Kidney Stone Warning Signs: अनेकांना अचानक कंबरेत तीव्र वेदना सुरू होतात. काहींना लघवी करताना जळजळ होते, तर काहींना पोटाच्या खालच्या भागात असह्य दुखणे जाणवते. सुरुवातीला साधा त्रास वाटणारी ही लक्षणे पुढे गंभीर स्वरूप धारण करू शकतात. विशेष बाब म्हणजे शरीरात ‘मूतखडा’ तयार होत असतानाही अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळेच हा आजार शांतपणे वाढत जातो आणि अचानक तीव्र वेदनांच्या रूपाने समोर येतो.

वैद्यकीय भाषेत याला ‘नेफ्रोलिथियासिस’ किंवा ‘युरोलिथियासिस’, असे म्हटले जाते. आपल्या मूत्रपिंडात म्हणजेच वृक्कांमध्ये खनिजे आणि क्षार जमा होऊन कठीण थर तयार होतात, त्यालाच सामान्य भाषेत ‘मूतखडा’ असे म्हटले जाते. अनेकांना वाटते की, फक्त चुकीच्या खाण्यापिण्यामुळेच हा त्रास होतो; पण प्रत्यक्षात त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास लघवी अधिक दाट होऊ लागते. त्यातून शरीरातील खनिजांचे छोटे स्फटिक तयार होतात आणि हे स्फटिक एकमेकांना चिकटून हळूहळू मोठ्या खड्याचे रूप धारण करतात. सुरुवातीला हा खडा वृक्कांमध्येच असतो; मात्र तो मूत्रमार्गाकडे सरकू लागला की खरा त्रास सुरू होतो.

विशेष म्हणजे जास्त मीठ, तेलकट पदार्थ, कमी पाणी पिण्याची सवय, वाढते वजन, काही औषधे, पूरक आहार किंवा काही वैद्यकीय समस्या यांमुळेही मूतखड्याचा धोका वाढू शकतो. अनेक वेळा सतत बाहेरचे अन्न खाणारे, कमी पाणी पिणारे किंवा दिवसभर लघवी रोखून ठेवणारे लोक या समस्येच्या विळख्यात अडकतात.

मूतखडा तयार झाल्यानंतर शरीर काही संकेत देऊ लागते; मात्र अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. सुरुवातीला पाठीत, बरगड्यांच्या खाली किंवा कंबरेच्या एका बाजूला तीव्र वेदना जाणवू शकतात. या वेदना लाटांप्रमाणे येतात आणि काही वेळाने कमी होतात; पण नंतर पुन्हा अचानक तीव्र होतात. काहींना ही वेदना पोटाच्या खालच्या भागातून थेट जांघांपर्यंत पसरल्यासारखी वाटते.

लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवी लागणे, लघवीचा रंग गुलाबी, लालसर किंवा तपकिरी होणे हीदेखील धोक्याची चिन्हे असू शकतात. काही वेळा लघवीला दुर्गंधी येऊ शकतो. परिस्थिती गंभीर झाल्यास ताप, थंडी वाजणे किंवा मळमळ आणि उलट्याही सुरू होऊ शकतात.

अनेकदा मूतखडा मूत्रमार्गात अडकतो आणि त्यामुळे मूत्रपिंडांना सूज येण्याचा धोका वाढतो. असे झाल्याने शरीरात संसर्गही पसरू शकतो. वेळेत उपचार न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

तज्ज्ञ सांगतात की, सुरुवातीच्या अवस्थेत मूतखडा ओळखला गेला, तर मोठे नुकसान टाळता येऊ शकते. भरपूर पाणी पिणे, योग्य औषधे घेणे आणि आहारात बदल करणे यांमुळे काही वेळा लहान मूतखडे नैसर्गिकरीत्या बाहेर पडू शकतात. मात्र, मोठा खडा असल्यास किंवा तो मूत्रमार्गात अडकला असल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.

विशेषतः काही लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे मानले जाते. उदाहरणार्थ वेदना इतक्या तीव्र असतील की बसणे किंवा उभे राहणे कठीण होईल, लघवीत रक्त दिसेल, ताप आणि थंडी भरून येईल किंवा लघवी करताना अडथळा निर्माण होईल, तर विलंब न करता वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात; मात्र शरीराकडून वेळोवेळी मिळणारे इशारे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण- सुरुवातीला साधा वाटणारा त्रास पुढे मोठ्या आजाराचे रूप धारण करू शकतो. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि शरीरातील बदलांकडे लक्ष देणे हेच या धोकादायक समस्येपासून दूर राहण्याचे सर्वांत प्रभावी उपाय मानले जातात.