Ignoring Kidney Stones May Increase the Risk of Cancer: धावपळीच्या जीवनशैलीत मूत्रपिंडातील खड्यांची समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. लहानशी वाटणारी ही समस्या पुढे जाऊन किती गंभीर रूप धारण करू शकते, याचा अनेकांना अंदाजही नसतो. तज्ज्ञांच्या मते, वेळेवर लक्ष न दिल्यास ही स्थिती मूत्रपिंडाच्या गंभीर आजारांपासून ते कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारापर्यंत पोहोचू शकते.
प्रेमा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्जन डॉ. अर्शद यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली असून, सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मूत्रपिंडातील खड्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पाणी कमी पिणे ठरतेय सर्वांत मोठं कारण
डॉ. अर्शद यांच्या मते, मूत्रपिंडातील खडे होण्यामागे सर्वांत मोठं कारण म्हणजे पाण्याची अपुरी मात्रा आणि अयोग्य आहार.
ते म्हणाले, “आजच्या काळात लोक पुरेशा प्रमाणात पाणी पीत नाहीत आणि आहाराकडे दुर्लक्ष करतात. याचमुळे शरीरात क्षार व खनिजे साचून, खडे तयार होतात. जर दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी नियमित प्यायलं गेलं, तर खडे होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.”
त्यांनी पुढे सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत आता तपासण्या अधिक होत असल्याने मूत्रपिंडात खडे सापडण्याची प्रकरणे जास्त प्रमाणात लक्षात येत आहेत. मात्र, त्यामागे चुकीची जीवनशैली हेच मुख्य कारण आहे.
छोट्या खड्यांकडे दुर्लक्ष म्हणजे मोठा धोका
मूत्रपिंडातील खडे सुरुवातीला लहान असतात आणि ते औषधोपचार व योग्य प्रमाणातील पाण्याच्या सेवनाने बाहेर पडू शकतात. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते मूत्रवाहिनीत अडकू शकतात आणि वेदना, संसर्ग, तसेच गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
तज्ज्ञ सांगतात की, जर खड्यांचा आकार ७ मिमीपेक्षा जास्त असेल, तर अनेक वेळा शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारावा लागतो. काही वेळा दुर्बिणीद्वारे (एंडोस्कोपी) उपचार करावे लागतात.
कर्करोगाचा धोका खरंच वाढू शकतो का?
डॉ. अर्शद यांनी स्पष्ट केले की, दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या मूत्रपिंडातील खड्यांमुळे मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकते आणि संसर्ग वाढू शकतो. अत्यंत गंभीर परिस्थितीत यामुळे किडनी फेल्युअर किंवा इतर गुंतागुंत निर्माण होऊ शकते, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
आहार आणि जीवनशैलीतील बदल आवश्यक
तज्ज्ञांच्या मते, मूतखड्यांपासून बचावासाठी जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. भरपूर पाणी पिणे, ताज्या फळांचे सेवन करणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. खूप वेळ लघवी रोखून ठेवणे किंवा चुकीचा आहार यांमुळे समस्या अधिक वाढू शकते.
वेळेवर उपचार केल्यास पूर्ण बरा होण्याची शक्यता
जर मूत्रपिंडातील खड्याबाबतचे निदान सुरुवातीच्या टप्प्यातच झाले, तर औषधोपचार आणि पाण्याच्या योग्य सेवनाने तो सहज बाहेर पडू शकतो. त्यामुळे वेदना किंवा इतर लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.
निष्कर्ष
मूत्रपिंडातील खडे ही तशी सामान्य, पण दुर्लक्षित केल्यास अत्यंत गंभीर रूप घेणारी समस्या आहे. योग्य वेळी उपचार आणि योग्य जीवनशैली स्वीकारल्यास या आजारापासून सहज बचाव करणे शक्य आहे. तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा आहे की, लहानसा हलगर्जीपणा भविष्यात मोठ्या आरोग्य संकटाचे कारण ठरू शकते.
