How to check if kidneys work well : आपल्या किडनी (मूत्रपिंड) शरीरातील रक्त सतत स्वच्छ करण्याचे काम आणि त्या रक्तातील घाण आणि शरीराला नको असलेले अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यास मदत करतात. पण, पण किडनी जर बरोबर काम करत नसेल किंवा त्यात काही बिघाड झाला तर किडनीचे आजार होतात. मात्र किडनीचा आजार सुरुवातीच्या टप्प्यात असताना अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होत नसला आणि तुम्ही निरोगी वाटत असलात, तरी तुमच्या किडनी व्यवस्थित काम करत असेल असे नाही. असे ठाण्यातील KIMS हॉस्पिटल्समधील नेफ्रोलॉजी आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर चैत्राली गावडे यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले आहे. पण, साध्या रक्त आणि लघवीच्या चाचण्यांद्वारे लक्षणे दिसण्यापूर्वीच काही बदल ओळखता येऊ शकतात.
तुमची किडनी योग्यरित्या काम करत आहेत की नाही हे कसे ओळखावे?
जेव्हा लक्षणे दिसतात, तेव्हा ती खूप सौम्य असू शकतात आणि नेहमीच थेट मूत्रपिंडाच्या समस्येकडे निर्देश करत नाहीत. त्यामुळे पुढील काही सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे.
- डोळ्यांभोवती किंवा पायाच्या घोट्यांवर सूज येणे
- नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त लघवी होणे किंवा लघवी करण्यासाठी वारंवार जावे लागणे.
- फेसयुक्त लघवी होणे
- लघवीतून रक्त जाणे
- सतत थकवा जाणवणे
- मळमळणे किंवा भूक मंदावणे
- विनाकारण अंगाला खाज सुटणे
- रक्तदाब वाढणे
लघवीमध्ये होणाऱ्या कोणत्याही बदलाकडे दुर्लक्ष करू नये. त्याचबरोबर रक्तदाब वाढणे ही बाबा महत्त्वाची आहे. कारण – उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचे आजार यांचा परस्पर संबंध असतो. उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते, तर मूत्रपिंडाचे कार्य बिघडल्याने रक्तदाबही वाढू शकतो.
मूत्रपिंडाची तपासणी करणाऱ्या चाचण्या कोणत्या?
मूत्रपिंडाच्या आरोग्याच्या प्राथमिक तपासणीमध्ये सामान्यतः रक्त तपासणी, लघवीची तपासणी आणि रक्तदाब तपासणी यांचा समावेश होतो.
१. सीरम क्रिएटिनिन आणि eGFR
रक्त तपासणीद्वारे ‘सीरम क्रिएटिनिन’ मोजले जाते. हा एक टाकाऊ पदार्थ आहे जो मूत्रपिंडे सामान्यतः गाळून बाहेर टाकतात. या मूल्याचा वापर ‘अंदाजित ग्लोमेर्युलर फिल्ट्रेशन रेट’ (eGFR) मोजण्यासाठी केला जातो, ज्यावरून मूत्रपिंडे रक्तातील टाकाऊ पदार्थ किती चांगल्या प्रकारे गाळतात याचा अंदाज येतो.
सीरम क्रिएटिनिन आणि eGFR या दोन्ही चाचण्यांमधून किडनी (मूत्रपिंड) किती व्यवस्थित काम करत आहेत, याची माहिती मिळते. मात्र, केवळ एका चाचणीच्या निकालावरून किडनीच्या आरोग्याबाबत निष्कर्ष काढू नये. कारण – व्यक्तीचे वय, शरीरातील स्नायूंचे प्रमाण आणि शरीरात पाण्याचे प्रमाण या गोष्टींचा चाचणीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, चाचणीचा निकाल सामान्य नसल्यास डॉक्टर पुन्हा चाचणी करण्याचा सल्ला देऊ शकतात. तसेच इतर चाचण्यांचे निकाल आणि व्यक्तीची प्रकृती लक्षात घेऊन त्याचा अर्थ लावला जातो.
२. युरिन अल्ब्युमिन-टू-क्रिएटिनिन रेशिओ (Urine albumin-to-creatinine ratio)
लघवीच्या चाचणीद्वारे लघवीमध्ये प्रथिने (प्रोटीन) किंवा अल्ब्युमिन गळत आहे का यबद्दल माहिती मिळवता येते. एकूण गाळणक्षमतेत (filtration) लक्षणीय घट होण्यापूर्वीही, हे कधीकधी मूत्रपिंडाच्या हानीचे संकेतही तुम्हाला देऊ शकते. त्यामुळे लघवीतील अल्ब्युमिनचे प्रमाण तपासण्यासाठी सामान्यतः ‘युरिन अल्ब्युमिन-टू-क्रिएटिनिन रेशो’ (UACR) वापरला जातो.यामुळे किडनीमध्ये (मूत्रपिंडात) सुरुवातीच्या टप्प्यात झालेले बदल ओळखता येतात. किडनीचे काम स्पष्टपणे कमी झाल्याचे दिसत नसले, तरी या चाचण्यांमधून काही समस्या लवकर लक्षात येऊ शकतात.
३. रक्तदाब
मूत्रपिंडाच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे रक्तदाब तपासणे. कारण, उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या (मूत्रपिंडाच्या) आजाराचा धोका वाढू शकतो. तसेच, किडनीचे कार्य बिघडल्यामुळेही रक्तदाब वाढू शकतो. म्हणजेच, उच्च रक्तदाब हा किडनीच्या आजाराचे कारणही असू शकतो आणि किडनीच्या आजारामुळे उद्भवणारी समस्याही असू शकतो.
मूत्रपिंडाची तपासणी किती वेळा करावी?
ज्या व्यक्तींना किडनीच्या आजाराचा कोणताही धोका नाही, त्यांनाही नियमित आरोग्य तपासणी करताना किडनीच्या चाचण्या करून घेता येतात. या चाचण्या किती वेळा कराव्यात, हे व्यक्तीचे वय आणि आरोग्याची स्थिती यावर अवलंबून असते. मात्र, ज्या व्यक्तींना काही विशिष्ट आजार आहेत किंवा किडनीच्या आजाराचा धोका जास्त आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अधिक वेळा तपासणी करून घेणे गरजेचे असते. यामध्ये प्रामुख्याने खालील व्यक्तींचा समावेश होतो…
- मधुमेह (Diabetes)
- उच्च रक्तदाब
- लठ्ठपणा
- मूत्रपिंडाच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास
- हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार (Cardiovascular disease)
- काही विशिष्ट औषधांचा नियमित वापर
लक्षणे नसतानाही मूत्रपिंडाच्या समस्या असू शकतात का?
डॉक्टर गावडे यांच्या मते, तुम्हाला निरोगी वाटत असले तरीही तुमची किडनी (मूत्रपिंड) व्यवस्थित काम करत आहेतच, असे नाही. किडनीच्या आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वीच रक्त आणि लघवीच्या साध्या चाचण्यांमधून काही समस्या ओळखता येऊ शकतात. त्यामुळे, किडनीच्या आरोग्याची काळजी घेताना केवळ लक्षणांवर अवलंबून राहू नये. सीरम क्रिएटिनिन, eGFR, UACR आणि रक्तदाब यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी करणे महत्त्वाचे आहे. या सर्व चाचण्यांचे निकाल एकत्र पाहिल्यास किडनीच्या आरोग्याची अधिक चांगली माहिती मिळू शकते. फक्त एखादे लक्षण किंवा एका चाचणीचा निकाल पाहून किडनीच्या आरोग्याबाबत निष्कर्ष काढणे सुद्धा योग्य नाही.
