kidney stone treatment without surgery: मूत्रपिंडात खडा झाल्यानंतर अनेकदा पहिला प्रश्न मनात येतो की, हा खडा शस्त्रक्रियेशिवाय बाहेर पडू शकतो का? याचे उत्तर केवळ खड्याच्या आकारावर अवलंबून नसते. डॉक्टर उपचारांदरम्यान खडा मूत्रपिंडामध्ये आहे की मूत्रवाहिनीत, त्याचा आकार किती आहे, मूत्रप्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे का आणि रुग्णाला वेदना, संसर्ग किंवा मूत्रपिंडाच्या कार्याशी संबंधित समस्या आहेत का, अशा सर्व गोष्टींचा विचार करतात. तज्ज्ञांच्या मते, मूत्रवाहिनीतील लहान खडे आपोआप बाहेर पडण्याची शक्यता अधिक असते.

किडनी स्टोनचा आकार निसर्गत: बाहेर पडण्याच्या शक्यता कितपत अवलंबून?

खड्याचा आकार जसजसा वाढतो, तसतसा तो आपोआप बाहेर पडण्याची शक्यता साधारणपणे कमी होते. याचे कारण म्हणजे मूत्रपिंडापासून मूत्राशयापर्यंत जाणारी मूत्रवाहिनी ही एक अरुंद, स्नायुमय नळी असते. लहान खडे या नळीतून पुढे जाऊ शकतात; तर मोठे खडे अडकून मूत्रप्रवाहात अडथळा निर्माण करू शकतात. अमेरिकन युरोलॉजिकल असोसिएशनच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, १० मिमी किंवा त्यापेक्षा लहान आकाराचे मूत्रवाहिनीतील खडे असलेल्या काही रुग्णांना खडा आपोआप बाहेर पडण्याची प्रतीक्षा करण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो. मात्र, हा निर्णय रुग्णाची लक्षणे, इतर आजार, संसर्ग आणि खड्याचे स्थान यांसारख्या घटकांवर अवलंबून असतो.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI)मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, मूत्रवाहिनीच्या खालच्या भागातील पाच मिमी किंवा त्यापेक्षा लहान खडे आपोआप बाहेर पडण्याची शक्यता अंदाजे ८७ टक्के असते. तर पाच मिमीपेक्षा मोठ्या खड्यांसाठी ही शक्यता अंदाजे ७५ टक्के असल्याचे आढळले. वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये खडा बाहेर पडण्यासाठी लागणाऱ्या कालावधीतही फरक दिसून आला आहे.

५ मिमीपेक्षा लहान खडा पाणी आणि औषधांद्वारे बाहेर पडू शकतो?

तज्ज्ञांच्या मते, ५ पाच मिमीपेक्षा लहान मूत्रवाहिनीतील खडे आपोआप बाहेर पडण्याची बऱ्यापैकी शक्यता असते. मात्र, औषध किंवा पाण्याने खडा विरघळवणे आणि शरीरातून खडा नैसर्गिकरीत्या बाहेर टाकणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अमेरिकन मेडिकल असोसिएशन (AMA)च्या माहितीनुसार, शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी आणि लघवीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. मात्र, जास्त पाणी प्यायल्याने सर्व प्रकारचे खडे लवकर बाहेर पडतात, याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. विशेषतः खड्यामुळे मूत्रप्रवाहात अडथळा निर्माण झाला असल्यास, वेदना कमी करण्यासाठी किंवा अडथळा दूर करण्यासाठी जबरदस्तीने भरपूर पाणी पिणे हा योग्य उपाय नाही.

५ ते १० मिमीच्या किडनी स्टोनबाबतचा निर्णय कोणत्या घटकांवर अवलंबून?

५ ते १० मिमी आकाराचे खडे हे उपचारांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. अशा वेळी केवळ खड्याचा आकार पाहून उपचार ठरवणे योग्य नसते.

किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांकडून सामान्यतः तपासल्या जाणाऱ्या गोष्टी खालीलप्रमाणे :

  • खडा मूत्रवाहिनीच्या कोणत्या भागात आहे?
  • तो मूत्रपिंडापासून किती अंतरावर आहे?
  • लघवीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे का?
  • किडनीला सूज आली आहे का (हायड्रोनेफ्रोसिस)?
  • औषधांनी वेदना नियंत्रणात येत आहेत का?
  • ताप किंवा मूत्रमार्गाचा संसर्ग आहे का?
  • किडनीचे कार्य सामान्य आहे का?
  • सीटी स्कॅन किंवा अल्ट्रासाऊंडमध्ये खड्याचा आकार आणि नेमके स्थान काय दिसते?

