Natural Remedies for Kidney Stones: मूत्रपिंडे ही शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक मानले जातात. रक्तातील अपायकारक घटक आणि अतिरिक्त द्रव गाळून, ते मूत्रावाटे शरीरातून बाहेर टाकण्याचे काम मूत्रपिंडे करतात. त्यामुळे मूत्रपिंड निरोगी राहणे संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते. मात्र, चुकीचा आहार, अपुरी पाणीपिण्याची सवय आणि बदललेली जीवनशैली यामुळे अनेकांना मूत्रपिंडातील पथरीचा त्रास जाणवतो.

मूत्रपिंडात खडे तयार झाल्यास कंबरेच्या बाजूला किंवा पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना होऊ शकतात. काही वेळा ही वेदना पोटाच्या खालच्या भागापासून मूत्रमार्गापर्यंत जाणवते. वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ किंवा वेदना, मळमळ, उलटी, तसेच लघवीत रक्त दिसणे, अशी लक्षणेही आढळू शकतात.

मूत्रपिंडातील खड्यांचा आकार अगदी बारीक कणांपासून मोठ्या खड्यांपर्यंत असू शकतो. लहान खडे काही वेळा नैसर्गिकरीत्या मूत्रावाटे बाहेर पडू शकतात; मात्र मोठे खडे अडकण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहणे योग्य ठरत नाही. खड्याचा आकार, त्याचे स्थान आणि रुग्णाची लक्षणे पाहून डॉक्टर योग्य ते उपचार ठरवतात.

तरीही मूत्रपिंडात खडे झाल्याने होणाऱ्या त्रासांबाबत बोलताना काही घरगुती उपाय आणि आहारातील बदल यांची नेहमीच चर्चा केली जाते. त्यापैकी नेमक्या कोणत्या तीन गोष्टींचा उल्लेख केला जातो, ते पाहूया.

१. लिंबाचा रस आणि जैतूनचे तेल

हार्वर्ड हेल्थच्या एका अहवालानुसार, मूत्रपिंडातील खड्यांसाठी लिंबाचा रस आणि जैतूनचे तेल (ऑलिव्ह तेल) यांचे मिश्रण हा एक घरगुती उपाय म्हणून अनेक ठिकाणी सांगितला जातो. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड हा घटक मोठ्या प्रमाणात आढळतो. तो लघवीतील आम्लता कमी करण्यास मदत करू शकतो. सायट्रेटमुळे मूत्रपिंडात कॅल्शियमचे खडे तयार होण्याची शक्यता कमी होऊ शकते. हा अॅसिड लघवीतील कॅल्शियमशी संयोग साधून त्याला बांधून ठेवते. त्यामुळे कॅल्शियमचे सूक्ष्म स्फटिक एकत्र येऊन मोठा खडा तयार होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे आहारात लिंबाचा रस घेण्याकडे काही तज्ज्ञांकडूनही लक्ष दिले जाते.

मूतखड्याचा आकार लहान असल्यास ती काही वेळा नैसर्गिकरीत्या मूत्रावाटे बाहेर पडू शकते; परंतु मोठा खडा अडकला असल्यास, तो स्वतःहून बाहेर पडेलच, असे नाही. अशा वेळी तीव्र वेदना, लघवीत अडथळा किंवा इतर गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे मूतखड्याचा आकार आणि स्थान जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

२. सिंहपर्णी

सिंहपर्णी म्हणजेच इंग्रजीत ‘डँडेलियन’ (Dandelion) म्हणून ओळखली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीची पाने सिंहाच्या दातांसारखी टोकदार आणि धारदार दिसतात म्हणूनच याला ‘सिंहपर्णी’ (सिंहासारखी पाने असलेली), असे नाव पडले आहे. सिंहपर्णी या वनस्पतीचा वापर पारंपरिक पद्धतीने विविध कारणांसाठी केला जातो. तिच्यामुळे लघवीचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते, अशी चर्चा आढळते. त्यामुळे शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने तिच्याकडे पाहिले जाते.

मात्र, सिंहपर्णीमुळे मूत्रपिंडातील मोठे खडे विरघळतात, असा ठोस वैद्यकीय पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे तो मूतखड्यावरील निश्चित उपचार मानता येत नाही.

३. जास्वंदीचे फूल

जास्वंदीच्या फुलाचा वापर अनेक घरांमध्ये पारंपरिक उपाय म्हणून केला जातो. त्याचा चहा किंवा इतर स्वरूपात वापर करण्याची पद्धत काही ठिकाणी प्रचलित आहे. मात्र, मूत्रपिंडातील खडा विरघळवण्यासाठी जास्वंदीचा चूर्ण निश्चित उपचार आहे, असे मानण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

पाणी पिणे सर्वांत महत्त्वाचे

मूत्रपिंडातील खड्यांचा त्रास असताना पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे ठरते. मात्र, किती पाणी प्यावे हे व्यक्तीची प्रकृती, खड्याचा प्रकार आणि इतर आजारांनुसार बदलू शकते.

मूत्रपिंडातील खडे, असह्य वेदना, ताप, थंडी वाजणे, सतत उलटी होणे किंवा लघवी बंद होणे, अशी लक्षणे दिसल्यास घरगुती उपाय करण्यात वेळ घालवू नये. अशा परिस्थितीत तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. काही मोठे खडे स्वतःहून बाहेर पडत नाहीत आणि त्यासाठी औषधोपचार किंवा वैद्यकीय प्रक्रिया आवश्यक ठरू शकते.

(आरोग्यविषयक सूचना : या बातमीतील माहिती सामान्य स्वरूपाची आहे. मूत्रपिंडातील खड्यांचा आकार किंवा प्रकार जाणून घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. कोणताही घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)