Foods Not to Store in Fridge: साधारणपणे लोकांचा असा विश्वास आहे की, फ्रीजमध्ये अन्न जास्त काळ टिकतं आणि चांगलं राहतं. मात्र, हे काय खरं ठरेल असं नाही. आपल्या रोजच्या वापरातील अनेक पदार्थ असे आहेत की, जे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यांची चव, पोत आणि शेल्फ लाइफ धोक्यात येऊ शकते. जर तुम्हाला कधी टोमॅटोची चव कमी होत असल्याचे किंवा ब्रेड लवकर खराब होत असल्याचे लक्षात आले असेल, तर त्यात दोष तुमच्या फ्रीजचा आहे. तर मग जाणून घ्या की कोणते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नये आणि का?

मध

मध फ्रिजमध्ये ठेवल्याने ते आणखी घट्ट होते. मध नैसर्गिकरित्या जास्त काळ खराब होत नाही. त्याची चव टिकवून ठेवण्यासाठी ते थंड, कोरड्या जागी सीलबंद बरणीमध्ये साठवा. मुळात तुम्ही बाजारातून शुद्ध मध विकत घेत आहात का याचीही खात्री करणं गरजेचं आहे.

ब्रेड

अनेकांना असं वाटतं की, ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्याने तो जास्त काळ टिकेल. मात्र यामुळे ब्रेड लवकर सुकतो आणि शिळासुद्धा होतो. ब्रेड खोलीच्या तापमानावर ब्रेड बॉक्स किंवा कापडी पिशवीत ठेवा. जर तुम्हाला तो जास्त काळ साठवायचा असेल, तर टोस्ट करून घ्या.

कांदा

फ्रिजमधील आर्द्रता कांद्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे ते ओले आणि मऊ होतात, शिवाय त्यावर बुरशीदेखील येऊ शकते. म्हणूनच कांदे नेहमी हवेशीर, कोरड्या जागेत ठेवावेत. तसंच बटाट्यांसोबत कांदे ठेवणं टाळा, कारण बटाटे लवकर खराब होतात.

बटाटा

थंड झाल्यावर बटाट्यामधील स्टार्च लवकरच साखरेत रूपांतरित होतो. त्यामुळे त्याची चव आणि पोत दोन्ही बदलतात. यामुळे स्वयंपाक केल्यानंतर त्याला थोडी गोडसर चव येते. बटाटे स्वयंपाकघरातील पँट्री किंवा बास्केटमध्ये थंड ठिकाणी ठेवा.

लसूण

फ्रिजच्या तापमानामुळे लसूण लवकर फुटू शकतो आणि त्याची चव कमी होऊ शकतो. लसूण कोरड्या, हवेशीर जागेत म्हणजे टोपली किंवा कागदी पिशवीत साठवा.

टोमॅटो

पिकलेले टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची मूळ चव कमी होऊ शकते आणि ते मऊ किंवा दाणेदार होऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांना थंड, हवेशीर ठिकाणी ठेवा जेणेकरून ते नैसर्गिकरित्या पिकू शकतील. म्हणून जर तुम्ही या वस्तू फ्रिजमध्ये ठेवत असाल तर त्या बाहेर ठेवण्यावर विचार करा. यामुळे त्यांची चव टिकून राहते आणि लवकर खराबही होत नाहीत.