Kidney Symptoms in Eyes: साधारणपणे डोळ्यांना हृदयाचा आरसा म्हटले जाते; पण खरं तर डोळे आपल्या मूत्रपिंडाच्या (किडनीच्या) आरोग्याबद्दलही बरीच माहिती देतात. किडनी आणि डोळ्यांची रचना व काम करण्याची पद्धत काही प्रमाणात सारखी असते. त्यामुळे जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा त्याची काही लक्षणे आधी डोळ्यांमध्ये दिसू लागतात.

बहुतेक लोक किडनीच्या आजाराला पायांना सूज येणे किंवा सतत थकवा येणे याच्याशी जोडतात; पण काही महत्त्वाची लक्षणे अशीही असतात, जी डोळ्यांमधून दिसतात. नवी दिल्लीतील व्हिजन आय केअर सेंटरचे नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रणव कृष्ण पटेल यांच्या मते, ही लक्षणे वेळेवर ओळखली, तर गंभीर आजार होण्यापासून बचाव करता येऊ शकतो.

डोळ्यांच्या आजूबाजूला सूज (पफी आयलिड्स)

सकाळी उठल्यावर डोळ्यांच्या आजूबाजूला सूज दिसणे हे किडनीच्या बिघाडाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. जेव्हा किडनी प्रोटीन नीट गाळू शकत नाही, तेव्हा शरीरात जास्त पाणी साठू लागते. याचा परिणाम सर्वांत आधी डोळ्यांच्या नाजूक भागावर दिसतो. अशा वेळी मिठाचे सेवन कमी करणे, शरीरातील प्रोटीनची पातळी तपासणे आणि किडनीची तपासणी (किडनी फंक्शन टेस्ट) करून घेणे गरजेचे असते.

धूसर दिसणे

किडनीच्या आजारामुळे होणारा उच्च रक्तदाब (हाय बीपी) किंवा वाढलेली साखर डोळ्यांच्या रेटिनामधील बारीक नसांना नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे दिसायला धूसर वाटू लागते. हा बदल अनेकदा हळूहळू होतोम्हणून नियमितपणे डोळ्यांची तपासणी करणे आणि रक्तदाब व साखर नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

डोळ्यांमध्ये कोरडेपणा

जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा शरीरात घाणेरडे घटक (टॉक्सिन्स) साचू लागतात. याचा परिणाम अश्रू तयार होण्यावरही होतो. त्यामुळे डोळे कोरडे वाटणे, जळजळ होणे किंवा वाळू गेल्यासारखी चुरचरल्यासारखं जाणवतं. अशा वेळी भरपूर पाणी पिणे, डोळ्यांसाठी लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरणे आणि लक्षणे कायम राहिल्यास डॉक्टरांना सांगणे गरजेचे आहे, विशेषतः सोबत थकवा किंवा सूज असल्यास.

लाल किंवा रक्ताने भरलेल्या डोळ्या (ब्लडशॉट डोळे)

डोळ्यांमध्ये जास्त लाल नस दिसणे किंवा डोळे सतत लाल राहणे हे उच्च रक्तदाब किंवा शरीरात घाणेरडे घटक (टॉक्सिन्स) साचल्याचे लक्षण असू शकते. हे अनेकदा किडनीच्या गंभीर आजाराशी संबंधित असते.

अशा वेळी दारू, कॅफिन आणि प्रोसेस्ड अन्न टाळणे गरजेचे आहे. तसेच इतर लक्षणांसोबत ही समस्या असल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

डोळे पिवळे होणे

किडनी फेल झाल्यामुळे शरीरात युरियासारखे घातक घटक वाढले किंवा लिव्हरवर परिणाम होऊ लागला, तर डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर दिसू शकतो. ही स्थिती वैद्यकीय आपत्कालीन (इमर्जन्सी) मानली जाते. त्यामुळे तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधणे खूप गरजेचे असते. डोळे फक्त पाहण्यासाठी नसतात; तर ते आपल्या किडनीच्या आरोग्याचाही इशारा देतात. त्यामुळे असे बदल दुर्लक्ष करू नका. वेळेवर ओळख आणि योग्य उपचार केल्यास तुमचे प्राण वाचू शकतात.