NCBI मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार, मूत्रवाहिनीच्या खालच्या भागात ५ ते १० मिमी आकाराचे खडे असलेल्या रुग्णांमध्ये पाच ते सात मिमी आकाराचा खडा आपोआप बाहेर पडण्याची शक्यता सुमारे ७० टक्के, तर ७ ते १० मिमी आकाराच्या खड्यासाठी ही शक्यता सुमारे ४० टक्के असल्याचे आढळले. त्यावरून खड्याच्या आकारातील फरकही उपचारांचा निर्णय घेताना महत्त्वाचा ठरू शकतो.

मूत्रपिंडातील खडे शस्त्रक्रियेशिवाय सहजपणे बाहेर काढण्यासाठी उपयुक्त असलेले तीन रस…

लिंबाचा रस

आयुर्वेद आणि संशोधनानुसार, मूत्रपिंडातील खडे काढून टाकण्यासाठी नियमितपणे लिंबू पाणी पिणे आवश्यक आहे. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते, जे आपल्या शरीरात कॅल्शियमचे खडे तयार होण्यापासून रोखते. सायट्रिक अॅसिड खडे तोडते आणि त्यामुळे मूत्रमार्गे त्यांचे उत्सर्जन वाढते. लिंबाच्या रसाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. जर आपण नियमितपणे लिंबू पाणी प्यायलो, तर त्यात आपल्या शरीरातील जीवाणू काढून टाकण्याची शक्ती असते. लिंबाच्या रसात क जीवनसत्त्वदेखील भरपूर प्रमाणात असते, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

तुळशीच्या पानांचा रस

आयुर्वेदात तुळशीचे अनेक उपयोग आहेत आणि वैद्यकीय शास्त्रातही ती फायदेशीर मानली जाते. डॉ. पुनित धवन यांच्या मते, तुळशीच्या पानांमध्ये अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड असते, जे मूत्रपिंडातील खडे विरघळण्यास मदत करते आणि वेदना कमी करते. तुळशीच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक असतात, जे तुमच्या शरीराची पचनसंस्था सुधारण्यासाठी वापरले जातात आणि तुळशीची पाने कोणतीही जळजळ कमी करण्यासदेखील मदत करतात. तुळशीच्या पानांच्या रसात अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल व अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे मूत्रपिंडांच्या चांगल्या आरोग्यासाठी योगदान देतात.

डाळिंबाचा रस

डाळिंबाचा रस पिणे अनेक वर्षांपासून मूत्रपिंडांच्या योग्य कार्यासाठी फायदेशीर आहे. डाळिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने मूत्रपिंडातील खडे तुटण्यास मदत होते आणि तुमच्या शरीरातील सर्व प्रकारचे विषाक्त पदार्थ बाहेर पडतात. डाळिंबाच्या रसात अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. जर तुम्हाला मूत्रपिंडातील खड्यांची कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर हा रस त्यांना वाढण्यापासून रोखण्यास आणि तुमच्या लघवीतील आम्लता कमी करण्यास मदत करू शकतो.

१० मिमीपेक्षा मोठ्या किडनी स्टोनसाठी उपचारांची गरज का वाढते?

खड्याचा आकार वाढल्यास तो मूत्रवाहिनीतून आपोआप बाहेर पडण्याची शक्यता कमी होते. NCBI मध्ये नमूद केलेल्या एका सीटी स्कॅन अभ्यासानुसार, नऊ मिमीपेक्षा मोठ्या खड्यांमध्ये आपोआप बाहेर पडण्याची शक्यता सुमारे २५ टक्के होती. त्याउलट एक मिमी आकाराच्या खड्यांसाठी ही शक्यता ८७ टक्के, तर दोन ते चार मिमी आकाराच्या खड्यांसाठी ७६ टक्के होती.

त्यामुळे मोठ्या खड्यांच्या बाबतीत डॉक्टरांना औषधोपचारांव्यतिरिक्त इतर उपचारांचा विचार करावा लागू शकतो. मात्र, शस्त्रक्रिया किंवा अन्य उपचारांची आवश्यकता खड्याचे स्थान, मूत्रप्रवाहातील अडथळा, संसर्ग, वेदना आणि मूत्रपिंडांची कार्यक्षमता यांवरही अवलंबून असते.

एकंदरीत, मूत्रपिंडांतील खड्यांचाआकार हा उपचार ठरवताना महत्त्वाचा घटक असला तरी तो एकमेव निकष नाही. साधारणपणे पाच मिमी किंवा त्यापेक्षा लहान आणि मूत्रवाहिनीच्या खालच्या भागात असलेले खडे आपोआप बाहेर पडण्याची शक्यता अधिक असते. ५ ते १० मिमी आकाराच्या खड्यांसाठी परिस्थितीनुसार उपचार ठरवले जातात; तर १० मिमीपेक्षा मोठ्या खड्यांसाठी सक्रिय उपचारांची आवश्यकता भासू शकते. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यास मदत होते.