How To Store Banana: देशभरात पावसाळा सुरूच आहे. संततधारेमुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत फळभाज्या लवकर खराब होऊ लागतात. केळी हे १२ महिने उपलब्ध असणारे फळ आहे. केळी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन- ए, बी, सी व व्हिटॅमिन बी ६ आढळते. परंतु, बाजारातून केळी आणल्यानंतर ती लगेच खराब होऊ लागतात. पावसाळ्याच्या दिवसांत ती व्यवस्थित स्टोअर करून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. केळी हे असे फळ आहे की, जे दीर्घकाळ टिकू शकत नाही. फळे चांगली राहण्यासाठी आपण ती फ्रीजमध्ये ठेवतो; मात्र केळी फ्रिजमध्ये ठेवता येत नाहीत. मग अशा वेळी काळपट झालेली, जास्त पिकलेली केळी खाण्याऐवजी आपण फेकून देतो. त्यामुळे केळी १० दिवसांपर्यंत ताजी कशी ठेवता येतील, याचे काही घरगुती उपाय करून पाहता येतील. केळी इतर फळांपेक्षा लवकर पिकतात आणि काळी पडू लागतात. केळी फ्रिजमध्ये ठेवणे योग्य नाही. कारण- त्याचा पोत आधीच थंड आहे. तेव्हा केळी रेफ्रिजरेटरमध्ये न ठेवता, अनेक दिवस कशी साठवायची ते आपण जाणून घेऊ. केळी जास्त दिवस ताजी राहावीत यासाठी फॉलो करा 'या' टिप्स १. केळी बाजारातून खरेदी करून आणल्यावर त्यांच्या देठावर पेपर किंवा प्लास्टिक रॅप करा. त्यामुळे ती केळी जास्त दिवस ताजी राहू शकतात. २. केळी जास्त दिवस राहिल्यास खाली टोकाकडील भागाकडून खराब होतात. केळी जर खाली ठेवली, तर ती पटकन पिकतात. खालच्या भागावर काळे डाग पडू लागतात. त्यामुळे तुम्ही केळ्यांसाठी हँगर वापरू शकता. केळी ठेवण्यासाठी हँगर्सचा वापर केल्याने ती जास्त दिवस चांगली राहतात. (हे ही वाचा: पावसाळ्यात दूर राहा ‘या’ ७ पदार्थांपासून; आहारतज्ज्ञ म्हणतात, अन्यथा मिळेल अनेक आजारांना आमंत्रण!) ३. वॅक्स पेपरमध्ये केळी गुंडाळून झाकून ठेवली, तर ती लवकर खराब होत नाहीत. या ट्रिकमुळेही केळी फ्रेश राहतात. ४. केळी खराब होऊ नयेत म्हणून तुम्ही व्हिटॅमिन सी टॅबलेटचीही मदत घेऊ शकता. त्यासाठी व्हिटॅमिन सीची एक गोळी थोड्या पाण्यात विरघळवून घ्या आणि या पाण्यातून केळी काढा किंवा शिंपडा. त्यामुळे तुमची केळी जास्त काळ ताजी राहतील. ५. तुम्ही केळ्यांचे देठ पॉलिथिनमध्ये लपेटून ठेवू शकता. त्यामुळे केळी फ्रेश राहण्यास मदत मिळते. तसेच केळी लवकर काळी पडत नाहीत. पॉलिथिन यातील थंडावा जपून ठेवण्यास मदत करते. ६. केळी फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नका. केळी आणल्यानंतर नेहमी रूम टेंपरेचरवरच ठेवा. बाहेर केळी अधिक काळ टिकतात. फ्रिजमध्ये केळी मऊ पडतात आणि लवकर काळी होतात. वरील सांगितलेल्या ट्रिक्सचा वापर केल्यास केळी लवकर खराब होणार नाहीत आणि जास्त दिवस फ्रेश राहतील.