Kidney Stone Symptoms: किडनीमध्ये खडे (स्टोन) होण्याची समस्या अनेकांना होते. मात्र, या आजाराबाबत अनेकांच्या मनात गैरसमज असल्यामुळे उपचार घेण्यास उशीर होतो. याबाबत एम्स (AIIMS), नवी दिल्ली येथील युरोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. राजीव कुमार यांनी किडनी स्टोनबाबतचे काही महत्त्वाचे गैरसमज दूर केले आहेत. अनेक रुग्ण चुकीच्या सल्ल्यामुळे अशी कामे करतात, ज्यामुळे त्यांची समस्या आणखी वाढू शकते. त्यामुळे किडनी स्टोनबाबत कोणत्या चुकीच्या समजुती टाळाव्यात, हे जाणून घेऊया.

किडनी स्टोन म्हणजे काय?

आपल्या शरीरातील दोन्ही किडनी रक्तातील घाण फिल्टर करून ती लघवीद्वारे बाहेर टाकतात. काही खनिजे (मिनरल्स) शरीरात जास्त प्रमाणात साचली की किडनीमध्ये खडे तयार होऊ लागतात. काही वेळा हे खडे लघवीतून आपोआप बाहेर पडतात. पण ते मोठे झाल्यास तीव्र वेदना होऊ शकतात आणि किडनीलाही नुकसान पोहोचू शकते.

स्टोनमध्ये कुठे दुखते?

किडनी स्टोन असल्यास पाठ, कंबरेच्या बाजूला किंवा पोटाच्या खालच्या भागात वेदना होऊ शकतात. तसेच लघवी अडखळत किंवा थांबत-थांबत होणे हेही त्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

स्टोनचा त्रास कसा जाणवतो?

स्टोनमुळे अचानक आणि खूप तीव्र वेदना सुरू होतात. किडनीमध्ये काहीतरी टोचत असल्यासारखे जाणवते.

स्टोन टाळण्यासाठी कॅल्शियम खाऊ नये का?

डॉ. राजीव कुमार यांच्या मते, स्टोन टाळण्यासाठी कॅल्शियम खाणे बंद करणे हा गैरसमज आहे. जेव्हा आपण अन्नासोबत कॅल्शियम घेतो, तेव्हा ते आतड्यात ऑक्सलेटशी मिसळते आणि दोन्ही मलावाटे शरीरातून बाहेर पडतात. पण कॅल्शियम कमी घेतल्यास ऑक्सलेट रक्तात सहज मिसळते, किडनीपर्यंत पोहोचते आणि खडे तयार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे योग्य प्रमाणात कॅल्शियमचे सेवन केल्याने स्टोनपासून संरक्षण मिळू शकते.

स्टोन फक्त वृद्धांनाच होते का?

हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. किडनी स्टोन कोणत्याही वयात होऊ शकतो. अगदी लहान मुलांमध्येही मोठे खडे आढळू शकतात.

स्टोनचा आजार आनुवंशिक असतो का?

अनेकांना वाटते की स्टोनचा त्रास हा पूर्णपणे आनुवंशिक असतो आणि त्यापासून बचाव करणे शक्य नाही. मात्र, हे पूर्णपणे खरे नाही. काही प्रकारचे खडे आनुवंशिक असू शकतात, पण प्रत्येक वेळी तसेच असेल असे नाही.

स्टोन टाळण्यासाठी काय करावे?

किडनी स्टोन टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आणि मिठाचे सेवन कमी करणे फायदेशीर ठरते. ज्यांना एकदा स्टोन झाली आहे, त्यांनी खडे पुन्हा तयार होऊ नयेत म्हणून या सवयी नियमित पाळणे आवश्यक आहे.

किडनी स्टोनचा उपचार कसा केला जातो?

किडनी स्टोनवर साधारणपणे पाच प्रकारे उपचार केले जातात. लहान खडे अनेकदा आपोआप लघवीतून बाहेर पडतात. काही खड्यांवर शॉक वेव्ह थेरपीद्वारे उपचार केले जातात. या पद्धतीत शस्त्रक्रिया करावी लागत नाही. मोठे खडे किंवा मूत्रवाहिनीत (युरेटर) अडकलेले खडे शस्त्रक्रियेद्वारे काढले जातात. काही वेळा मूत्रमार्गातून स्कोपच्या मदतीने खडे काढले जातात. ही कमी चिरफाड करणारी प्रक्रिया आहे. गरज पडल्यास किडनीमध्ये छोटा छेद देऊन किंवा पारंपरिक शस्त्रक्रियेद्वारेही खडे काढले जातात. या उपचारांमध्ये लेझर तंत्रज्ञानाचाही वापर केला जाऊ शकतो.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)