Kidney Failure 7 Silent Warning Signs: मूत्रपिंड हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. रक्तातील अपायकारक घटक गाळून ते लघवीद्वारे बाहेर टाकणे, शरीरातील पाणी आणि क्षारांचे संतुलन राखणे, तसेच रक्तदाब आणि इतर अनेक शारीरिक प्रक्रियांमध्ये मदत करणे अशी महत्त्वाची कामे मूत्रपिंडे सातत्याने करत असतात. विशेष म्हणजे हे काम दिवस-रात्र अविरत सुरू असते. मात्र, मूत्रपिंडांच्या कार्यात जेव्हा बिघाड व्हायला लागतो तेव्हा तो हळूहळू होत असतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्याची लक्षणे ठळकपणे जाणवतीलच, असे नाही.

कित्येकदा शरीरात होणाऱ्या काही छोट्या छोट्या बदलांकडे दुर्लक्ष केले जाते. चेहऱ्यावर किंवा पायांवर आलेली सूज, लघवीच्या स्वरूपात झालेला बदल, सतत जाणवणारा थकवा यांसारख्या संकेतांकडे अनेकदा साधा त्रास म्हणून पाहिले जाते. मात्र, अशा बदलांकडे वारंवार लक्ष वेधले जात असेल, तर त्यामागे मूत्रपिंडांच्या कार्याशी संबंधित कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग आरशात पाहताना किंवा दैनंदिन जीवनात जाणवणारे कोणते ७ बदल वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे, ते आपण पाहू…

१. चेहरा, पाय किंवा घोट्यांवर अचानक सूज

सकाळी उठल्यानंतर चेहरा फुगलेला दिसणे किंवा दिवसभरात पाय, घोटे आणि तळपाय सुजल्याचे जाणवणे हा शरीरात द्रव साठून राहिले असण्याचा संकेत असू शकतो. मूत्रपिंडांची गाळण क्षमता कमी झाल्यास शरीरातील अतिरिक्त द्रव आणि क्षार बाहेर टाकण्यात अडथळा येऊ शकतो, परिणामी सूज दिसू शकते. विशेषतः अशी सूज वारंवार दिसून येत असेल, तर तिच्याकडे दुर्लक्ष न करता, वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरते.

२. लघवीत वारंवार फेस दिसणे

लघवी करताना अधूनमधून थोडा फेस दिसणे हे गंभीर कारण असेल, असे नाही मात्र, लघवी वारंवार आणि जास्त प्रमाणात फेसाळ दिसत असेल, तर त्यामागे लघवीतून प्रथिने जाणे हे कारण असू शकते.मूत्रपिंडांची गाळण यंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्यास अशी स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा बदल सातत्याने जाणवत असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने आवश्यक ती शारीरिक तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

३. कारण नसताना वजन झपाट्याने वाढणे

आहार किंवा व्यायामाच्या सवयींमध्ये विशेष बदल नसतानाही वजन अचानक वाढत असेल, तर त्याकडे लक्ष द्या. काही वेळा शरीरात अतिरिक्त द्रव साठल्यामुळे वजन वाढू शकते. अशा वाढलेल्या वजनासोबत पाय किंवा चेहऱ्यावर सूजही जाणवत असेल, तर वैद्यकीय तपासणी आवश्यक ठरू शकते.

४. विश्रांतीनंतरही न जाणारा थकवा

दिवसभर काम केल्यानंतर थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. पण, पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यानंतरही सतत अशक्तपणा, ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटणे किंवा नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवत असेल, तर त्यामागे विविध आरोग्यविषयक कारणे असू शकतात. मूत्रपिंडाचे कार्य कमी झाल्यास शरीरात काही अपायकारक घटक साठू शकतात आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

५. भूक मंदावणे, मळमळ जाणवणे

अचानक खाण्याची इच्छा कमी होणे, थोडेसे खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटणे किंवा वारंवार मळमळ होणे यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मूत्रपिंडांची कार्यक्षमता कमी झाल्यास रक्तातील काही अपायकारक घटकांचे प्रमाण वाढू शकते. त्याचा परिणाम भूक आणि पचनाशी संबंधित तक्रारींवर होण्याची शक्यता असते.

६. रात्री वारंवार लघवीला उठणे

रात्री एकापेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावे लागणे याला अनेक कारणे असू शकतात. मात्र, हा त्रास सातत्याने होत असेल आणि त्यासोबत इतर लक्षणेही जाणवत असतील, तर मूत्रपिंडाच्या कार्याची तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात. वारंवार जाग आल्यामुळे झोपेवरही परिणाम होऊन दिवसभर थकवा जाणवू शकतो.

७. वारंवार संसर्ग होणे

शरीराची प्रतिकारशक्ती कमी होणे, लघवीच्या मार्गातील संसर्ग वारंवार होणे किंवा आजारातून बरे होण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणे यामागे अनेक कारणे असू शकतात. काही मूत्रपिंडविषयक आजारांमध्ये शरीरातील प्रथिनांचे संतुलन बिघडू शकते आणि त्यामुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी काय काळजी घ्याल?

मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अति मीठ, अति प्रक्रिया केलेले पदार्थ आणि अनावश्यक तेलकट पदार्थांचे सेवन कमी करणे, पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि नियमित शारीरिक हालचाल ठेवणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी असल्याने विशेषतः आधीपासून मूत्रपिंडाचा आजार असल्यास आहारातील प्रथिने किंवा पाण्याचे प्रमाण स्वतःहून बदलू नये.

शरीरातील एखादा बदल काही दिवस जाणवला म्हणून लगेच गंभीर आजार असल्याचे मानण्याची गरज नाही. मात्र, सूज, लघवीतील बदल, सततचा थकवा, मळमळ किंवा रात्री वारंवार लघवी होणे यांसारखी लक्षणे सातत्याने दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्षही करू नका. वेळेवर वैद्यकीय तपासणी केल्यास कारण समजण्यास आणि योग्य उपचार घेण्यास मदत होऊ शकते.

(टीप : वरील माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. ही लक्षणे इतर अनेक कारणांमुळेही होऊ शकतात. मूत्रपिंडाच्या आरोग्याबाबत शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःहून औषधोपचार किंवा आहारातील मोठे बदल करू नका.)