Heat wave Kidney health :उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे थकवा येणे आणि शरीरातील पाणी कमी होणे (डिहायड्रेशन) या समस्या सामान्य आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, की या उन्हाळ्यातील उष्णतेचा थेट परिणाम तुमच्या किडनीवरही होऊ शकतो? योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यास किडनीच्या आजारांचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
इंडियन स्पाइनल इन्जरीज सेंटर (ISIC) मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजी आणि रीनल सायन्सेसचे कन्सल्टंट डॉ. उदित गुप्ता यांनी सांगितले की, अनेक संशोधनांमधून असे समोर आले आहे की,’उष्णतेच्या लाटांदरम्यान (Heat waves) किडनीच्या समस्यांमुळे रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढते, विशेषतः संवेदनशील गटांमध्ये हा त्रास जास्त दिसून येतो.
“शरीरात पाणी कमी झाल्यामुळे किडनीकडे होणारा रक्ताचा पुरवठा मंदावतो. परिणामी, शरीरातील टाकाऊ आणि विषारी पदार्थ गाळून ते बाहेर टाकण्याचे काम करणे किडनीला कठीण जाते,” असे डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले.
किडनीला शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी आणि द्रवांचे संतुलन राखण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते. जेव्हा शरीरात पाणी कमी होते, तेव्हा किडनीला जास्त काम करावे लागते. यामुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि गंभीर परिस्थितीत ‘अक्युट किडनी इंजरी’ (Acute Kidney Injury – किडनी निकामी होणे) सारखा धोका निर्माण होऊ शकतो. दीर्घकाळ थोडे-थोडे डिहायड्रेशन होत राहणे देखील किडनीच्या आरोग्यावर मोठा ताण निर्माण करू शकते, असेही डॉ. गुप्ता यांनी नमूद केले.
उन्हाळ्यात मुतखड्याचा (किडनी स्टोन) त्रास का वाढतो? (Why are kidney stones more common in summer)
संशोधनातून सातत्याने असे दिसून आले आहे की उन्हाळ्याच्या महिन्यांत मुतखड्याच्या रुग्णांमध्ये वाढ होते. डॉ. गुप्ता यांच्या मते, “अति घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि लघवी अधिक घट्ट (कॉन्सन्ट्रेटेड) होते. लघवी घट्ट झाल्यावर त्यातील कॅल्शियम, ऑक्सलेट आणि युरिक ॲसिडसारखे क्षार एकत्र येतात आणि त्यांचे स्फटिक बनून मुतखडा तयार होतो.”
याशिवाय, डिहायड्रेशनमुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI – मूत्रमार्गाचा संसर्ग) होण्याचा धोकाही वाढतो. म्हणूनच उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
कोणत्या धोक्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये? (Warning signs you shouldn’t ignore)
उष्णतेमुळे किडनीवर येणारा ताण सुरुवातीला लगेच दिसून येत नाही. मात्र, खालील सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे:
- अतिशय तहान लागणे
- लघवीचा रंग गडद होणे किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे
- चक्कर येणे, थकवा आणि डोकेदुखी
- स्नायूंमध्ये पेटके येणे (Cramps), उलट्या मळमळ होणे आणि सतत अशक्तपणा जाणवणे
- पायांवर सूज येणे
जर मुतखड्याचा त्रास सुरू झाला, तर पाठीत किंवा कंबरेच्या बाजूला तीव्र वेदना होऊ शकतात, लघवी करताना जळजळ होऊ शकते किंवा लघवीतून रक्त येऊ शकते. जर लघवीचे प्रमाण अचानक खूप कमी झाले किंवा तीव्र डिहायड्रेशनची लक्षणे दिसली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला डॉ. गुप्ता देतात.
उन्हाळ्यातील कोणत्या सवयी किडनीला नुकसान पोहोचवू शकतात? (Common summer habits that can harm your kidneys)
पुरेसे पाणी न पिणे.
- उन्हात जास्त वेळ घालवणे आणि द्रव पदार्थांचे सेवन न करता व्यायाम करणे.
- पाण्याच्या ऐवजी साखरयुक्त पेये, कॅफिनयुक्त पेये (चहा, कॉफी) किंवा एनर्जी ड्रिंक्सवर अवलंबून राहणे.
- शरीरात पाणी कमी असताना ‘NSAIDs’ (पेनकिलर्स – वेदनाशामक औषधे) घेणे.
- जास्त मीठ असलेले अन्न खाणे, एनर्जी ड्रिंक्स पिणे किंवा कडक उन्हात जेवण टाळणे (Skipping meals). या सवयींमुळे आधीच आजार असलेल्या लोकांच्या किडनीवर अतिरिक्त ताण पडतो.
कोणी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे? (Who should be extra careful?)
वयोवृद्ध नागरिक, उन्हात काम करणारे मजूर, खेळाडू, मधुमेही (Diabetes) रुग्ण, उच्च रक्तदाब (High BP) असलेले रुग्ण, आधीपासूनच किडनीचा जुनाट आजार (CKD) असलेले किंवा ज्यांना आधी मुतखड्याचा त्रास झाला आहे अशा लोकांनी उन्हाळ्यात जास्त काळजी घेतली पाहिजे. वयोवृद्धांमध्ये शरीरात पाणी कमी असले तरी अनेकदा तहान लागत नाही, तर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेच्या चढ-उतारामुळे शरीरातील पाणी लवकर कमी होते.
किडनीच्या रक्षणासाठी डॉ. गुप्ता यांनी दिलेले महत्त्वाचे सल्ले:
- तहान लागण्याची वाट न पाहता नियमितपणे पाणी प्या.
- आहारात पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा आणि भाज्यांचा (उदा.कलिंगड, काकडी) समावेश करा.
- मद्यपान (Alcohol), गोड पेये आणि मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा.
- दुपारच्या कडक उन्हात जाणे टाळा.
- लघवीच्या रंगावरून हायड्रेशन तपासा; फिकट पिवळा रंग असल्यास शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य आहे असे समजावे.
(टीप: ज्यांना आधीपासून किडनीचे आजार आहेत, त्यांनी पाणी पिण्याचे प्रमाण आणि औषधांबाबत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे काटेकोर पालन करावे.)
