Kitchen Hacks : अनेक जण जेवणात आल्याचा वापर करतात. चहापासून ते भाजीपर्यंत आल्याशिवाय चव अपूर्ण वाटते. त्यामुळे लोक आलं आणून त्याची फ्रिजमध्ये साठवणूक करतात; पण फ्रिजमध्ये ठेवूनही आलं लवकर खराब होतं. एक तर ते सुकून कडक होतं किंवा त्याला बुरशी किंवा कोंब येतात. त्यामुळे त्याची नीट साठवणूक करायची तरी कशी, असा प्रश्न पडतो; पण काळजी नको, तुम्ही खालील काही सोप्या ट्रिक्स वापरून आलं अनेक दिवस ताजं ठेवू शकता. त्याशिवाय त्याची चव, सुगंधही टिकून राहील.

१) आलं चुकूनही धुऊ नका

आलं फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी चुकूनही धुऊ नका. कारण- त्याला पाणी लागल्यानंतर त्यात बुरशी वाढण्यास वाव मिळतो, ज्यामुळे ते लवकर खराब होतं. आलं न सोलता सालीसकट असंच पूर्णपणे कोरडं ठेवा. पाणी लागलं असेल, तर ते फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी चांगलं सुकवा.

२) टिश्यू पेपर किंवा टॉवेलमध्ये गुंडाळा

आलं फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्यातून थोड्याफार प्रमाणात ओलसरपणा निघतो. जर तसंच ओलसर आलं डब्यात ठेवलं, तर त्याचा रंग गडद होत आणि काही वेळा ते खराब होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आलं टिश्यू पेपर किंवा टॉवेलमधे गुंडाळूनच फ्रिजमध्ये ठेवा.

३) हवाबंद कंटेनर किंवा झिप लॉक बॅग वापरालाइफ

आलं फ्रिजमध्ये असंच ठेवल्यास ते लवकर सुकतं आणि त्याची सुगंध व चव बिघडते. हवाबंद कंटेनर किंवा झिप लॉक बॅग केवळ आल्याला सुकण्यापासूनच वाचवत नाही, तर फ्रिजमधील इतर वस्तूंमधून येणारा वासदेखील रोखते.

४) भाजीपाला ठेवण्याच्या ट्रेमध्ये साठवा

फ्रिजमधील व्हेजिटेबल क्रिस्पर ड्रॉवर आलं साठवण्यासाठी वापरा. जास्त थंड हवेमुळे ते सुकतं आणि जास्त आर्द्रतेमुळे कुजतं; पण आलं क्रिस्पर ड्रॉवरमध्ये ठेवल्यास या दोन्ही गोष्टी टाळता येतात.