Silent Killer Disease Kidney: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक आजार नकळत शरीरात घर करू लागले आहेत. त्यापैकी एक धोकादायक पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा आजार म्हणजे मूत्रपिंडाचा (किडनीचा) आजार. याला ‘साइलेंट किलर’ म्हणजेच मूक घातक असेही म्हटले जाते, कारण सुरुवातीच्या टप्प्यात याची ठोस लक्षणे दिसून येत नाहीत आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा अनेकदा उशीर झालेला असतो, त्यामुळे शरीर देत असलेले सूक्ष्म संकेत ओळखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

तज्ज्ञांच्या मते, मूत्रपिंडाचे विकार अनेक वर्षे शांतपणे वाढत राहू शकतात. सुरुवातीला दिसणारी लक्षणे साधी वाटतात, त्यामुळे लोक ती दुर्लक्षित करतात. पण, हाच निष्काळजीपणा पुढे गंभीर समस्या निर्माण करू शकतो.

मूत्रपिंडाचे कार्य नेमके काय असते?

आपल्या शरीरातील मूत्रपिंड हे अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. ते रक्तातील अपायकारक द्रव्ये आणि विषारी घटक फिल्टर करून बाहेर टाकतात. याशिवाय शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे, आवश्यक हार्मोन्स तयार करणे आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करणे हीदेखील त्यांची महत्त्वाची कार्ये आहेत, म्हणूनच मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो.

सुरुवातीचे इशारे जे आपण दुर्लक्षित करतो

१) सतत थकवा आणि अशक्तपणा

जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, अगदी हलक्या कामानंतरही दम लागत असेल तर तो केवळ थकवा नसू शकतो. मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नसल्यास शरीरात विषारी द्रव्ये साचू लागतात, यामुळे ऊर्जा कमी होते, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.

तसेच, मूत्रपिंडातून तयार होणाऱ्या एरिथ्रोपोइटिन या हार्मोनची निर्मिती कमी झाल्यास रक्ताल्पता (अॅनिमिया) होऊ शकतो. परिणामी, थोड्याशा श्रमातही श्वास लागणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

२) लघवीत होणारे बदल

मूत्रपिंडाच्या आजाराचे सर्वात महत्त्वाचे संकेत म्हणजे लघवीत होणारे बदल.
रात्री वारंवार लघवी लागणे, लघवीला फेस येणे, लघवीत रक्त दिसणे किंवा लघवीचा रंग गडद होणे ही सर्व लक्षणे गंभीर इशारे असू शकतात.

अनेक वेळा लोक याकडे दुर्लक्ष करतात किंवा पाण्याचे प्रमाण कमी-जास्त असल्यामुळे असे होत असेल असे समजतात. पण, हे मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाडाचे लक्षण असू शकते.

३) पाय, टाच किंवा डोळ्यांभोवती सूज

जर तुमच्या पायांमध्ये, टाचांमध्ये किंवा डोळ्यांच्या आजूबाजूला सूज दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नसल्यास शरीरात पाणी साठू लागते.

ही सूज अनेकदा जास्त वेळ उभे राहिल्यामुळे किंवा थकव्यामुळे आहे असे समजले जाते. पण, प्रत्यक्षात ती शरीरातील द्रव संतुलन बिघडल्याचे लक्षण असू शकते.

४) सतत खाज येणे किंवा त्वचेवर पुरळ

कोणताही स्पष्ट त्वचारोग नसताना जर सतत खाज येत असेल, त्वचा कोरडी पडत असेल किंवा पुरळ येत असतील, तर हे शरीरात विषारी द्रव्ये साचत असल्याचे संकेत असू शकतात.

मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नसल्यास कॅल्शियम आणि फॉस्फरससारख्या खनिजांचे संतुलन बिघडते, यामुळे त्वचेवर परिणाम होऊन खाज, कोरडेपणा आणि चिडचिड जाणवू शकते.

५) मळमळ, भूक न लागणे आणि तोंडात विचित्र चव

मूत्रपिंडाचे कार्य कमी झाल्यास रक्तात विषारी द्रव्यांचे प्रमाण वाढते. याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो.

मळमळणे, उलटीची भावना, तोंडात धातूसारखी चव येणे, श्वासाला दुर्गंध येणे आणि भूक कमी होणे ही सर्व लक्षणे सुरुवातीला साधी वाटतात, पण ती गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.

का ओळखणे महत्त्वाचे आहे?

मूत्रपिंडाचे विकार सुरुवातीला हळूहळू वाढतात, त्यामुळे योग्य वेळी लक्षणे ओळखली तर आजाराची गती कमी करता येऊ शकते. योग्य उपचार, आहार आणि जीवनशैलीत बदल केल्यास गंभीर टप्प्यापर्यंत जाण्यापासून बचाव होऊ शकतो.

काय करावे?

शरीर देत असलेल्या छोट्या-छोट्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.

  • नियमित आरोग्य तपासणी करा
  • पुरेसे पाणी प्या
  • संतुलित आहार घ्या
  • रक्तदाब आणि साखरेवर नियंत्रण ठेवा
  • कोणतीही शंका वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या

लक्षात ठेवा:

मूत्रपिंडाचे आजार हे अचानक उद्भवत नाहीत, ते हळूहळू वाढतात; त्यामुळे वेळेत लक्ष दिल्यास मोठ्या संकटातून वाचता येऊ शकते. शरीराचे संकेत समजून घ्या, कारण कधी कधी ‘मूक’ असलेले हे इशारेच तुमचे प्राण वाचवू शकतात.