातील पारंपरिक आहार हा सर्वोत्तम असल्याचे सांगत नागरिकांना संपूर्ण आणि नैसर्गिक अन्न खाण्याचा सल्ला दिला.

त्याचबरोबर त्यांनी अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न, जंक फूड आणि प्रोटीन शेक्सचे सेवन कमी करण्याचे आवाहन केले. मात्र, “प्रथिनांचं जास्त प्रमाणात सेवन केल्यानं माणसाची बुद्धी कमी होते” या त्यांच्या विधानामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली.

आहार महत्त्वाचा; पण तोच सर्व काही नाही

यावर एलिट केअर क्लिनिकचे फिजिशियन डॉ. पल्लेटी शिवा कार्तिक रेड्डी यांनी स्पष्ट केले, “कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आहार महत्त्वाचा असला तरी तो एकमेव घटक नाही. धूम्रपान, लठ्ठपणा, मद्यपान, दीर्घकालीन संसर्ग, पर्यावरणातील घातक घटक आणि आनुवंशिक कारणं या कारणांमुळेही कर्करोगाच्या धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.” त्यामुळे एखाद्या देशात कर्करोगाचे प्रमाण कमी आहे, याचे श्रेय केवळ त्या देशाच्या आहाराला देणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य ठरत नाही.

कर्करोगामागे अनेक कारणे असतात

सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनीही याच मताला दुजोरा दिला.

त्यांच्या मते, “आहार हा कर्करोगाच्या धोक्यावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक घटकांपैकी एक आहे. तंबाखूचे सेवन, मद्यपान, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव, एचपीव्ही व हेपॅटायटिस बीसारखे संसर्ग, प्रदूषण, वाढते वय आणि आनुवंशिकता यांचा कर्करोगाच्या धोक्याशी थेट संबंध आहे.”

ते पुढे सांगतात की, संपूर्ण धान्ये, फळे, भाज्या आणि कडधान्यांचा समावेश असलेला आहार दीर्घकाळ आरोग्यासाठी फायदेशीर असतो. मात्र, केवळ एका आहार पद्धतीमुळे एखाद्या देशात कर्करोग कमी होतो, असे म्हणणे योग्य नाही.

प्रोटीन शेक्स म्हणजे जंक फूडच का?

प्रोटीन शेक्सबाबतही अनेक गैरसमज आहेत.

डॉ. रेड्डी सांगतात, “प्रोटीन शेक्स फक्त पॅकेजमध्ये मिळतात म्हणून त्यांना जंक फूड म्हणता येणार नाही. काही उत्पादनांमध्ये साखर, कृत्रिम पदार्थ आणि संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते; पण अनेक प्रथिन पुरके उच्च दर्जाचे प्रोटीन आणि इतर घटक कमी प्रमाणात असतात. त्यामुळे एखादं उत्पादन आरोग्यासाठी योग्य आहे की नाही, हे त्यातील घटक आणि व्यक्तीच्या गरजा यांवर अवलंबून असते.”

कोणाला प्रथिन पुरकेची गरज असू शकते?

डॉक्टरांच्या मते काही व्यक्तींना अतिरिक्त प्रोटीनची गरज भासू शकते.

त्यामध्ये…

खेळाडू
नियमित व्यायाम करणारे
वयोमानामुळे स्नायुबल कमी होऊ लागलेले ज्येष्ठ नागरिक
शस्त्रक्रियेनंतर बरे होत असलेले रुग्ण
गंभीर आजारातून सावरणाऱ्या व्यक्ती
ज्यांची भूक कमी असते अशा व्यक्ती

यांचा समावेश होतो.

मग प्रत्येकाने प्रोटीन पावडर घ्यावी का?

याचे उत्तर डॉक्टरांनी स्पष्ट शब्दांत दिले आहे.

डॉ. जगदीश हिरेमठ म्हणतात, आरोग्यपूर्ण व्यक्तीचा आहार संतुलित असेल आणि त्यातून पुरेशी प्रथिनं मिळत असेल, तर वेगळी प्रथिन पुरके घेण्याची गरज नसते. कारण- नैसर्गिक अन्नातून प्रथिनबरोबरच तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे आणि शरीरासाठी आवश्यक अनेक पोषक घटक मिळतात. हे फायदे प्रथिन पुरकांमधून पूर्णपणे मिळत नाहीत.”

जास्त प्रथिनं खाल्ल्यानं मेंदूवर परिणाम होतो का?

कंगना रणौत यांच्या विधानामुळे हा प्रश्न सर्वाधिक चर्चेत आला आहे.

यावर डॉक्टरांचे उत्तर स्पष्ट आहे. सध्या उपलब्ध वैज्ञानिक संशोधनानुसार आरोग्यपूर्ण व्यक्तींमध्ये जास्त प्रथिनं घेतल्याने मेंदूची कार्यक्षमता कमी होते किंवा व्यक्तीची बुद्धी कमी होते, असा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

उलट शरीरातील स्नायू, ऊती आणि विविध अवयवांच्या कार्यासाठी प्रथिन हा अत्यंत आवश्यक पोषक घटक आहे. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो. त्यामुळे प्रथिनांचे सेवनही वय, वजन, शारीरिक हालचाल आणि आरोग्याच्या स्थितीनुसारच असावे.

संतुलित आहार हाच सर्वोत्तम पर्याय

तज्ज्ञांच्या मते, फॅड डाएट किंवा सोशल मीडियावरील कोणत्याही दाव्यावर लगेच विश्वास ठेवू नये. आपल्या शरीराच्या गरजेनुसार संतुलित आणि पोषणमूल्यांनी समृद्ध आहार घेणे हेच दीर्घकाळ आरोग्यपूर्ण राहण्याचे खरे सूत्र आहे. प्रथिनं, कर्बोदके, चांगले फॅट, फळे, भाज्या आणि पुरेसे पाणी यांचा समतोल राखणे अधिक महत्त्वाचे आहे.

(टीप : ही माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध संशोधन आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्याला वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय समजू नये. कोणताही नवीन आहार, आहार पुरके किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)