Kidney Damage Signs: किडनी हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. ती रक्त स्वच्छ करण्याचे, शरीरातील घाण आणि अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्याचे तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे महत्त्वाचे काम करते. मात्र, चुकीची जीवनशैली आणि काही आरोग्य समस्या यामुळे कालांतराने किडनीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे डॉक्टर शालिनी सिंह सोलंकी यांच्या मते, रोजच्या जीवनात काही गोष्टींची काळजी घेतल्यास किडनी दीर्घकाळ निरोगी राहू शकते आणि ती खराब होण्याचा धोका कमी होतो.

अँटिबायोटिक औषधांचा जास्त वापर करू नका

सर्दी, खोकला, घसा दुखणे किंवा किरकोळ संसर्ग झाला की अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटिबायोटिक औषधे घेतात. मात्र, असे करणे योग्य नाही. काही अँटिबायोटिक औषधांचा किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. विशेषतः ज्यांना आधीपासून किडनीचा आजार आहे किंवा इतर काही औषधे सुरू आहेत, त्यांच्यासाठी हा धोका अधिक असतो.

ॲसिडिटीची औषधे स्वतःहून घेऊ नका

छातीत जळजळ किंवा ॲसिडिटी झाली की अनेकजण स्वतःच औषधे घेण्यास सुरुवात करतात. मात्र, गरज नसताना किंवा दीर्घकाळ ही औषधे घेतल्यास किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने ॲसिडिटीची औषधे स्वतःहून घेऊ नयेत. यामुळे किडनी हळूहळू कमकुवत होऊ शकते आणि अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका

उलटी, जुलाब किंवा इतर कारणांमुळे शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) झाली तर शरीरातील रक्तप्रवाह आणि रक्तदाबावर परिणाम होतो. अशा वेळी काही औषधे घेतल्यास किडनीला नुकसान होण्याची शक्यता वाढते.

पोटदुखीची औषधे विनाकारण घेऊ नका

पोटदुखी झाली म्हणून वारंवार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे किडनीसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे गरज नसताना पोटदुखीची कोणतीही औषधे घेणे टाळा आणि किडनीचे नुकसान होण्यापासून स्वतःचा बचाव करा.

जास्त मीठ खाणे टाळा

अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाबाचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवा. शक्यतो हलका आहार घ्या आणि स्वयंपाकात लाल तिखटाचाही कमी वापर करा.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)