Kidney Cancer Symptoms: किडनी हा शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनी रक्त फिल्टर करण्याचे, शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्याचे आणि शरीरातील फ्लुइड बॅलन्स म्हणजेच द्रवांचे संतुलन राखण्याचे महत्त्वाचे काम करते.
किडनीची योग्य काळजी घेतली नाही तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कारण किम्स हॉस्पिटलचे एंड्रोलॉजिस्ट डॉ. विश्वास एमआर यांच्या मते, काही कारणांमुळे किडनीच्या कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो. काही सवयींमुळे हा धोका दुप्पट वाढू शकतो. लठ्ठपणा आणि हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब हेदेखील किडनी कॅन्सरचा धोका वाढवणारे घटक मानले जातात. या लेखात किडनी कॅन्सरचा धोका वाढवणारे कोणते घटक आहेत, हे सविस्तर जाणून घेऊया.
किडनी कॅन्सर म्हणजे काय?
किडनीमधील पेशींमध्ये असामान्य बदल होऊ लागतात आणि त्या नियंत्रणाबाहेर वाढू लागतात, तेव्हा किडनी कॅन्सर होतो. किडनी कॅन्सरचे अनेक प्रकार असू शकतात आणि प्रत्येक प्रकारची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. अनेकदा इतर एखाद्या आरोग्य समस्येची तपासणी करताना किडनी कॅन्सर समोर येतो.
लठ्ठपणामुळे किडनी कॅन्सरचा धोका वाढू शकतो का?
लठ्ठपणा हा किडनी कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या कारणांपैकी एक मानला जातो. शरीरात जास्त चरबी असल्यामुळे हार्मोन्स आणि मेटाबॉलिझम म्हणजेच शरीरातील चयापचय प्रक्रियेशी संबंधित अनेक बदल होऊ शकतात. शरीरात दीर्घकाळ सूज राहणे आणि इतर काही बदलांमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
हाय बीपी आणि किडनी कॅन्सरमध्ये काय संबंध आहे?
दीर्घकाळ हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब असल्यास शरीरावर आणि किडनीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. हाय बीपीचा संबंध किडनी कॅन्सरचा वाढलेला धोका याच्याशीही जोडला गेला आहे. मात्र, हाय बीपी असल्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला नक्कीच किडनी कॅन्सर होईल. पण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
स्मोकिंगमुळेही होऊ शकतो किडनी कॅन्सर
धूम्रपान केल्यामुळेही किडनी कॅन्सरचा धोका वाढू शकतो. डॉ. विश्वास यांच्या मते, स्मोकिंगमुळे किडनीला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
किडनी कॅन्सरची कोणती लक्षणे दिसू शकतात?
किडनी कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही खास लक्षणे दिसत नाहीत. मात्र, आजार वाढल्यानंतर काही लोकांमध्ये काही संकेत दिसू शकतात. उदाहरणार्थ, लघवीत रक्त येणे, कंबर किंवा शरीराच्या एका बाजूला सतत दुखणे, सतत थकवा जाणवणे किंवा अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. तुम्हाला अशी कोणतीही समस्या जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वेळेत किडनी कॅन्सरची ओळख कशी होते?
किडनी कॅन्सरची ओळख करण्यासाठी डॉक्टर सर्वप्रथम रुग्णाची लक्षणे आणि त्याच्या मेडिकल हिस्ट्रीबद्दल माहिती घेतात. त्यानंतर गरजेनुसार वेगवेगळ्या चाचण्या केल्या जाऊ शकतात. यामध्ये अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, रक्त तपासणी आणि लघवीची तपासणी यांचा समावेश असू शकतो.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
