Kidney Damage Symptoms: आजकाल किडनीशी संबंधित आजारांचे प्रमाण खूप वाढत आहे. मोठी अडचण म्हणजे अनेक लोकांना किडनीला बरंच नुकसान झाल्यावरच याची माहिती होते. कारण किडनीचे आजार बहुतेक वेळा हळूहळू वाढतात आणि सुरुवातीला स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. सुरुवातीच्या टप्प्यात अनेक लोकांना पूर्णपणे सामान्य वाटतं, त्यामुळे त्यांना ही समस्या ओळखता येत नाही.
किडनी आपल्या शरीरात अनेक महत्त्वाची कामं करते. ती रक्तातील घाण आणि विषारी पदार्थ फिल्टर करून बाहेर टाकते. तसेच शरीरातील पाणी आणि खनिजांचे संतुलन राखते, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि लाल रक्तपेशी तयार होण्यातही तिची महत्त्वाची भूमिका असते.
किडनीबद्दल माहिती देणारी संस्था नॅशनल किडनी फाउंडेशन यांच्या मते, किडनीच्या आजाराची काही लक्षणे आधीपासूनच दिसू लागतात. या लक्षणांवरून तुम्ही या समस्येचा अंदाज लावू शकता.
किडनीच्या समस्येची महत्त्वाची लक्षणे
लघवीत होणारे बदल
किडनीच्या आजाराचे सुरुवातीचे लक्षण लघवीत दिसणारे बदल असू शकतात. लघवी वारंवार होणे, विशेषतः रात्री जास्त वेळा होणे किंवा आधीपेक्षा कमी लघवी होणे हे समस्येचे संकेत असू शकतात. काही वेळा लघवीचा रंग गडद दिसतो, लघवी फेसाळ किंवा धूसरही दिसू शकते.
शरीरात सूज येणे
किडनी नीट काम करत नसल्यास शरीरातील जास्त मीठ आणि पाणी बाहेर पडत नाही. त्यामुळे शरीरात पाणी साचू लागते. यामुळे पाय, घोटे, हात किंवा चेहऱ्यावर सूज येऊ शकते. सकाळी उठल्यावर डोळ्यांच्या आसपास सूज दिसणे हेही याचे लक्षण असू शकते.
सतत थकवा येणे
किडनी नीट काम करत नसल्यास रक्तात विषारी पदार्थ साचू लागतात. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. तसेच किडनी लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी लागणारे हार्मोन कमी प्रमाणात तयार करते, त्यामुळे ॲनिमिया (रक्ताची कमतरता) होऊ शकते.
फेसाळ लघवी
लघवी करताना साबणासारखा फेस दिसत असेल आणि तो लगेच नाहीसा होत नसेल, तर लघवीत प्रोटीन जात असल्याचे ते लक्षण असू शकते. याला प्रोटीनयुरिया म्हणतात आणि हे किडनीला सुरुवातीला झालेल्या नुकसानाचे संकेत असू शकतात.
अशीदेखील असू शकतात लक्षणे
लघवीत गुलाबी, लाल किंवा तपकिरी रंग दिसणे हे गंभीर लक्षण असू शकते. हे किडनीचा संसर्ग, किडनी स्टोन किंवा किडनीला झालेल्या नुकसानामुळे होऊ शकते. यासोबतच शरीरात विषारी पदार्थ वाढू लागले तर पचनसंस्थेवरही परिणाम होतो. त्यामुळे भूक कमी लागू शकते आणि तोंडात धातूसारखी चव येऊ शकते. रक्तात टॉक्सिन साचल्यामुळे मळमळ आणि उलटीची समस्या देखील होऊ शकते. किडनी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते. हे संतुलन बिघडले तर स्नायूंमध्ये वारंवार गोळे येऊ शकतात.
ही लक्षणेही दुर्लक्ष करू नका
किडनी खराब झाल्यास शरीरातील खनिजांचे संतुलन बिघडते. त्यामुळे त्वचा कोरडी पडू शकते आणि खाजही येऊ शकते. तसेच किडनीच्या समस्येमुळे फुफ्फुसांमध्ये जास्त पाणी साचू शकते किंवा ॲनिमियामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.
