कोरडा खोकला येतोय? हे उपाय करुन पाहा 

वेळीच काळजी घ्या

प्रातिनिधिक छायाचित्र

डिसेंबर महिन्यापासून थंडीचा कडाका सर्वत्र वाढला आहे. बदलणाऱ्या वातावरणामुळे अनेकांना कोरड्या खोकल्याची लागण झाल्याचे दिसून येत लागली आहे. कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर कफ पडत नाही असा खोकला. हा खोकला अचानक वाढतो आणि खोकून खोकून व्यक्ती हैराण होऊन जाते. श्वासनलिकांच्या अनेक सामान्य आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. सध्या या खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कारणे

१. थंड हवेत आपण नाकाने श्वास घेतला की त्या गारव्यामुळे नाकाच्या आतील पातळ मांसल आवरणाला (म्युकस मेम्ब्रेन) सूज येते. त्यामुळे शिंका येतात, नाकातून पाणी वाहायला लागते म्हणजेच सर्दी होते. दोन-तीन दिवसात जर काळजी घेतली नाही आणि पुन्हा पुन्हा थंडीत जात राहिल्याने ही सर्दी घट्ट होते. यालाच सामान्य भाषेत ‘कफ’ म्हणतात. हा कफ नाक आणि घसा यांच्यामध्ये अडकून राहतो. अगदी कमी प्रमाणात असलेला हा कफ, आपल्या श्वासाबरोबर बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे कोरडा खोकला येऊ लागतो.

२. नाकाच्या आतील हे पातळ आवरण त्यापुढे घसा, टॉन्सिल्स, स्वरयंत्र, श्वासनलिका, श्वासवाहिन्या आणि फुफ्फुसातील वायुकोषांपर्यंत आतील बाजूने पसरलेले असते. त्यामुळे हा कोरडा खोकला वाढत गेला की फुफ्फुसांपर्यंत जातो.

३. धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे हा कोरडा खोकला अधिक वाढत जातो.

४. लहान मुलांमध्ये टॉन्सिल्सच्या ग्रंथींवर सूज येऊन कोरडा खोकला येतो.

५. चाळिशीनंतर दीर्घकाळ असलेल्या कोरड्या खोकल्यात घशात कर्करोगाची सुरुवात असू शकते.

काळजी

१. थंडीच्या काळात सकाळी लवकर किंवा रात्री उशीरा अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडू नये.

२. शाळा, कॉलेज, ऑफिस, व्यवसायधंदा यासाठी सकाळी बाहेर पडताना अंगात स्वेटर तर घालावाच पण नाकावरून स्कार्फ, मफलर किंवा कान-नाक आणि डोके झाकणारी माकडटोपी वापरावी.

३. दिवसातून चार वेळा कोमट पाण्याच्या गुळण्या दररोज कराव्यात. त्यामुळे घशाची सूज आणि कफ नक्की कमी होतो.

४. सायंकाळी सूर्यास्तानंतर आणि सकाळी उन्हे पडेपर्यंत घराची दारे खिडक्या बंद ठेवाव्यात.

५. झोपताना अंगावर गरम कपडे, उबदार पांघरूण असावे. थंडी जास्त असल्यास झोपतानासुद्धा कानटोपी वापरावी.

६. एक वर्षापेक्षा लहान मुलांची थंडीत रोज संध्याकाळी आणि सकाळी छाती, पाठ, कपाळ, कानशिले शेकावे.

उपचार

खोकल्याचे प्रमाण कमी असेल तर गुळण्या करणे आणि घरगुती उपाय करणे उपयोगाचे ठरते. मात्र खोकल्याबरोबरच घसा दुखत असेल, ताप आल्यासारखे वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा. कोरड्या खोकल्यासोबत दम लागू लागला किंवा श्वास घेताना छातीतून सूं सूं आवाज येऊ लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतलेला चांगला. झोपल्यावर जास्त खोकला येणे, आवाज बदलणे यांसारखा काही त्रास असेल आणि खोकला पाच दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक असते.

-डॉ. अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Khokla dry cough what are the reasons behind it and what will be the remedies

ताज्या बातम्या