Kidney Failure Six Warning Signs You Should Not Ignore: किडन्या म्हणजे मूत्रपिंडे हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव बाहेर काढण्यापासून शरीरातील क्षार आणि खनिजांचे संतुलन राखण्यापर्यंत अनेक महत्त्वाची कामे मूत्रपिंडे करतात. त्यामुळे त्यांच्या कार्यात बिघाड झाला, तर त्याचा परिणाम शरीराच्या अनेक भागांवर होऊ शकतो.

विशेष म्हणजे मूत्रपिंडाच्या आजाराची सुरुवात अनेकदा अगदी शांतपणे होते. सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे दिसणार नाहीत. आजार वाढू लागल्यानंतर मात्र शरीर काही संकेत देऊ शकते. त्यामुळे काही बदल वारंवार जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

मूत्रपिंडे शरीरासाठी एवढी महत्त्वाची का?

मूत्रपिंडे रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी गाळून लघवीद्वारे शरीरातून बाहेर टाकतात. त्यासोबतच रक्तातील सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांसारख्या खनिजांचे संतुलन राखण्यास ती मदत करतात. रक्तदाब नियंत्रित ठेवणे आणि लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत करणारे संप्रेरक तयार करणे, अशीही मूत्रपिंडांची महत्त्वाची कामे आहेत.

मूत्रपिंडांचे कार्य मोठ्या प्रमाणात कमी झाल्यास शरीरात टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव साचू लागतो. त्यामुळे विविध त्रास जाणवू शकतात. जाणून घेऊया अशाच सहा संकेतांबद्दल…

१. पाय आणि घोट्यांना सूज

पाय, घोटे किंवा तळपाय अचानक किंवा वारंवार सुजत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. मूत्रपिंडे शरीरातील अतिरिक्त द्रव आणि मीठ योग्य प्रकारे बाहेर काढू शकत नसल्यास शरीरात पाणी साचू शकते आणि त्यामुळे सूज येऊ शकते. ही सूज काही वेळा हात किंवा चेहऱ्यावरही दिसू शकते.

२. सतत थकवा आणि अशक्तपणा

पुरेशी झोप घेऊनही सतत थकवा जाणवत असेल, काम करण्याची इच्छा कमी झाली असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. मूत्रपिंडांचे कार्य कमी झाल्यावर शरीरात टाकाऊ पदार्थ साचू शकतात. मूत्रपिंडांच्या आजाराशी संबंधित रक्तक्षयामुळेही थकवा आणि अशक्तपणा वाढू शकतो.

३. डोळ्यांभोवती सूज

सकाळी उठल्यानंतर डोळ्यांच्या आसपास वारंवार फुगवटा किंवा सूज दिसत असेल, तर त्याकडेही लक्ष द्या. काही मूत्रपिंडांच्या आजारांमध्ये लघवीतून प्रथिने जास्त प्रमाणात बाहेर पडू शकतात. त्यामुळे शरीरात द्रव साचून चेहरा आणि डोळ्यांच्या आसपास सूज दिसू शकते.

४. लघवीच्या पद्धतीत बदल

लघवीच्या प्रमाणात किंवा स्वरूपात अचानक बदल जाणवणे हा महत्त्वाचा संकेत असू शकतो. रात्री वारंवार लघवीला होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, लघवीत फेस किंवा बुडबुडे दिसणे, तसेच लघवीचा रंग गडद होणे यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

लघवीत रक्त दिसणे हेही दुर्लक्षित करण्यासारखे लक्षण नाही. मात्र, लघवीतील प्रत्येक बदल मूत्रपिंडांच्या आजारामुळेच होतो, असे नाही. त्यामुळे स्वतःहून निष्कर्ष काढण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

५. स्नायूंमध्ये वारंवार आकडी

पाय किंवा शरीरातील इतर स्नायूंमध्ये वारंवार आकडी येत असेल, तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. मूत्रपिंडांचे कार्य बिघडल्यावर शरीरातील काही क्षार आणि खनिजांचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे स्नायूंमध्ये आकडी, अशक्तपणा किंवा इतर त्रास जाणवू शकतात.

६. भूक मंदावणे, मळमळ

मूत्रपिंडांचे कार्य मोठ्या प्रमाणात कमी झाल्यावर शरीरात टाकाऊ पदार्थ साचल्यामुळे मळमळ, उलट्या, भूक कमी होणे किंवा वजन घटणे यांसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे काही दिवसांपासून विनाकारण भूक कमी झाली असेल किंवा सतत मळमळत असेल, तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका.

लक्षणे दिसली म्हणजे किडनी फेल झाली असे नाही!

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरीलपैकी एक किंवा अधिक लक्षणे दिसली म्हणून ???मूत्रपिंडे (की- एक वा दोन्ही मूत्रपिंडे)??? निकामी झाली आहेत, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. या लक्षणांमागे इतरही अनेक कारणे असू शकतात. उलट, मूत्रपिंडांच्या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. मूत्रपिंडांची कार्यक्षमता तपासण्यासाठी रक्त आणि लघवीच्या तपासण्या महत्त्वाच्या असतात.

मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कुटुंबात मूत्रपिंडाच्या आजाराचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरात वारंवार असे बदल जाणवत असतील, तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचारांमुळे मूत्रपिंडांच्या आजाराचे व्यवस्थापन करणे शक्य आहे.